Skip to content

आठवणी जागवणारी पाऊस गाणी 

यावर्षी उन्हाळ्याने कहर केलेला. अर्थात प्रत्येक वर्षी हे वाक्य इमानदारीत म्हंटले जातेच. त्या मागे पाऊस लवकर यावा ही इच्छा असते. जेवढा उन्हाळा कडक , तेवढाच पाऊस भन्नाट कोसळतो. कडक उन्हात होरपळल्याशिवाय पावसाच्या तुषाराचे सुख जाणवत नाही.
मुंबईत पाऊस धडकतो. आधी गारांचा पाऊस , मग वळवाचा पाऊस अशा वेगवेगळ्या नावाने फेक अकाउंट उघडत बसत नाही. ढगांची छत्री उघडली की पाऊस धपाधप सुटतो आणि चारपाच दिवस नुसता कोसळत राहतो. आधी झाडे मोडून पडतात, फांद्या-पानांचा हा कचरा, त्यात चिखल, मग बीएमसी ची गाडी येते, रस्ता मोकळा होतो, चिखल धुतला जातो, मुंबई चकाचक दिसायला लागते.
अर्थात रेल्वे बंद पडते, गाड्या अडकून पडतात,काहीही बंद पडले तरी आपला मार्ग चालणाऱ्या मुंबैकरांसारखीच मुंबईची बस पकडण्यासाठी  बस स्टॉपवर  मरणाची गर्दी होते. 
दहाचा मस्टर पकडायला हवाच अशी सक्ती नसलेली माझ्यासारखी गृहिणी पावसात, पावसाची गाणी लावून भजी तळायला घेते. 
कॉफी आणि भजीच्या स्वादात रंगलेल्या गाण्यांची ही पोस्ट.
पावसाचा जोरचं एवढा असतो की बाहेरच्या आवाजाचा विसर पडतो. ऐकायला येतो तो द्रुतलयीत कोसळणारा पाऊस.
It makes you listen to yourself and your own emotions .

पावसाळा हा सृजनाचा ऋतू. शरीराला तारुण्याची ओळख करून देणारा ऋतू. पावसाची सूचना देणारे काळे ढग येतात, वारा गाणे गाऊ लागतो, झाडे नर्तन करतात, पक्षी चिवचिवाट करतात, उन्हाची तलखी कमी होते. भर दुपारी अंधार होतो , धरती आसुसून त्याची वाट पाहू लागते. या सर्वाचा कुठेतरी देहावर सुद्धा परिणाम होत असावा.
कारण नसताना अंग मोहरते, मन थरारते आणि कुणाच्यातरी चाहुलीचा वेध घेऊ लागते. अचानक आपले स्त्रीत्व उमलल्याची जाणीव होते.
अस्वस्थ करणारा बदल असला तरी हवाहवासा वाटणारा बदल असतो हा.

ओ घटा सांवरी, थोड़ी थोड़ी बावरी ( सिनेमा -अभिनेत्री, संगीतकार  लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार –मजरूह सुलतानपुरी , गायिका -लता मंगेशकर, नायिका- हेमा मालिनी)

हेमाचा सुरुवातीचा चित्रपट आहे. निरागस आणि मादकता यांच्या उंबरठ्यावर रेंगाळणारे वय. चेहेऱ्यावर सुद्धा ती कोवळीक दिसते. 

आवाज थी कल  यही , फिर भी ऐसी लहकती न देखी 
पग में थी पायल मगर , फिर भी ऐसी छनकती  न देखी 
चंचल हो गये घुंगरू मेरे रातोरात क्या ? 
चंचल हो गये घुँगरू मेरे रातोरात क्या? हा प्रश्न निसर्गाला आहे.

हे काही प्रेम नाही. त्याचा आभास सुद्धा नाही. तिची पाटी पूर्ण कोरी आहे पण कळीला तरी  फुलताना कुठे माहित असते की तिचे फुल होणार आहे? तिला पत्ताही नाही की तिच्या हृदयात प्रेमाचा उदय होणार आहे .
 
ओ घटा सांवरी, थोड़ी थोड़ी बावरी
हो गयी है बरसात क्या?
हर साँस है बहकी हुई
अब की बरस है ये बात क्या? 

आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी होते. ढगांची गडगड नी विजांच्या कडकडाटात पर्जन्य धारा कोसळू लागतात. नायिका संभ्रमात. आताच भिजायचे?
अहं , तिची मनाची तयारी काही झाली नाही अजून. घराच्या चार भिंतीच्या बाहेर पाय टाकायची अजून इच्छा नाही. मनात असलेली अनामिक भीती आणि मर्यादेच्या कुंपणापलीकडचे आकर्षण याच्या दुविधेत अडकलेली ती. 
पावसात भिजायला अजून बराच वेळ आहे.

हे गीत इनडोअर चित्रित केले आहे.  हेमा घरातील खिडकीतूनच पावसाचे स्वागत करते. त्यात तिचा व्यायाम आहेच. शिवाय मनाला लागलेली उत्सुकता , पावसाबरोबरच आपल्या आयुष्यात आता काय नवीन घडणार आहे!
बाहेर धो धो पाऊस आहे, पोर्च मध्ये त्या पाण्याची वर्तुळाकार रांगोळी तयार झाली आहे. मध्ये चमचमाट करत वीज डोकावून जात आहे. घराच्या बाहेर सृष्टीने त्या नवागताच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आहे.

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम. दोन्हीत जबरदस्त साम्य आहे. न सांगता, कसलीही पूर्वसूचना न देता दोघेही आयुष्यात येतातच वरती चिंब भिजवतात.  तारुण्याची नुकती चाहूल लागलेल्या मुलीचा सखा असतो तो हा पाऊसच. सगळे छान तर चालू आहे मग ही हुरहूर कसली हा प्रश्न पडला आहे खरा पण त्याचे उत्तर कोणाला विचारणार?
मग येतो मदतीला तो पाऊसच आणि तो त्या स्वप्नांना नुसता आकार नाही तर चेहेरा देतो.  

तुमको पुकारे मेरे मनका पपीहरा 
मिठी मिठी अगनी में जले मोर जियरा 
आणि मग घातलेली आर्त साद “ओ सजना”

ओ सजना (सिनेमा -परख , संगीतकार -सलील चौधरी, गीतकार शैलेंद्र, गायिका -लता मंगेशकर, नायिका -साधना)

वाट पाहण्यातली आतुरता उतरली आहे या गीतात.  प्रेमाच्या या राज्यात आताच प्रवेश झाला आहे त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या झळांची कल्पना नाही आणि सध्यातरी त्या सुसह्य करायला पाऊस आहेच की सोबतीला.
पावसाची लय तिच्या हृदयाशी स्पर्धा करत आहे.
गीताचे चित्रण भर पावसात केले आहे.  पावसाची मातीत उठलेली आवर्तने, पानांवरून ओघळणारे जलबिंदू , थरथरणार्या जास्वंदीच्या पाकळ्या, कौलावरून घसरणाऱ्या पागोळ्या, आसमंतात दाटून आलेला काळोख, सलिल चौधरीचे संगीत, झंकारलेली सतार आणि साधनाच्या उत्कटतेला स्वर देणारा लताबाईचा आवाज.


माझ्या घराला खिडकी होती पण ती उघडली की समोरच्या घराच्या खिडक्या दिसायच्या. आधीच प्रकाश कमी पोचायचा , त्यात काळोख कशाला म्हणून गरज नसताना पडदे लावायला बाबांना आवडायचे नाही. खिडकीत उभे राहून गाणे तर अजिबात चालायचे नाही.
पाऊस सुरु झाला की अर्ध्या झाकलेल्या पडद्याच्या मागे उभी राहून मी गुणगुणायचे. साधनाबरोबरच खिडकीच्या गजांमधून बाहेर बघताना असंख्य स्वप्ने पाहीली होती या स्वप्नाळू पावसाच्या संगतीने.

कुणीतरी आपल्यावर प्रेम करत आहे  ही अनुभूती आगळी. पहिल्यांदाच येत असेल तर ही भावना अनोळखी ..
सुजाता सिनेमातील नायिका हरिजन आहे.  ज्या घरात ती राहते, त्या घरात तिचे म्हणावे असे कुणी नाही. तिचे पालक तिला मुलीसारखे समजतात पण ती त्यांची मुलगी नाही. तिला आश्रय मिळतो, संरक्षण मिळते, माया सुद्धा मिळते पण मुलगी म्हणून तिला कसलाही हक्क नाही.
एक उपरेपण मनात जपत मोठी झालेली सुजाता; सर्वांच्या मध्ये असूनही एकटी आहे. तिच्या आयुष्यात खानदानी, देखण्या, सुशिक्षित अधीरचा प्रवेश होतो. रखरखीत वातावरणात अकस्मात आलेल्या पावसाच्या सरीसारखे झालेले त्याचे आगमन.

काली घटा छाये मोरा जिया तरसाये ( सिनेमा -सुजाता, संगीत -एस डी बर्मन, गीतकार -मजरूह सुलतानपुरी , गायिका –आशा भोसले, नायिका -नूतन ) 


नूतनच्या चेहेऱ्यावर ऊन पावसाचा एवढा सुंदर मेळ आहे ..
लज्जा, साशंकता, थोडीशी भीती, बराचसा अविश्वास आणि या साऱ्या वर मात करणारा आनंद, हा आनंदच तिला स्वप्ने पाहण्याचे बळ देतो ..

काली घटा छाये मोरा जिया तरसाये
ऐसे में कही कोई मिल जाये
बोलो किसी का क्या जाए रे,

माझ्या आनंदांत या जगाचा काय वाटा आहे ?
असे जग की ज्याने माझ्या दुःखाचा कधी विचारच नाही केला.
अबोल ,एकाकी , दबलेली ही मुलगी प्रेमाच्या या अचानक झालेल्या दर्शनाने खळखळून हसते. तिचे डोळे चमकून उठतात , पाय थिरकतात आणि  पावसाच्या साक्षीने एका प्रेमकहाणीची सुरुवात होते ..

वसंत ऋतूचे कोणी कितीही गोडवे गावो, निदान इथे तरी वर्षा हाच प्रेमाचा ऋतू आहे. घनगर्द मेघ, भरून आलेले आभाळ , हिरवाकंच परिसर नी ओलावलेली धरणी म्हणजे सृजनाचा सोहळाच. माणसे प्रेमाने झपाटतात ती याच काळात. ज्यावर सर्वस्व ओवाळून टाकावे असे कुणीतरी भेटावे असे आवर्जून वाटते.
प्रेमात पडणे ! किती जणांना ही अनुभूती आली असेल! वेडेपणा असतो हा जो  एका अनपेक्षित क्षणाला ज्वालामुखीसारखा उफाळून येतो . भय, अविश्वास, अहंकार, अशा कित्येक भावनांत जखडलेले मन, नियम तोडून उंडारते. सगळ्याच बंधातून  मोकळे होण्याचा हा आनंद वेगळाच
Love is all about setting one free. आणि असे उधळलेले मन कुणाची तरी आतुरतेने वाट पाहायला लागते…
काठोकाठ भरलेल्या मनात आणि आभाळात साम्य आहे.
सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गिरक्या घेत दूरवर भिरकावला जातो. आकाशात काळे करडे ढग जमा होतात. विजेच्या लखलखाटात नी ढगांच्या गडगडाटात आभाळ मोकळे होऊ लागते. माती आणि आकाशाचे मिलन होते हे पाहून गहिरेपणाच्या संवेदनांनी मने देखील भरून येतात.
कृष्णाची बासुरी मनात पिंगा घालते . त्यात लताचा आवाज मिसळतो ..

पल भर में ये क्या हो गया ( सिनेमा -स्वामी, संगीतकार- राजेश रोशन, गीतकार-अमित खन्ना  , गायिका-लता मंगेशकर, नायिका- शबाना आझमी)

पल भर में ये क्या हो गया, वो मैं गयी, वो मन गया
चुनरी कहे, सुन री पवन, सावन लाया अब के सजन

सारी एका भारलेल्या क्षणाची  किमया …
प्रेम आणि पाऊस दोन्ही कोसळत येतात ..

आशा की छोटीसी नैय्या , ले के चली पुरवैय्या
डोले डोले झुमका बोले , चुपके से ये भेद खोले
आ जायेगा आ जायेगा , प्यार से तुम बुलाना

गीताच्या पूर्ण चित्रीकरणात पावसाचे दर्शन होत नाही  पण आसमंतात तो भरून आहे. तो आहेच वाऱ्याने हलणाऱ्या पानांत, फुलांनी बहरलेल्या झाडांत, प्रेमाच्या चाहुलीने फुलून आलेल्या तिच्या चेहेऱ्यात, थिरकणाऱ्या पावलांत. 
शेवटच्या दृश्यात ओली झालेली जमीन दिसते, पाण्याने डवरलेली शेते दिसतात, वाऱ्याने थरथरणारी छत्री दिसते ..
“सावन लाया अब के सजन”, जेव्हा लता गाते, तेव्हा सौदामिनीच्याच नाही तर ते ऐकणाऱ्या मनामनांत पावसाचे गाणे वाजू लागते …

परख मधली साधना काय, स्वामी मधली शबाना  किंवा सुजाता मधली नूतन, यांची प्रेमकहाणी सफल होईल याची त्यांना खात्री नाही. दोघींना आपल्या परिस्थितीची जाण आहे. आपली परिस्थिती बदलून जावी असे त्यांना कितीही वाटत असले तरीही त्यांच्यात ते बळ नाही. ज्या व्यक्तीवर त्यांचे प्रेम आहे, तो आपला होईल याची त्यांना खात्री नाही. तरीही त्यांचे प्रेम आहे, ते काही मनातून काढणे त्यांना शक्य नाही. त्याचा आनंद त्यांना लपवताही येत नाही.
पावसाचे सुद्धा असेच असते की. पाऊस येतो , रस्ते वाहू लागतात, चिखल होत, वाहने बंद पडतात, कपडे खराब होतात, मेकअप पुसून जातो, नोकरी निमित्त बाहेर पडणे आवश्यक असेल तर असंख्य अडचणींचा सामना करत पोचावे लागते म्हणून पाऊस काही नावडता होतो का ?
छे, असा न पेलवणारा पाऊस असेल तरीही तो येण्याचा आनंद काही लपवता येत नाही.
काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट.
जून लागला की मन पावसाची वाट पाहायला लागायचे. छत्र्या बाहेर निघायच्या. उन्हाळ्याचे मऊ सुती कपडे कपाटात जायचे, त्या जागी रेयॉन किंवा तसेच लवकर सुकणारे, अंगाला न चिकटणारे ड्रेस यायचे.
पावसाची चाहूल लागली रे लागली की “प्रिया, छत्री घ्यायला विसरू नको” असे बाबांनी सांगणे आणि मी हमखास छत्री विसरून बाहेर पडणे प्रत्येक पावसाळ्यात व्हायचे.
पावसात वीर सावरकर मार्ग काळोखात गुडूप होतो . रस्त्यावरचे दिवे सुद्धा पावसात पेटायचे विसरतात. फुटपाथवर तुरळक लोक. हा रस्ता खरेतर भरधाव जाणाऱ्या गाड्यांसाठी आहे. त्यांच्या खिडक्या बंद असतात. भिजून जाणाऱ्या माझ्यासारख्या काही वेड्या लोकांकडे बघायला कुणी वेडे नसते.
मग आरामात ओठावर गाणी खेळवत भिजून घरी आले की बाबा बिचारे टॉवेल हातात घेऊनच दार उघडायचे.
कोरोनात हे बंद पडले. आजारी पडायची जी धास्ती बसली ती बसलीच .

पावसाची अशी काही गाणी आहेत ती हाडामासाच्या प्रियकराऐवजी पावसावरच प्रेम करतात. These are those songs that celebrate not love, but the coming of monsoon.
गीला गीला पानी ( सिनेमा – सत्या, संगीतकार -विशाल भारद्वाज, गीतकार -,गुलजार, गायिका –लता मंगेशकर , नायिका –उर्मिला) 

शीशों पे बजती हैं बूँदें
चेहरे पे चलती हैं बूँदें
नि प, प नि
गुन गुन करता पानी
कलशी में भरता पानी
हुम हुम हुम हुम बरसे, आया है किसके घर से
गीला गीला पानी

हे गीत राम गोपाल वर्मा ने एडिट केलं पण भर पावसात अंगाला साडी चिकटलेली उर्मिला , मुंबईच्या पावसातून भर बाजारात फिरताना पाहिल्याचे आठवते. ते नंतर एडिट झाले असावे. गाण्याच्या सुरुवातीला  खिडकीतून हात बाहेर काढून पावसाला स्पर्श करणारी आणि त्या पहिल्या वाहिल्या स्पर्शाने हरखून जाणारी उर्मिला इथे दिसते. याची सुरुवात सुद्धा फार संथ, जसे काही पाऊस तब्बेतीत बडा ख्याल गात आहे. मग गाण्याला लय येते .
यात सुद्धा मुंबई दिसते पण ही देखणी मुंबई नाही. जुन्या इमारती, त्याला पडलेल्या भेगा, उडालेला रंग पण त्या भेगांतून बाहेर आलेली कोवळी पाने.
त्या हिरव्या रंगामुळे मात्र आजूबाजूचा करडा रंग खुलून दिसतो.  उर्मिलामुळे सत्याचे जीवन फुलून येते तसेच काहीसे वाटते. गुलजार, लता हे कॉम्बो अनेक गीतांसाठी गाजले , त्यात हे गीत बसत नाही पण पाऊस, उर्मिला आणि कोणतेही ग्लॅमर नसलेला तिचा सहज वावर म्हणून मला हे गीत आवडते. ओलेती साडी आणि seductiveness हे समीकरण इथे नाही. 

पहिल्या पावसाची आणि प्रेमाची दोन्होची सांगड घालणारे अजून एक गीत आहे ताल या सिनेमात. 
ताल से ताल मिला ( सिनेमा –ताल , संगीतकार –ए आर रहमान -गीतकार- आनंद बक्षी, गायक -उदित नारायण , अलका याज्ञीक, नायिका –ऐश्वर्या राय )

ह्या गाण्याचे शुटींग हिमाचल मधील चंबा व्हॅली मध्ये झाले आहे. एका बाजूला हिरव्या गर्द  झाडीने झाकल्या गेलेल्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूने त्याचेच प्रतिबिंब पडलेले हिरवे निळेशार पाणी आणि यात बागडणाऱ्या तीन राजकन्या.
मला शाकुंतल नाटकाची आठवण येते. कुणाचीही चाहूल नसल्याने, आपल्यातच गुंग असणाऱ्या, पावसात बेधुंद होऊन नाचणाऱ्या, गाणाऱ्या तीन सुंदर, पांढऱ्या वसनातील जणू पऱ्याच. असे वाटते, पावसाला बिलगून, आपले मनच  त्याच्याकडे मोकळे करत आहेत.
Aishrwarya looks ethereal. No wonder, Akshayee fell head over heels in love with Ash, without even knowing  her. 

माना अंजान हूँ मैं तेरे वास्ते
मैं तुझको जान लून तू मुझको जान ले
आ दिल के पास आ इस दिल के रास्ते
जो तेरा हाल है वो मेरा हाल है
इस हाल से हाल मिला ओ ताल से ताल मिला 

इथेही पांढरे भिजलेले वस्त्र असून त्याचे रूपक निर्मळता आहे .गावात वाढलेल्या, स्वार्थाचा स्पर्शही न झालेल्या मुली.

जेवढे अधिक पावसाळे तेवढ्या त्याच्या आठवणी. पाऊस बघता बघता जुन्या फोटोच्या अल्बम सारख्या डोळ्यासमोरून तरळून जातात. ओल्या रस्त्यावरून जाणारी पावले कितीतरी वर्षाचा प्रवास करून येतात. Hearing the rain splatter against the roof, my heart warms up with severe nostalgia.

संदीप खरे म्हणतात,

पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा ..
कधी उधाणता अन्‌ केव्हा
थेंबांच्या संथ लयीचा ..

अशा आठवणींच्या पावसाचे एक गीत माचीस मध्ये आहे.
पानी पानी रे ( सिनेमा -माचीस , गीतकार गुलजार , संगीतकार -विशाल भारद्वाज, गायिका -लता मंगेशकर -नायिका -तब्बू )


पानी पानी रे खारे पानी रे
नैनो में भर जा
नींदे खाली कर जा 

रूढार्थाने हे पावसाचे गाणे नाही. इथे बर्फाचा पाऊस आहे. गोठलेला पाऊस. जिथे नजर जाईल तिथे दगडावर, झाडांवर, घरांवर सुस्तावलेला बर्फ. काळ्या अंधारात सुद्धा आपले अस्तिस्व दाखवणारा पांढरा शुभ्र बर्फ. प्रकाशासारखा अंधार मात्र तो नष्ट करू शकत नाही. उलट तो अजून गढद होत जातो.
नायिकेचे दुःख सुद्धा गोठून गेलेय. त्याची तीव्रता एवढी आहे की ती संपून जाण्यानेच ते संपणार आहे. परतीचा रस्ता आता राहिलेला नाही.
एकच रस्ता आहे…विनाशाचा. 
आटून  गेलेल्या आसवांनाच ती सांगते,
“तू माझ्या गावाला जा. तुला पर्वत लागतील, दऱ्या अडवतील ,कदाचित धुक्यातून तुला मार्ग शोधावा लागेल पण तू माझ्या गावाला जा, माझ्या माणसांना भेट. माझ्या रिकाम्या, निरर्थक, भरकटलेल्या आयुष्याची कहाणी त्यांनाही सांग.
गमावलेल्या दिवसांची , माणसांची आठवण करून देते हे गीत.
The song makes you realise the value of empty dreams .

न भिजवता आठवणीचाही सोहळा करणारा हा पाऊस असा अंतर्बाह्य भिजवून जातो.
ही सर्व माझ्या आठवणी जागी करणारी पाऊस गाणी , यात तुमचे कोणते गीत आहे ?

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


33 thoughts on “आठवणी जागवणारी पाऊस गाणी ”

  1. सगळीच गाणी एकसे एक निवडलीत .लेखनशैलीत तर तू अफाट आहेसच .मला काली घटना छान आणि सुनो सेना बरखा बहार आयी ही जास्त आवडतात

    1. नूतन खरंच गोड़ दिसते आणि साधनाची सादगी
      किती सुंदर ..पावसासारखीच .

      Thank you Rashmi .

  2. ❤️❤️❤️❤️ सगळीच गाणी आवडती… ओ सजना जास्त आवडते…

  3. अप्रतिम….एक एक टपोऱ्या मोठ्या सारखी टपोऱ्या थेंबांसारखी सुंदर गाणी आणि त्याचा विश्लेषण अगदी मन भवन. सुरुवात करून कधी संपलं कळलंच नाही ❤️👌🙏

    1. Thank you Roupali.
      पावसाची गाणी ऐकणे हे पावसाळ्याचा महत्वाचा भाग आहे 🙂

  4. खुप सुंदर गाण्यांची बरसात, त्या जोडीला त्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर यथार्थ विश्लेषण खुप भावले, हे फक्त दर्दि व्यक्तीचे काम आहे, त्यासाठी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

      1. Shraddha some random thoughts

        प्रिया हे सगळे चित्रपट मी बघितले आहेत..अप्रतिम आहेतच ते पण तुझे लिखाण अजून जास्त आवडते मला..

  5. अफाट लेखन शैली ….. सगळीच गाणी माझ्या आवडीची ….. पावसात न्हावून निघालं मन

  6. विदुला

    आहाहा..
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    सगळीच आवडती गाणी.
    वसंत आहेच .
    पण वर्षा ऋतू खरच प्रेमाचा .
    अफाट लिहितेस.

    चिंब भिजवतेस.🎉🎉💐💐

  7. Shraddha Kandalgaonkar

    प्रिया एकही गाणे असे नाही जे आठवणीत नाही..मस्त चॉईस as usual

    1. Thank you Shraddha .
      आता अजून काही गाणी आठवली
      ..पावसाळी गाणी ही सिनेमाची देन आहे

  8. काय सुरेख शैली आहे तुमच्या लिखाणाची!!
    मन सुद्धा निथळेपर्यंत भिजले. एकसे एक गाणी आणि सुंदर विश्लेषण !! फक्त नायिकेचा पाऊस किती कमाल आहे❤❤!!
    प्रियादी तुमच्या लिखाणाच्या वारंवार प्रेमात पडावं आणि चिंब व्हावे ❤❤❤❤

  9. Vrushali Upadhye

    खूप सुंदर playlist! अजून एक आवडतं गाणं.. रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम – 1942 A love story मधलं गाणं पण सुंदर आहे 💕

    1. Even my favorite Vrushali.
      फक्त मोठा झाला असता लेख .
      ही तशी सोलो आहेत …डुएटस लिहीन परत ..तेव्हा लिहीन

  10. पाऊस किती सुंदर बरसलाय गाण्यात आणि लेखात. झरझर गाणी आल्येत आणि प्रिया तू केलेलं वर्णन आणि उलगडलेल्या पाऊस धारा कमाल. मजा आली.
    Black n white मधल्या heroins तर very beautiful होत्या.

    1. अगदी Neha.
      आणि त्यांच्यात एक ग्रेस आहे. अगदी भिजण्यात सुद्धा .
      गाणी सुद्धा केवढी बोलकी , फक्त सुरेल नाहीत ती

  11. संदीप पेंढरकर

    ओ सजना …..
    खूप खूप खूपच आवडते गीत ,
    शैलेंद्र,
    सलील दा
    आणि
    त्यातील साधना (साधना कट आधीची निरागस ),
    लता तर स्वर देवताच.

    1. माझे सुद्धा
      .फार सोज्वळ आणि आपली वाटते ती .
      गाणे सुद्धा अप्रतिम ..शब्द सूर आणि अभिनय
      त्यातला पाऊस तर कमाल आहे संदीप

      1. संदीप पेंढरकर

        येस.
        नूतन आणि साधना अगदी मराठभोळ्या.

  12. सगळीच गाणी भन्नाट. एकेक गाणं किती सुंदर प्रकारे उलगडून दाखवलं ❤️❤️❤️

  13. सर्व गाणी भन्नाट. आणि सुंदर उलगडलीयस. एकेक गाणं कितीदा ऐकावं असंच. छान लेख. 💐

Leave a Reply to विदुला Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *