Skip to content

लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट : फादर ऑफ द ब्राईड.  

असे म्हणतात, जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा त्याच्याबरोबर बाप जन्माला येतो. आपल्याच रक्त मांसाचा तो छोटासा गोळा पाहून माणूस कुठेतरी हलतो. आपल्यावर अवलंबून असणारा तो जीव पाहून जबाबदारीची जाणीव होते. त्याचे हसणे ओठावर स्मित आणते, त्याच्या रडण्याने कळवळायला होते. निरपेक्ष प्रेमाची कल्पना, सत्यात येणे तो अनुभवतो.
मूल, मुलगा असो किंवा मुलगी, प्रेम असतेच  पण मुलात तो स्वतःला पाहतो, भविष्यातील कणखर पुरुषाला पाहतो, त्याने तसे बनावे ह्यासाठी प्रयत्न करतो.  मुलीकडे मात्र बाबा जास्त हळवा असतो. त्याच्यातील पुरुषावर मात करणारी ती पहिली स्त्री असते म्हणूनही असेल मुलीचा आणि बाबाचा बंधच  वेगळा असतो. 

मुलीच्या आयुष्यातील पहिला पुरुष असतो तिचे वडील. प्रेम, आदर, विश्वास, सुरक्षितता आणि भक्कम आधार जेव्हा वडिलांकडून मिळतो, तेव्हा ती मुलगी स्वतःचा आदर करायला शिकतेच पण आयुष्यात आलेल्या पुरुषांचा सुद्धा आदर करते. पुरुष चांगला असतो हा विश्वास प्रथम वडील देतात. या विश्वासावर जगाशी भिडण्याचे बळही देतात. 

वडील फक्त नाव देत नाहीत तर ते प्रदाता असतात, संरक्षक असतात, गुरु असतात, पथ दर्शक असतात. वडील मुलीचे रोल मॉडेल असतात. एक छोटीशी, गोड मुलगी आपल्या पिटुकल्या डोळ्यांनी भारावून बाबाकडे बघते आणि बाबाची छाती अभिमानाने भरून येते. तिच्या चिमुकल्या बोटांनी ती बाबाचा हात घट्ट पकडते, त्याच्या मांडीवर बसून भवतालचे जग न्याहाळते आणि दमून त्याच्याच छातीवर डोकं ठेवून झोपते. बाबा तिचा पहिला वाहिला हिरो असतो.
त्या नंतर एक दिवस येतो जेव्हा ती स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहायला लागते. तिच्या जगात तिच्या बाबा  बरोबरच, तिची खास स्वतःची माणसे प्रवेश करतात. मग कधीतरी ती मेकअप करायला लागते, हाय हिल्स घालते, स्वतःला आवडेल अशी फॅशन करायला लागते. आणि बाबा हादरतो. ती मोठी झाल्याची जाणीव घाबरवणारी असते.
तिचे मित्र कसे असतील, ते तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतील, तिच्याकडून काय अपेक्षा करतील हे प्रश्न बाबाला आता सतावतात. तरुण मुलाच्या मनात काय येऊ शकते याची कल्पना असतेच कारण कधीतरी तोही तरुण असतोच.
त्या नंतर असा एक दिवस येतो की बाबाला ती चुकीच्या मुलाला भेटेल याची भीती वाटत नाही.
He worries  about her meeting the “right” guy.
ही सगळ्यात मोठी भीती असते कारण तो भेटला की एक दिवस तुम्हाला सोडून ती त्याच्याबरोबर जाणार असते. “This is the moment I’ve been dreading for the past six months. Well, actually for the past 22 years.” 
फादर ऑफ द ब्राईड या सिनेमात जॉर्ज बॅंक्स जेव्हा ही कबुली देतो तेव्हा प्रेक्षकांत बसलेल्या बाबा लोकांचे डोळे भरून येतात.

जॉर्ज बँक ( स्टीव्ह मार्टिन)  हा एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व्यावसायिक आहे. एक छानसे टुमदार घर, गोड बायको (डायना किटन्) दोन मुलं, एक कुत्रा आणि घराला असलेले पांढरे शुभ्र कुंपण. त्याच्यासाठी ही आनंदाची व्याख्या आहे. त्याच्या व्यवसायात तो खूश आहे पण त्याचे कुटूंब त्याचे सर्वस्व आहे. एका सेमीस्टर साठी युरोप मधे शिकायला गेलेली त्याची मुलगी, ऍनी, (Kimberly विलियम्स) घरी परत येते अणि आपण आपलं लग्न ठरवले आहे अशी आनंदाची बातमी देते, तेव्हा जॉर्जच्या छोट्याश्या जगात मोठ्ठी खळबळ माजते. 

आता आता पर्यंत आपल्यावर अवलंबून असलेली आपली छोटीशी मुलगी, आयुष्याचा निर्णय घेण्याएवढी मोठी कधी झाली? हा पहिला धक्का.  तिची निवड, तिला सुख देण्या एवढी लायक असेल का ही भिती, आपण आता तिच्यासाठी हिरो नाही, त्याची जागाच कुणीतरी दुसऱ्याने बळकावली आहे हा सुप्त मत्सर आणि शेवटी ती जाणारं याचे दुःख. 
डोळ्यासमोर टप्या टप्याने बाबा उलगडत जातो. 

 जॉर्ज बँक्स आपल्या मुलांच्या बाबतीत हळवा आहे. सीट बेल्ट लावला आहे का, संध्याकाळी मुलं घरी आहेत ना, ती बाहेर गेली असतील तर जवळपास आली की फोन करतील ना, निष्काळजी पणामुळे त्रासात पडणार नाही ना असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. त्याचा अती काळजी करण्याच्या स्वभाव नकोसा वाटला तरीही त्याचे कुटुंबावर फार प्रेम आहे. या सर्व प्रसंगाच्या आठवणीं सुंदर असाव्यात यासाठी तो प्रयत्नशील आहे हे लक्षात येते. 

एवढया हुशार मुलीच्या लायक कुणी असू शकेल हेच त्याच्या मनाला पटत नाही. त्यात एवढ्या थोड्या कालावधीत आपली जागा कुणी घेवूच कसा शकतो हा ही प्रश्न त्याला सतावतो . हा निश्चित लायक आहे का ही  शंका त्याला त्रास देते. 
“Just what does an ‘independent communications consultant’ do anyway?” तो मुलीलाच विचारतो , “Is that even a real job?”पण मुलगी प्रेमात असते अणि प्रेमात शंकेला जागा नसते.

प्रेम म्हणजे प्रेम असते, कोणत्याही नात्यात सेम असतं. मुलीच्या प्रेमापुढे बाबा विरघळतो आणि लग्नाच्या तयारीला लागतो. स्वप्नातून वास्तवात आल्यावर प्रश्न असतो तो पैशाचा. मुलाचे कुटूंब श्रीमंत, त्यांच्या प्रतिष्ठेला साजेल असे लग्न. 

ओह..हे थोडे प्रतिगामी वाटतंय का!!
नाही बरं.. बाप प्रतिगामी /  पुरोगामी नसतो. मुलीपुढे तो बाप असतो. 

अर्थात व्यवहार ही गोष्ट असतेच . लग्नाचा खर्च २५० $ प्रत्येकी. कितीही सुखवस्तू असला तरी विचार करण्याएवढा असतोच. मुलीला कितीही हौस असेल तरी परिस्थिती समजून ती खर्च कमी कसा करावा याच्या गाईड लाईन्स वाचता वाचता झोपी जाते आणि बाबा आपली पर्स उघडी करतो. ह्याचा स्क्रीनप्ले फारच सरळसोट आहे. जे जे घडायचे आहे त्याची नोंद सिनेमात झाली आहे. ते कसे घडतंय हे पाहणे मात्र मनोरंजक आहे.

काही मजेशीर नोंदी:
१) मुलाच्या शिक्षणावरून तो नक्की काय करतो याचा वडिलांना काही अंदाज येत नाही. हा आपल्या मुलीला फसवत तर नाही ना, म्हणून चक्क टीव्ही वर दाखवण्यात येणाऱ्या गुन्हेगारांच्या फोटोत त्याचे नाव आहे का शोधणे किंवा मुलाच्या घरी गेल्यावर, त्याच्या वडिलांचे बँकबुक टेबलावर दिसल्यावर, ते उघडून त्यात किती पैसे आहेत ते पाहणे.
२) एका माणसाचा खर्च २५० डॉलर आहे आणि जवळजवळ सहाशे लोक अपेक्षित आहे हे समजल्यावर नावे कमी करण्यासाठी कारणे शोधणे.
३) मुलीचा आनंद पाहून, तिच्या डोळ्यात फुलणारी स्वप्ने पाहून आपल्या हृदयावर हात ठेवणे ..जणू काही बाहेर येऊ पाहणाऱ्या हृदयाला तो थांबवतो आहे.. 

हा सिनेमा आवडीने बघणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या मनात कुठेतरी जॉर्ज बॅंक्स दडलेला असतो. जो आपल्या मुलांना सायकल शिकवतो. त्यांच्याबरोबर बेस बॉल, बास्केट बॉल खेळतो. जो त्यांना चांगल्या कार्यक्रमांना घेऊन जातो. असा बाबा जो त्याच्या मुलांच्या  नजरेत हिरो असतो.

“फादर ऑफ द ब्राईड” ही बाबाच्या लाडक्या मुलीच्या  लग्नाची गोष्ट आहे. फादर ऑफ द ब्राईड ही लाडक्या मुलीच्या लाडक्या बाबाची सुध्दा गोष्ट आहे. जर तुम्ही एका मुलीचा बाबा असाल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी बनलेला आहे. तुमची मुलगी काहीं महिन्याची आहे का  वर्षाची, त्याने काही फार फरक पडेल असे वाटत नाही. ह्या सिनेमातील कितीतरी क्षण तुम्हाला तुमच्या स्मृतिकोषात घेवून जातील हे निश्चित.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

12 thoughts on “लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट : फादर ऑफ द ब्राईड.  ”

  1. अगदी हळवं करणारा सिनेमा. आणि तुम्ही लिहिलंय पण खूऽऽऽऽऽप खूऽऽऽऽऽप खास. सगळा रिव्ह्यू दोन दोन वेळा वाचला तरीही मन भरत नाहीये. ब ढि या.
    नक्की बघणार

    1. Kamini, Thanks a lot .
      हॉटस्टार वर आहे हा .
      आवर्जून बघ . फार सुंदर संवाद आणि अभिनय
      You will love it .

  2. उदय शेवडे

    आजच्या या खास दिवशी किती छान चित्रपटाची निवड केलीत. काय सुंदर लिहिलंय.

    हा चित्रपट बघितला नाही. या निमित्ताने अवश्य बघणार आहे.

    मुलगी आणि बाबा नात्याचे पदर छान उलगडून दाखवलेत…….भावस्पर्शी लेखन.

    आपल्या बाबांना विनम्र अभिवादन !

    1. हॉटस्टार वर आहे हा .
      आवर्जून बघा . फार सुंदर संवाद आणि अभिनय
      कथा छोटी पण जीव मोठा .
      Thank you Uday.

  3. प्रियादी…..
    खुप हळुवार कोपरा आहे हा, बाबा हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा weakness. तुमच्या बाबा न मनात तुमची काळजी ही अनमोल आहे, मुलगी कायम सतत डोळ्यासमोर राहावी हा बाबांचा अट्टाहास असतो, आमचे बाबा ही असेच आम्ही दोघी कुठ ही गेलो की लगेच बोलवायला यायचे घरी चला.
    किती आठ्वणी असतात मनात आम्ही दोघी आईपेक्षा बाबा न जवळच जास्त असायचो त्यामुळें नकळत त्यांच्या आवडत्या गोष्टी शिकत गेलो, बेस्ट फ्रेंड होते बाबा.
    हा मूव्ही नक्कीच आवडेल बघायला.
    तुम्ही किती छान आहात हो. तुमच्या सोबत राहणारे किती नशीबवान.
    तुमची आजी आई बाबा यांचे संस्कार आहेत हे त्यामुळें इतक्या छान प्रेमळ आहात.

    1. किती गोड़ लिहिलंस
      .मुलींसाठी बाबा हा बरेच काही असतो
      guide , mentor , role model .
      आमचे वाद भरपूर ..but I miss him the most.
      मी अम्मा , आई आणि बाबांचे मिश्रण आहे.
      Thanks dear Anagha.

  4. सुपर्ब सिनेमा । आणि तुझे लेखन नेहमीप्रमाणेच मस्त , एखाद्या शास्त्रीय मैफिलीसारखे । एकेक जागेचे सौंदर्य उलगडून सांगणारे । ब्रिलियंट ।

  5. Anuradha yadwadkar

    खूप सुरेख रिव्ह्यू!
    वाचूनच लगेच ठरवले बघायचा म्हणून.
    रात्री निवांतपणे यूट्यूबवर बघेन.
    दोनदा वाचला..
    तू लिहितेसच इतकं छान की पिक्चर डोळ्यांसमोर उभा राहतो.मग उत्सुकता लागते बघण्याची.🌹🌹🌹🌹🌹.

    1. Oh .Thank you Anuradha.
      तुला तर खूप आवडेल .
      आपल्या पिढीचा सिनेमा म्हणेन मी.

  6. स्टीव्ह मार्टिन अतिशय आवडता💕 त्याच्या लकबी फार उत्तम आणि क्लासिक असतात. जगभरात मुलींचा बाप हा सारखाच . तुझ्या लिखाणामुळे स्टेप बाय स्टेप सिनेमा पाहिल्यासारखा वाटला पण तो लवकरच पाहीन मी आता.

    1. Thank you Roupali.
      स्टीव्ह मार्टिन असे काही करू शकतो हा धक्काच होता
      फार अप्रतिम काम केली
      मला डायना सुद्धा आवडली …A cool mom.
      रोमँटिक कॉमेडी आहे हा तरीही हळवं करतो . .

Leave a Reply to Satyajit R Jog Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *