Skip to content

 लोकप्रियतेच्या झगमगाटात आपले स्थान टिकवण्यासाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची कथा

या जगातली प्रत्येक व्यक्ती भविष्यात प्रख्यात होईल, ती कीर्ती पंधरा मिनिटांची का असेना! १९६८ मध्ये अँडी वाहोलने केलेली ही नोंद आहे. आपले भाकीत २१ व्या शतकातच प्रत्ययास येईल याची कल्पना सुद्धा त्याने केली नसेल. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि असंख्य सोशल मीडियाच्या ऍपवर चार ओळी लिहिल्या जातात किंवा एक फोटो टाकला जातो आणि काही सेकंदातच घरबसल्या कोणीही व्यक्ती त्या काळापुरती सेलिब्रिटी होते. प्रत्येकाला त्याच्या वाट्याची प्रसिद्धी मिळते. लाईक्स, कॉमेंट यांनी सर्वसामान्य माणसे झपाटल्यासारखी वागतात हे तर प्रत्ययास येतेच पण ज्यांची प्रसिद्धी ज्यांच्या कामाचाच एक भाग आहे ही लोक, त्यासाठी कोणत्या थराला जात असतील!
शो बिजनेस मध्ये तर प्रसिद्धीचा केंद्रबिंदू सतत हलत असतो. तुमचे वय, एखादा चुकीचा रोल तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून खाली खेचतो. लोकं दुसऱ्या माणसाकडे वळतात आणि बघता बघता तुमचे नाव आठवणीतून पुसले जाते.
जिथे आपल्या अस्तित्वालाच डेड लाईन आहे तिथे प्रसिद्धीचे काय! 
“ऑल अबाऊट ईव्ह ” हा सिनेमा शो बिजनेस मधल्या दोन स्त्रियांची गोष्ट आहे. एक प्रसिद्धीच्या शिखरावर आहे पण चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने हातातून निसटणाऱ्या आपल्या स्थानाची तिला जाणीव आहे. दुसरी प्रसिद्धीच्या परिघाच्या बाहेर आहे. त्याच्या आत जाण्यासाठी काय वाटेल ते करायची तिची तयारी आहे.

कथा वर्तमानात सुरु होते. सारा सिद्दान संस्थेतर्फे, नाटक क्षेत्रातील लोकांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्याची ही रात्र आहे. या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती इथे उपस्थित आहेत. जुना पण आता विस्मृतीत गेलेला नट भाषण करताना उपस्थित असलेल्या महत्वाच्या व्यक्तींचा परिचय करून देतो. ही सर्वच पात्रे कथेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. 

या समारंभाचे मुख्य आकर्षण आहे देखणी, हुशार ईव्ह हॅरिंगटन, (Anne Baxter) जिला या वर्षीचा उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
ऍडीसन द वीट– अत्यंत प्रभावशाली सिनेपत्रकार (George Sanders)
मार्गो चॅनींग –प्रसिद्ध स्टार (Bette Davis)
बिल सॅमसन –एक सफल दिग्दर्शक आणि मार्गोचा प्रियकर 
मॅक्स फेबिअन –निर्माता
लॉईड रिचर्ड –लोकप्रिय पटकथा लेखक
कॅरेन रिचर्ड – त्याची पत्नी आणि मार्गोची मैत्रीण . (Celeste Holm)
यशस्वी, ईव्ह कडे बघताना कॅरेनला आठवते काही महिन्यापूर्वीच तर ती इव्हला भेटली होती. तेव्हा ती अत्यंत गरीब, साधी, काहीशी भाबडी, मार्गोची भक्ती करणारी चाहती होती.
ईव्हची कथा आता कॅरेनच्या नजरेतून उलगडते. सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो.
मार्गोची भक्तच असते ईव्ह. ती काम करत असलेल्या  “Aged in wood” या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला तिची हजेरी असते. कॅरेन तिची मार्गोशी ओळख करून देते. गरीब असलेल्या, युद्धात नवरा गमावलेल्या, एकाकी, अनाथ ईव्हला मार्गो आपली मदतनीस म्हणून नोकरीला ठेवते. थोड्याच वेळात ईव्ह सर्वाना जिंकून घेते. 
मार्गोच्या प्रियकराचा, बिलचा, वाढदिवस असतो. मार्गो विसरते. ईव्ह त्याच्यासाठी ट्रंककॉल बुक करते. मार्गोला अंधारात ठेवून, त्याला तार ही पाठवते. बिलकडून समजल्यावर जेव्हा मार्गो याचा खुलासा मागते, तेव्हा आपण विसरल्याची कबुली देऊन मार्गोची क्षमा मागते.  मार्गोला आता संशय येऊ लागतो पण ईव्ह एवढी साळसूदपणे वावरते की बाकीचे सर्व मार्गोला चूक ठरवतात. “तुझ्या वाढत्या वयामुळे तुला असुरक्षित वाटते, त्याचा राग तू तरुण ईव्ह वर काढते आहेस” असा आरोप करतात.
बिल परत येतो तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मार्गो पार्टी ठेवते. पार्टीत दारू पिते आणि नैराश्येत सर्वांचाच अपमान करते.
बिल पार्टी सोडून जातो. कॅरेन तिला धडा शिकवण्यासाठी एका रात्रीसाठी मार्गोची भूमिका ईव्हला देते.
आणि अहो आश्चर्यम! त्या प्रयोगाला न्यूयॉर्कचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांत ईव्हच्या कामाबद्दल प्रशंसात्मक लेख छापून येतात. हे नकळत घडते का याहीमागे ईव्हचा हात असतो?

ईव्हचा खरा चेहेरा आता समजायला लागतो. ऍडीसन वर्तमानपत्रात केवळ ईव्हची प्रशंसा करत नाही तर मार्गो आता वयाने मोठी झाली, नायिकेच्या भूमिकेत ती शोभत नाही अशीही जहरी टीका करतो. सत्य कटू असते. मार्गो हे नाईलाजाने का होईना मान्य करते. बिलशी लग्नाचा निर्णय सुद्धा जाहीर करते. संसार आणि मुलं याकडे लक्ष देण्याची जरुरी आहे म्हणून नाटकातून निवृत्ती घेत आहे असेही जाहीर करते. आता मार्गोचा काटा काढल्यावर ईव्ह बिलच्या मागे लागते, तो तिला झिडकारतो. लॉईडला कॅरेन पासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते पण त्यातही तिला अपयश येते.
लॉईडशी लग्न करण्याचा बेत ऐकून ऍडीसन स्वतःचा संताप आवरू शकत नाही. ईव्हच्या हसऱ्या, देखण्या चेहेऱ्याचा मुखवटा खेचून काढताना, तो, तिला तिची खरी ओळख सांगतो.
तिचे नाव खोटे आहे.  तिने सांगितलेली कहाणी खोटी आहे. तिने केलेला पूर्ण प्रवास खोट्याच्या पायावर उभा आहे. हे बाहेर आले तर थिएटर मध्ये कमावलेली प्रतिष्ठा एका क्षणात नष्ट होईल याची जाणीव ईव्हला होते.
आतापासून ऍडीसन तिचा नवीन मालक असतो. सिनेमा पाहताना जाणवलेल्या काही गोष्टी:
१. सिनेमा प्रदर्शित होऊन सत्तर वर्षे लोटली आहेत पण नायिकेचे वय हा अजूनही फार कळीचा विषय आहे. ह्या सिनेमातील सर्व पुरुष पात्रे वयाने मोठी आहे पण त्यांच्या यश-अपयशात वयाचा वाटा महत्वाचा नाही. नायिका, कितीही निपुण असेल, सुंदर असेल, परिपक्व असेल तरीही तिचे वाढलेले वय निवृत्तीची पहिली पायरी आहे.
संसार आणि मुलं हवे असेल तर या बिझनेस मधले तुमचे आयुष्य संपलेले आहे. स्त्रियांना फार पर्याय नसतात जिथे त्यांचे तारुण्य आणि उपलब्धता हा कामाचा भाग आहे.
२. जे नाही ते भासवणे म्हणजे अभिनय. कलाकारांचे ते काम असते पण अनेकवेळा अभिनय करताना माणूस हा अभिनय आहे हेच विसरून जातो आणि आभासात जगतो.  मार्गो अभिनय करताना, स्वतःच्या प्रतिमेला खरी समजते त्यामुळे स्वतःचा पराभव, स्वतःची फसवणूक दिसत असूनही तिला ते मान्य होत नाही. ईव्ह केवळ नाटकात अभिनय करत नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा नाटक करते. लोकांचा उपयोग करून घेते. त्या अर्थाने सुद्धा पुरस्काराची ती योग्य मानकरी ठरते.
३. ऑल अबाऊट ईव्ह ही फक्त नाटकाची कथा नाही. ही कथा आहे महत्वाकांक्षेची, गळेकापू स्पर्धेची, लोकप्रियतेच्या झगमगाटात आपले स्थान टिकवण्यासाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची. ही नशा  आवडीचे रूपांतर हव्यासात बदलते.
४. हा १९५० चा सिनेमा आहे जेव्हा समाज पुरुषसत्ताक होता. उघड होता. मार्गो अतिशय यशस्वी आहे पण आपल्या करिअर पेक्षाही तिला बिल, तरुण स्त्री कडे आकृष्ट होईल याची भीती आहे. त्याला मिळवण्यासाठी ती करिअरचा त्याग करते.
पाताळयंत्री ईव्ह आपले कपट उघड होऊ नये म्हणून ऍडीसनचे वर्चस्व स्विकारते. स्त्री ही सुंदर, नाजूक, पुरुषांवर अवलंबून असावी हीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे.  त्याच्यापलीकडे जाऊन डावपेच खेळणारी स्त्री ना थिएटर जगातील लोकांना पेलवणार आहे ना प्रेक्षकांना पचणार आहे.
वरवर पाहता, ही दोन स्त्रियांच्या स्पर्धेची कथा आहे. पण या सिनेमाची टॅग लाईन सांगू ?
“ It’s all about women and ….. their men “
सिनेक्षेत्रातील अर्थव्यवस्था सुद्धा पुरुषांच्या हातात आहे. यशस्वी होण्यासाठी या स्त्रियांना निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पत्रकार यांची गरज आहे. हे सर्वच क्षेत्र पुरुषांनी काबीज केलं आहे.
कितीही यशस्वी भासले तरी या स्त्रियांची दोरी पुरुषांच्या हातात आहे”

सिनेमात काही रूपके चपखल आहेत.
फर कोट — सिनेमातील सर्व सुंदर आणि श्रीमंत स्त्रियांचा आवडता पोशाख. प्रसिद्धी आणि श्रीमंतीचे प्रतीक.  ग्लॅमर आणि सेक्सचे प्रतीक. तरीही तो मुख्य पोशाख नाही. ते आवरण आहे. सेलिब्रिटी लोकही तशीच. त्यांच्या मुखवट्याच्या आत डोकावले तर ते आकर्षक असेलच असे सांगता येत नाही.
आरसे — कलाकारांच्या आयुष्यात आरसा महत्वाचा असतो. ते गर्विष्ठ असतात म्हणून नाही तर ते बाहेरील जगाला कसे दिसतात ह्यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असते.  मार्गोचा पहिला सीन आरशात बघतानाचा आहे. नटी म्हणून नाही तर आपण स्त्री म्हणून अजूनही आकर्षक आहोत का हे ती पाहत असते. ईव्ह आरशात बघत असताना आपल्या पुढील चाली ठरवत असते. आपण काय मुखवटा घालणार आहोत हा तिचा हेतू आहे.

सिनेमाचा शेवट हा या नाट्याचा कळस आहे आणि इतकंच नाही तर हा शेवट कोणाच्याही आयुष्याचे मर्म आहे.
एवढी कट कारस्थाने करून ईव्ह अवॉर्ड मिळवते खरी पण जे या यशाचे मानकरी आहेत, ज्यांनी तिला मदत केलेली आहे, त्या लोकांचा तिरस्कार तिच्या वाट्याला येतो. आपल्या यशात आपली माणसे नाहीत आणि याला कारण आपण स्वतःच आहोत ही जाणीव यश भोगायला देत नाही. याची जमीन भुसभुशीत आहे ही टोचणी लागून राहते.
आपले कर्म कुणाच्या न कुणाच्या रूपात आपल्याच  वाट्याला येते याचा प्रत्यय आयुष्यात कधी ना कधी येतो.
अवॉर्ड घेऊन ईव्ह आपल्या खोलीवर येते तेव्हा एक तरुण मुलगी, तिची चाहती,  तिची वाट पाहत असते.

तिचे नाव फीबी (Phoebe) ..ती स्वतःला तसे म्हणवून घेते. (तिचे खरे नाव नसू ही शकते)  ती सुद्धा गरीब असते. ईव्ह तिला आश्रय देते. दमलेली, थकलेली ईव्ह जेव्हा आराम करत असते, तेव्हा तिचे जॅकेट घालून, तिची ट्रॉफी घेऊन फीबी,  स्वतःचे रूप आरशात निरखत असताना सिनेमा संपतो.
एक वर्तुळ पूर्ण होते.
सत्ता, प्रसिद्धी, पैसे मिळवण्याची लालसा, त्यासाठी काहीही करायची तयारी, यशाला असलेली मर्यादा,  सतत नावीन्याच्या शोधात असलेली जनता … आणि शेवटी वाट्याला येणारा भ्रमनिरास. 
इथे कैफी आझमी यांचे शब्द आठवतात.
नादान तमन्ना रेती में, उम्मीद की कश्ती खेती है
इक हाथ से देती है दुनिया, सौ हाथों से लेती है
ये खेल है कब से जारी
बिछड़े सभी, बिछड़े सभी बारी बारी
(The Internet Archive ह्या साईट वर हा सिनेमा बघू शकता. ) 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

14 thoughts on “ लोकप्रियतेच्या झगमगाटात आपले स्थान टिकवण्यासाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची कथा”

  1. विदुला

    नेहेमी प्रमाणे च.

    अप्रतिम परीक्षण.
    प्रिया,❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉

  2. Vaishali Devdikar

    कुठेही न ओघाळता, अत्यंत ओघवत्या शब्दात खूप मस्त मांडलय.

Leave a Reply to Vaishali Devdikar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *