Skip to content

पावसात भिजणाऱ्या कांचनमृगांची गाणी.  

काही दिवसापूर्वी वादळाची शक्यता होती म्हणून समुद्राजवळ जाऊ नका अशा धोक्याच्या सूचना ठिकठिकाणी लावल्या होत्या. घराजवळच समुद्र आहे आणि चौपाटीला खेटूनच बीएमसी ने नवीन डांबरी रस्ता केला आहे. चार वाजता पाय वळलेच. दर्याने रौद्र रूप धारण केले होते. केवढ्या मोठ्या त्या लाटा! रस्त्यावर पाऊल ठेवले खरे पण जायचा धीर झाला नाही. वाऱ्याचा जोर खूप. त्यात पाय घसरून पडले तर मोठ्या मोठ्या दगंडावर आपटून कपाळमोक्ष होण्याची भीती.
जवळच लहान मुलं खेळत होती. प्रेमी पावसाचा फायदा घेत एका छत्रीत घुसले होते.
पाणी जवळ आले तरी त्यांना  काही भान नव्हते.
न्याहाळायची उत्सुकता काही थांबवता येत नाही आणि पाण्याचा जोर काही सहन होत नाही अशा मध्यमवर्गीय चाकोरीत सापडल्याने सुरक्षित अंतरावर राहून डोळे निववणे हे उत्तम हेच ठरवले..
चिंब भिजणे सर्वांनाच मानवत नाही. वादळ अंगावर घेणे ही सुद्धा प्रवृत्ती अंगात असावी लागते.  अनेकांना शिंतोड्यावर समाधान मानावे लागते आणि तसेही चिंब भिजणे तरी “तृष्णा “ कुठे शमवते ?

महक उठे है फूल चुराकर, रंग तेरे गालों का
काली घटा ने जाम पिया है, तेरे दो अधिरों का
ऐ मेरी हसीं ग़ज़ल 
महका महका तेरा आँचल
मेरी जान ए ग़ज़ल
चल चल मेरे संग चल.

पावसाच्या गाण्याचा विषय निघाला की मोहनीश बहल हमखास आठवतो. हे गीत खास त्याचेच.
धारदार नाक, पातळ ओठ, पांढऱ्या शुभ्र ओलेत्या शर्टातुन साद घालणारे त्याचे सावळे तुकतुकीत शरीर आणि त्यात भर घालणारा, पथ्थराला ही पाझर फुटेल असा दमदार पण हळवा आवाज ..
“चल चल मेरे संग चल”
(सिनेमा — अस्तित्व, गीतकार- श्रीरंग गोडबोले, संगीतकार- गायक- सुखविंदर सिंग, नायक- मोहनीश बहल)

बाहेर अविरत कोसळणारा पाऊस आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे तिच्या मनातील वादळ यातले विनाशकारी नक्की कोण आहे! तो एवढा देखणा आहे की सारी सृष्टीचं त्याला कवेत घ्यायला आतुर झालेली आहे. त्यालाही माहित आहे ते. त्याच्या  शरीराचा एक एक अणू तिला साद घालतो आहे.
“चल चल मेरे संग चल” 
आता गेले तर खोल दरीत झोकून देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही हे कदाचित माहित आहे तिला.  ही वाटच निसरडी पण संमोहित करणाऱ्या त्याच्या नजरेला कसे रोखायचे !
तेही खरे नाही, खरा प्रश्न आहे, स्वतःच्या पावलांना कसे थांबवायचे.
हे प्रेम नाही हे तिलाही माहित आहे पण सगळ्याच गोष्टी फक्त  प्रेमाच्या तराजूत  मोजायच्या?
जगाचा पसारा वाढवूनही न संपणारी अशी ही आदीम ओढ ..
अंगात उसळणारा हा लोळ कसा विझवायचा! .
ती स्वतःलाच बजावते ..
घे बाई, पाय आत घे, उंबरठा ओलांडणे सोपे आहे पण समाजाने घातलेले मर्यादेचे कुंपण तुला उध्वस्त करेल.
पाऊस मात्र काही अशा तकलादू कुंपणाला दाद देत नाही.

भिजलेल्या नायिका आणि पाऊस यांचे सिनेमात असलेले नाते अतूट आहे. त्यांच्या विभ्रमांकडे बघताना नायकाकडे लक्ष जात नसेल तर तो आपल्या नजरांचा दोष आहे. अशी अनेक गाणी आहेत ज्यात पावसाने नायकांना irresistible बनवले आहे.  नायिकांच्या संयमाची परीक्षा बघणारा  आणि अनेक वेळा त्यांना चक्क नापास करणारा हा पाऊस कथेला एक वेगळे वळण देतो.
छान बरसून धरतीला शांत करणारा, शेतकऱ्यांचा दुवा घेणारा, मुलांच्या शाळेलाच काय, रूळ पाण्यात घालून चक्क ऑफिसला दांडी मारायला  लावणारा, भजी आणि बुट्टा खायची संधी  देणारा असा लडिवाळ, हळुवार, सभ्य पाऊस एवढा चावट कसा होतो ? चक्क मदन देवाचा दूत होऊन आपण ऍडम आणि ईव्हचेच वारसदार आहोत याची जाणीव करून देतो?
प्राणिमात्रांत देखणे नरच  मादीचे प्रियाराधन करत असताना, माणसाच्या मेंदूत, आकर्षणाचा केंद्रबिंदू “स्त्री” का आहे हे समजत नाही. जवळजवळ सर्वच  पावसाच्या गाण्यांत, फोकस,  भिजलेल्या शिफॉन साडीवर असताना ”आराधना” सिनेमात मात्र पांढऱ्या शुभ्र  शर्टातला राजेश खन्ना, शर्मिलाचे वाटोळे करतो.
केस भिजलेले, शर्टाची बटन्स सुटलेली, डोळे रोखलेले आणि हात  फक्त तिच्या होकाराची वाट पाहत थांबलेले.

“रूप तेरा मस्ताना “ (सिनेमा आराधना, गीतकार -आनंद बक्षी- संगीत एस डी बर्मन, गायक -किशोर कुमार, नायक राजेश खन्ना )

रात नशीली, मस्त समां है
आज नशे में सारा जहां है
हाय, शराबी मौसम बहकाए 

मोहाच्या एका क्षणाची किंमत चुकवताना सारे आयुष्य खर्ची पडते. पावसात असे नक्की काय रसायन असते की गारठून टाकणाऱ्या थंडीतसुद्धा शरीर तापते ! लज्जेचा अडसर झटकून टाकायला आतुर झालेल्या मनाला , पेटलेल्या शेकोटीच्या प्रकाशाचा सुद्धा अडथळा होत नाही.  भारावलेली रात्र आणि भरकटलेले मन  हे डेडली कॉम्बो आहे. .
“ रोक रहा है, हमको जमाना “ पण स्वतःच्या  मेंदूचे शोर्ट सर्किट होते तेव्हा जमाना कितीही बोंबलला तरी उपयोग नसतो.
मोह होणे हे प्रगतीकडे पडलेले एक पाऊल आहे. तो झालाच नाही तर जग थांबेल की. काहीतरी घडवायला त्या गोष्टीचे आकर्षण असणे आवश्यक पण ती गोष्ट खरंच चांगली आहे का हा विवेक असणे आवश्यक आहे नाहीतर त्याची माती होते.
अस्तित्व मध्ये तब्बू कडून जे घडते त्यात प्रेमाचा अंश नसतोच. जे घडते ते वासनेतून , त्याचे आलेले फळ सुद्धा तिला नाकारते. सुख काही तिच्या वाट्याला येत नाही. आराधनात जे घडते त्याला प्रेमाचे अधिष्ठान असते. दोन्ही गाणी एका क्षणाच्या मोहाची पण त्याची परिपूर्ती केवढी वेगळी.

पहिल्या प्रेमासारखाच येतो पाऊस. मन अजिबात तयार नसताना धडकतोच.
येतो तो ही कसा!
सभ्य गृहस्थासारखे टक टक करून परवानगी घ्यायची का सरळ आतच घुसायचे?
एडविन मॉर्गनची कविता आहे
Kiss me with rain on your eyelashes,
come on, let us sway together,
under the trees, and to hell with thunder.
धूसमुसळा, रांगडा जितेंद्र पाहील्यावर कोणाला सावनची पर्वा आहे!

“अब के सावन मे जी डरे “ ( सिनेमा -जैसे को तैसा, गीतकार आनंद बक्षी, संगीत -आर डी बर्मन, गायक — लता -किशोर कुमार नायक-जितेंद्र )

ऐसा मौसम पहले कभी भी आया नहीं
ऐसा बादल अम्बर पे सजना छाया नहीं
ये सुहाना समा, प्रेम की खोज में मौज में
पागल प्रेमी बनके फिर
रिमझिम तन पे पानी गिरेमन में लगे आग सी

गडगडण्याची भीती फक्त जवळ येण्यासाठी एक बहाणा आहे. पावसाची गाणी फक्त ऐकायची नसतात, पाहायची सुद्धा असतात. इथे बेहोषीने नाचणे जितु भाई कडून शिकावे. हात पाय कुठे ही, कसे ही,  वळवू शकतो हा  माणूस ..जम्पिंग जॅक त्याला उगीच नाही म्हणत.
या गाण्यातली एक ओळ मला खूप आवडते.
“होश से काम लो “ आता यात नक्की काय सुचवायचे आहे ह्या विचारात काहीतरी वेगवेगळे आठवत असताना , तो पुढे म्हणून टाकतो,
“राम का नाम लो “
…हुश्श

हिंदी सिनेमात ढंगाच्या गडगडण्याला परफ़ेक्ट टायमिंगचे वरदान आहे . डोके ठिकाणावर ठेवून नायिका, चांगली हातभर लांब जाते , तेवढ्यातच तो बरसतो, गरजतो आणि उचललेले पाऊस मागे घेऊन , ती कोसळते ती आयतीच नायकाच्या हातात  सापडते.

भिगी भिगी रातो मे ( सिनेमा -अजनबी, गीतकार –आनंद बक्षी , संगीतकार -आर डी बर्मन , गायक-लता किशोर , नायक -राजेश खन्ना ) 

बरखा से बचा लूँ, तुझे सीने से लगा लूँ
आ छुपा लूँ
दिलने पुकारा देखो, रुत का इशारा देखो
उफ़ ये नजारा देखो, कैसा लगता है
यात कुठेही पांढरा रंग नाही. कुठेही नजरेला खिळवणारी पारदर्शकता सुद्धा नाही. सरावाने जमलेली लज्जा असेल , पण सलज्ज झीनत बघणे हे सुख आहे. रूप तेरा मस्ताना मधला राजेश हा नवशिका होता. ते गाणे कितीही बोल्ड असेल तरी दोघांचे नवखेपण त्यात लपत नाही. तो अभिनय असेल तर फारच जमून आलेला होता. अजनबी मधला राजेश सराईत असेल तरी फार गोड़ दिसतो. त्याचे नेहेमीचे हातवारे इथे नाहीत. घराच्या गच्चीवर झालेले चित्रीकरण असल्याने असेल, पहिल्या प्रवासातले दोघांचे भिजणे फार सहज आहे इथे .

पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आला की त्या पाठोपाठ अमिताभ येतोच.
रिमझिम गिरे  सावन तर फक्त पावसाचे नाही तर खास मुंबईच्या पावसाचे गीत आहे  पण मला अमिताभ आणि पाऊस म्हंटले की “ आज रपेट जाये तो “ हमखास आठवते. असे म्हणतात, या गाण्याचे रशेस पाहिल्यावर स्मिताला रडू कोसळले. तिच्या प्रतिमेच्या विरुद्ध हे गाणे होते.
नमक हलाल चे कास्टिंग वेगळेच होते. मसाला फिल्म च्या शहेनशहापुढे समांतर, आर्ट फिल्मची सम्राज्ञी होती. पावसाने दोघांच्या प्रतिमा धुवून टाकल्या.
“आज रपट जाये तो” (सिनेमा-नमक हलाल , गीतकार -अंजान,  संगीतकार -बप्पी लाहिरी, गायक- किशोर- आशा, नायक -अमिताभ)

मुंबईच्या पावसाची एक वेगळीच गम्मत असते. सकाळपासून मळभ असते आणि पावसाचा पत्ता नाही. आता वाट पाहून पाहून बाहेर पडावे तर रोखून ठेवलेले प्रेशर मोकळे करावे तसा सुटतो आणि कोसळतच राहतो. या पावसात आडोसा शोधण्यात काही अर्थ नसतो. मनावरचा ताण, संकोच सरळ धुडकावून लावायचा आणि त्याचे मोकळ्या मनाने अगदी हात पसरून स्वागत करायचे.
या भान विसरून कोसळणाऱ्या पावसात जर सखीची सोबत असेल तर !
धमनी मधून एड्रेनालाईन स्त्रवते and spark flies ! सभ्यता आणि शालीनता चे संकेत धुडकारले जातात.
पाय घसरणे यालाच म्हणतात. 

आज रपट जायें तो हमें ना उठइयो,
आज फिसल जायें तो हमें ना उठइयो
हमें जो उठइयो तो ख़ुद भी रपट जइयोहाँ
ख़ुद भी फिसल जइयो

रिमझिम गिरे सावन मध्ये एक लक्ष्मणरेखा आहे. अल्लड मुलं वाटतात ती दोघे. इथे मात्र पाऊस वयात आला आहे. नैसर्गिक प्रेरणेला शरण जायला पाऊस भाग पाडतो की काय असा प्रश्न हे गाणे पाहताना वाटतो . बप्पी लहरी, किशोर आणि आशाने मात्र हे गाणे खूप उंचीवर नेले आहे. त्याचा जो रासवटपणा बघताना जाणवतो तो ऐकताना जाणवत नाही. या गाण्याचे शूटिंग भर पावसात , मुंबईच्या रस्त्यांवर केले आहे.

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या दहक मध्ये असेच मुंबईच्या पावसात चिंब भिजलेले गाणे आहे. 
“सावन बरसे तरसे दिल” ( सिनेमा-दहक , गीतकार -मजरुह सुलतानपूरी, संगीतकार- आदेश श्रीवास्तव, गायक हरिहरन – साधना श्रीवास्तव. नायक -अक्षय खन्ना)

“आज रपट जाये” मला बाहेरच्या शहरातून मुंबईत आलेल्या लोकांचे गाणे वाटते पण हे गाणे खास मुंबईकराचे. शहरात वाढलेले, इथल्या रस्त्यांशी, ट्रॅफिकशी , पावसाशी परिचित असलेले मुंबईकर.
दोघेही निरागस आहेत, अनुनभवी आहेत, पहिल्या प्रेमाशी नुकतीच ओळख करून घेतलेले पण बेधडकपणे त्यात स्वतःला झोकून देणारे मुंबईकर.

सावन बरसे, तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाजार में 
यार एक यार के इंतजार में

बाहेर जोराचा पाऊस सुरु आहे. अशा स्थितीत ट्रॅफिकचा खोळंबा ही नेहेमीची गोष्ट आहे. रस्त्यात चिखल होणे , छत्री  उडून जाणे, मेकअप पुसून जाणे , कपडे ओले होणे , केस विस्कटणे, रिक्षा बंद पडणे  ह्या गोष्टी नित्याच्या. त्या आपल्या प्रियतमेच्या/प्रियकराच्या  भेटीच्या आड मात्र येत नाहीत. छत्रीच्या गराड्यातून, बंद पडलेल्या ट्रॅफिकमधून , तुंबलेल्या रस्त्यातून प्रेम आपला मार्ग बरोबर शोधते. इथे नायकाचा शर्ट लाल आहे. एवढ्या गर्दीतून तो दिसायला तर हवा ना ! शिवाय पांढरा रंग इथूनच्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावर न घालण्याइतपत मुंबईकर सुज्ञ असावेत.
फार देखणे आणि सुरेल गाणे आहे हे.
जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याच्या बरोबर प्रेम सुद्धा थडकते. त्याचा चेहेरा अगदी अक्षयी खन्ना  सारखा असतो.

पाऊस आणि प्रेम याचे एक अतूट नाते आहे. अविरत कोसळणाऱ्या धारा आणि सोसाट्याचा वारा यांच्या साक्षीने प्रेम बहरते. पाऊस म्हणजे सृजनाचा ऋतू. प्रसवाला सज्ज झालेल्या धरणीचा हुंकार. दोन मनांना जोडणारा देवदूत.
प्रेमाचा हासभास सुद्धा नसताना, आभाळ गडद होऊन जशी धरित्रीकडे झेप घेते तसे हृदयात प्रेमाचा अंकुर फुटतो.
मनाची तार  छेडणारा पाऊस नुसता भिजवत नाही तर मनाच्या कप्प्यात जपलेले गुपित अलगद ओठावर आणतो.
पावसाचा हा ऋतूच मुळी आशिकाना. पाऊस रोमान्स शिकवतो. 

कोई लडकी है, जब वो हसती है ( सिनेमा -दिल तो पागल है, गीतकार- आनंद बक्षी, संगीतकार -उत्तम सिंग, गायकी -लता मंगेशकर -उदित नारायण नायक –शाहरुख खान )

हे गाणे बालपण आणि तरुणपण दोन्हीची आठवण करून देतं. आकाशात ढग जमा झाले की पुरी बिल्डिंग गच्चीवर जमा व्हायची. आतुरतेने पावसाची वाट पाहणारे असंख्य डोळे आकाशाकडे लागून असायचे आणि पहिला थेंब  पडला की सुरु व्हायचा जल्लोष, ज्याचा सूर  पावसाच्या तालाशी एकरूप  व्हायचा. 

कोई लड़की है जब वो हँसती है बारिश होती है छनक छनक छुम छुम चक् दुम् दुम्
कोई लड़का है, जब वो गाता है सावन आता है, घुमड़ घुमड़ घुम घुम चक् दुम् दुम् …

शाहरुख मध्ये ही पावसाची एनर्जी आहे. नुसतीच एनर्जी नाही तर पावसाचा निखळपणा सुद्धा. पारदर्शक वस्त्रामध्ये असूनही हे गाणे कुठेही तारुण्याच्या उंबरठ्याला स्पर्श सुद्धा करत नाही. त्याच्या पावलातील जोश, हालचालीतील उत्साह  ,डोळ्यातील चमक सगळे सगळे एका लहान मुलासारखे.
गाणे पुढे सरकते , संपते आणि मग त्याच्या हृदयात पाऊस मदनबाण सोडतो ..
मला खूप आवडते हे गाणे ,

पावसात भिजणाऱ्या नायिकांचे कौतुक असतेच  पण भिजक्या  नायिकांपेक्षा सुद्धा, “भिगी भिगी रातोमें”  मधील  खट्याळ  राजेश,  “आज रपट  जाये”   मधला  टवाळ अमिताभ,  “बादल  युं  गरजता है”  मधील नवखा सनी,  “जो हाल दिलका”  मधील मिस्किल आमिर , लगी आज सावन की मधला न भिजलेला उत्कट विनोद आणि बारीश का बहाना है , जरा देर लगेगी ……पण, आखिर तुझे आना है मधील confident संजय दत्त…… हे खरे तर मोहात पाडणारे कांचन मृग आहेत. ही  गाणी त्याने तिच्यासाठी गायलेली पण नव्वदीच्या दशकात गाजलेले, “टीप टीप बरसा पानी पानी  में आग लगायी “ हे गाणे थोडे वेगळे आहे. 

“टीप टीप बरसा पानी पानी  में आग लगायी “ ( सिनेमा–मोहरा , गीतकार –आनंद बक्षी , संगीतकार-विजू शाह, गायक- अलका याज्ञीक –उदित नारायण. नायक –अक्षय कुमार)


तेरी याद आई तो जल उठा मेरा भीगा बदन
अब तू ही बताओ सजन, मैं क्या करूं?

डू-डू-डू-डू-डू-डू-डू डूबा दरिया में खड़ा मैं साहिल पर
ओ हो ओ, डूबा दरिया में खड़ा मैं साहिल पर
तू बिजली बनकर गिरी मेरे दिल पर
चली ऐसी ये पागल पवन मैं क्या करूं

हे गाणे म्हणजे मनात  आले तर बाई किती वाट लावू शकते याचे ज्वलंत उदाहरण .
डू-डू-डू-डू-डू-डू-डू डूबा .. हे अडखळणे नक्की गारठ्याने आहे की रविनाला पाहून उडालेली गाळण आहे हे मला माहीत नाही.
पाऊस असाच हातातील पर्याय  अल्लद काढून घेतो आणि हातात उरते ते पुटपुटणे “मैं क्या करूं”
Candy crush पेक्षा हे सगळे खरे eye candy आहेत. .……
यात सलमान मला सापडला नाही, कारण तो पांढरा काय कोणताच शर्ट घालत नाही … 
पावसाच्या शुभेच्छा.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


30 thoughts on “पावसात भिजणाऱ्या कांचनमृगांची गाणी.  ”

  1. किती छान लिहिले आहे, सगळ्या पावसांच्या गण्यांबद्दल बद्दल. 🙂
    माझ्या आवडीचे म्हणजे सावन बरसे हे गाणं…
    अक्क्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे…❤️

    1. Balaji 02027640747

      This reminds me Rajendra kumar and Babita song
      Rimzim ke geet dawn gaye haye bhigi bhigi ratome.
      Nicely written by you as always.

  2. Narendra Kulkarni

    खुप मस्त लिहीले आहे . कांचन मृग .. नांव ही समर्पक .. हे वाचुन आता खरा पाऊस सुरु झाला असे वाटते . 🌹🌹

  3. हिंदी सिनेमा आणि पाऊस म्हटलं, की हमखास अठवणारं गीत म्हणजे,
    ” रिमझिम गिरे सावन..” (लता- आर डी_मंजिल) ह्या गीताचं वैशिष्ट्य हे, की संपूर्ण गाण्यातअमिताभ- मौशुमी यांच्यापेक्षा पावसावर जास्त फोकस आहे ! दोघेही मुक्तपणे पाऊस झेलीत बागडत आहेत ! त्यात नेहमीचा “ओलेती नायिका” हा कमर्शियल हेतू नाही, तर वावरण्यात एक सहजपणा , अवखळपणा आहे , उत्साह आहे ! तोच भाव पूर्ण गाण्यात पावसाने सुद्धा कायम ठेवला आहे !

    प्रिया प्रभुदेसाई यांनी ह्या लेखाच्या निमित्ताने खरं तर पावसाचीच एक मनोज्ञ सैर घडवून आणली आहे !!
    Too good !

    __ शिरीष दडके

    1. Thank you Shirish.
      माझे अत्यंत आवडीचे गाणे .
      पण त्याचे एवढे पैलू आहेत की त्यावर स्वतंत्र पोस्ट तो बनती है .
      एन्जॉय द रेन.

  4. कमाल आहे हो बायो हा लेख!
    एक अमिताभ सोडला तर कुणीही आवडत नाही यातलं फारसं
    पण तुझी लेखणी आणि पावसाचा स्पर्श यांनी सोनं केलं त्या सगळ्यांच

    1. मलाही नाही पण पाऊस म्हंटला के हे आठवतात .
      तसेही कांचनमृग सुद्धा आवडावा असे कुठे आहे .. ?
      तो त्या क्षणी हवासा वाटतो Gauri 🙂

  5. खूप भारी लिहिलं आहे… मृगांबद्दल फार क्वचित लिहिलं जातं.. आपण हा संतुलन राखतात यासाठी विशेष आभार. मला पण भिगी भिगी रातो मे, कोई लडकी है आणि टिप टिप् बरसा पानी ही गाणी खूप आवडतात… आपण ज्या अभ्यासपूर्वक नजरेने गाणे बघतात, ऐकतात तसं अधिक लोकांना जमलं पाहिजे… गीतकार, लेखकांची मेहनत सार्थकी लागेल.

    1. Thank you so much Ashish . मलाही नवल वाटले ..चक्क एका मुलीनेच लिहिले की तिला मृग काही खास वाटत नाहीत .
      असो .
      आणि एक राहून गेलं
      एक लाडकी भिगी भागी सी ..
      पण ते फक्त मधुबाला

  6. फारच सुरेख सगळी गाणी. लगी आज सावन की फिर वो झडी है.. हे गाणं आणि रिमझिम गिरे सावन.. हे गाणं अगदी काळजा जवळचं. मौसमी चटर्जी अमिताभ यांना या गाण्यात बघणं म्हणजे पावसाचा रियल फिल घातल्यासारखे वाटते. लतादीदीने गायलेले गाणे हे फारच सुरेख वाटते मैफिलीत गायलेल्या किशोरदाच्या गाण्यापेक्षा. खूपच चिंब करणारी पोस्ट 👌👌❤

    1. खरंय
      मुंबई आणि पाऊस ह्यांचे नाते दाखवणारे गाणे . त्यावर स्वतंत्र लिहीन .
      लगी आज सुद्धा आवडते पण खूप कातर करते ते
      वेगळी पोस्ट होईल त्यावर
      Thank you Kamini .

  7. Prashant G Chawandke Chawandke

    खूपच छान… आणि तूमच लिखाण म्हणजे मेजवानी….. मान्सून स्पेशल….
    धन्यवाद

  8. Mrs smita dewappa Kokitkar

    व्वा कित्ती सुंदर गाणी आणि तुझ ते वर्णन !!खूप छान प्रिया❤️❤️सगळी गाणी अप्रतिम निवडली आहेस!!तुझ लिखाण म्हणजे एक मेजवानी असते प्रिया…..परत परत वाचण्यासारखे…!!

  9. अप्रतिम गाणी निवडलीत आणि तुझी लेखनशैली सोनेपे सुहागा .पाऊस ह्या विषयावर ईतकं अफलातून लिहिणं तुलाच जमतं

  10. तुझी लेखनशैली अफलातून सुरेख .सगळेच गाणी छान निवडलीत आणि विश्लेषण खूपच छान सोनेपे सुहागा.

  11. Lata Devendra Narwekar

    खुपच छान लिहीले आहे.
    *”पावसात भिजणाऱ्या नायिकांचे कौतुक असतेच पण भिजक्या नायिकांपेक्षा सुद्धा, “भिगी भिगी रातोमें” मधील खट्याळ राजेश, “आज रपट जाये” मधला टवाळ अमिताभ, “बादल युं गरजता है” मधील नवखा सनी, “जो हाल दिलका” मधील मिस्किल आमिर, “लगी आज सावन की” मधला न भिजलेला उत्कट विनोद आणि बारीश का बहाना है , जरा देर लगेगी ……(पण) आखिर तुझे आना है मधील confident संजय दत्त……
    हे खरे तर मोहात पाडणारे कांचन मृग आहेत.”*
    हे नव्याने जाणवले. यात रोमॅण्टिक हिरो राज कपूर चे नाव जोडावे लागेल. गाणी छान, पण माझे आवडते ” कोई लड़की है जब वो हँसती है बारिश होती है छनक छनक छुम छुम चक् दुम् दुम्”.
    आणि हो सलमानच्या “जग घुमिया थारे जैसा न कोई…. ” मध्ये 2 र्या कडव्यात पाऊस पडत आहे.
    असेच व्यक्त होत रहा.

    1. Oh सलमान राहिला खरा .
      थँक्स .
      आणि एक लगा लगा लगा , प्रेमरोग …सुश्मिता बरोबर .
      दोन गाणी स्वतंत्र लिहीन …प्यार हुआ इकरार
      आणि रिमझिम गिरे सावन …दोन्ही लाडकी
      राजकपूर चे डम डम डिगा नंतर आठवले …तसाच शम्मी …तो खरंच चुकला .
      दिल तेरा दिवाना है सनम
      थँक्स वन्स अगेन Lataji.

  12. अफाट लिहिलंय अतिशय आनंद देणं हे पावसाचं प्रमाण आहे… किती सुख आहे भिजण्यात हे कोसळणाऱ्या पावसात भिजून अनुभवता येतं… सगळी उर्मी साठलेली त्या क्षणी समजते…मन हळुवार होत आणि तरीही वाहत जात… त्या क्षणी आवडती व्यक्ती सोबत असेल तर अजूनच सुंदर… जादूगार आहे हा मेघदूत… सर्वांचे विरहाचे दुःख कमी करण्यासाठी अविरत बरसत राहतो… विरह संपवतो…

    1. वाह , काय सुंदर लिहिलंस अनघा . खरंच ..पाऊस किती जणांना नवजीवन देतो ..भावनांना सुद्धा

Leave a Reply to Rashmi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *