Skip to content

हरवलेल्या निरागसपणाची गोष्ट,”ओट्टल”.  

बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” असे म्हणतात. बालपण हा प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे; परंतु सर्वांचेच बालपण काही सुखाचे आणि आनंदाचे नसते. मुलं ही देशाचे भविष्य आहे असे आपण मानतो पण आज एकविसाव्या शतकात सुद्धा बालमजुरी ही गंभीर आणि व्यापक समस्या आहे.
ज्या मुलांनी शाळेत जाऊन आपले भविष्य घडवायचे स्वप्ने पाहायची, तीच मुले दारुगोळा, फटाके कारखाने, हॉटेल, वीटभट्टी, घरकाम तसेच  शेती च्या कामात गुंतलेली आढळून येतात. या मुलांचे बालपण तर कोमेजून जातेच शिवाय बरीचशी मुले  शारीरिक आणि आर्थिक शोषणाची बळी होतात. त्यांचे कामाचे तास ठरलेले नसतात. शिक्षणाची संधी हिरावली जाते. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते. भविष्य उध्वस्त होते.
सर्वात वाईट म्हणजे लहान वयात आलेल्या या अनुभवांनी नकळत्या वयातच मूल आपली निरागसता गमावते.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेला, पारितोषिक प्राप्त ओट्टल हा मल्याळम सिनेमा ही अशीच एका हरवलेल्या निरागसतेची गोष्ट. 

काही गोष्टी कालातीत असतात. अन्याय, दुःख, निराशा या भावनांचा पोत ही तसाच. आज एकशे तीस वर्षांनीं सुद्धा तेवढाच रखरखीत.
ओट्टल ह्या सिनेमाची प्रेरणा आहे एकोणिसाव्या शतकातील, आन्तोन चेखव या रशियन लेखकाने लिहिलेली कथा “वांका “
नाताळचे दिवस आहेत. जग, येशूचा जन्म दिवस साजरा करण्यात मश्गूल आहे.  मात्र बाहेरच्या रोषणाईचा अंधुकसा प्रकाश सुद्धा, मॉस्को येथील बूट बनवायच्या कारखान्यात येत नाही. येथेच नऊ वर्षाचा,वांका झुकॉव्ह, शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला आहे. कारखान्याच्या मागच्या भागात आता कुणीही नाही. सगळेच जण चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले आहेत.
वांका कपाटातून शाईची बाटली काढतो. एक चुरगळलेला पेपर आणि त्यावर चिमुकल्या हाताने लिहिलेली अक्षरे त्याचे भविष्य ठरवणार आहेत.
प्रिय आजोबा, 
कागदावर अक्षरे उमटत जातात आणि वांकाचे मन मात्र  भूतकाळात त्याच्या आजोबांच्या गावात भिरभिरते.

“ओट्टल” हा सिनेमा, एकोणिसावे शतक ओलांडून एकविसाव्या शतकात आपली कथा मांडतो, काळाबरोबर जागाही बदलते.रशियाची जागा भारतातले केरळ राज्य घेते. वांकाची भूमिका करतो कुट्टप्पाई  आणि त्याचे आजोबा आहेत वाल्याप्पाचायी. 
कुट्टप्पाईचे आईवडील, कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेल्याने, आत्महत्या करतात. कुट्टप्पाई मात्र वाचतो. हा आठ वर्षाचा अनाथ मुलगा गावात राहणाऱ्या आपल्या आजोबांकडे राहायला येतो.
आजोबांची स्वतःची जागा नाही. जिथे रोजगार मिळेल तिथे ते राहतात. जेव्हा काम संपते, तेव्हा कामाच्या शोधात दुसरीकडे स्थलांतर करतात. गावात बदकांची शेती होते. इथे ते रोजगारावर काम करतात. बदकांचे अन्न म्हणजे किडे. हे अन्न संपले की दुसऱ्या जागेच्या शोधात अशी ही आयुष्यभराची वणवण पाठीशी लागलेली आहे.

तलावात पोहणाऱ्या बदकांकडे आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कुट्टप्पाईला पाहून, आजोबांचा मालक, त्याला फटाक्यांच्या कारखान्यात पाठवण्याचा सल्ला देतो.
“हेच तर वय आहे शिकण्याचे आणि कमाई करण्याचे”
आजोबा दुर्लक्ष करतात पण पुढच्या भविष्याची ती नांदी असते.
कुट्टप्पाई इथे रमतो.
हा मुलगा गरीब आहे, शाळा सुटल्याने शिक्षण मिळण्याचा मार्ग बंद आहे पण तो हुशार आहे, सर्जनशील आहे, समजूतदार आहे. स्वतःच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे पण तिच्याशी त्याने जुळवूनही घेतले आहे.

निसर्गाच्या सानिध्यात आणि आजोबांच्या कुशीत त्याचे पोरकेपण संपते. इथेच त्याची ओळख त्याच्याच वयाच्या मुलाशी  होते. वय सारखे पण परिस्थितीत बरेच अंतर असते. तरीही हा फरक मैत्रीच्या आड येत नाही. हा मुलगा टिंकू एका मोठ्या बंगल्यात राहतो, मोठ्या शाळेत शिकतो पण त्याला कुट्टप्पाईची ओढ असते. कुट्टप्पाई हुशार असतो. टिंकूला तो अभ्यासात सुद्धा मदत करतो.
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आजोबा आणि नातू एकमेकांच्या सोबतीने आपले विश्व निर्माण करतात. त्यात रमतात पण यालाही कुणाची तरी नजर लागते.
आजोबा आजारी पडतात. त्यांच्या लक्षात येते की  आता फारच थोडा वेळ उरला आहे. आपल्या नंतर कुट्टप्पाईचे काय होणार ही चिंता त्यांना भेडसावू लागते. त्यांच्या मालकाला सांगून, ते कुट्टप्पाईला फटाक्यांच्या कारखान्यात पाठवतात. बिचाऱ्या कुट्टप्पाईला याची कल्पना नसते. त्याला वाटते, आपण शाळेत जाणार आहोत.
त्याच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना त्याच्या आजोबांनाही नसते.
चित्रपटाचा विषय खूप संवेदनशील आणि वास्तववादी आहे. बालमजुरी हा विषय एकविसाव्या शतकात सुद्धा चर्चिला जावा हे खरेतर दुर्दैवी आहे. ओट्टल म्हणजे  पिंजरा. परिस्थितीच्या तडाख्याने कुट्टप्पाईचे आयुष्य जखडून गेले आहे.  तरीही हा सिनेमा मेलोड्रामा होत नाही. 
सिनेमाचा विषय आहे, तो आणि त्याच्या आजोबांमध्ये फुलत गेलेले नाते. त्याला केरळ मधील नयनरम्य खेड्याची पार्श्वभूमी आहे.
आधुनिकतेचा  स्पर्शही न झालेल्या  या खेड्या प्रमाणेच येथील माणसंही साधी सरळ आहेत.
यात  काही  प्रसंग अतिशय सुंदर घेतले आहेत. एक दिवशी कुट्टप्पाई, टिंकूला आपल्या घरी जेवायला बोलावतो. त्याच्यासाठी खास मासे पकडून आणतो. त्याचे आजोबा, खपून जेवण बनवतात. केळीच्या पानाने भांडी झाकून दोघेही टिंकूची वाट पाहतात पण टिंकू येत नाही.
कुट्टप्पाई खट्टू होतो.
“ गरिबाघरचे अन्न श्रीमंतांना पचत नाही रे” वाक्य टोचणारे पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, आजोबा कुट्टप्पाईला गुदगुल्या करून हसवतात.
आजोबा आणि नातवामधला बंध अतूट आहे. तो त्यांच्या खोड्या काढतो, त्यांना प्रश्न विचारतो, मस्ती करतो.ते त्याच्या प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. कामांमधून त्याला जगाची ओळख करून देतात. आजोबा तसे अबोल आहेत पण नातवाशी खेळताना, त्याला खोटे खोटे  रागावताना, त्याचा एकटेपणा दूर करताना,  दाट मिशांच्या मागून एक प्रेमळ चेहरा नजरेस पडतो.

टिंकू लहान आहे. जगाच्या व्यवहारापासून कोसो दूर आहे. कुट्टप्पाई, त्याला एक प्रोजेक्ट बनवून देतो. ज्याला राज्याचे प्रथम पारितोषिक मिळते. बक्षीस घेताना, टिंकूचे डोळे कुट्टप्पाईच्या आठवणीने भरून येतात.
लहान मुलांच्या हातात परिस्थितीशी लढायचे बळ नसेलही पण एकमेकांविषयी असलेले अकृत्रिम प्रेम, जिव्हाळा प्रेक्षकांच्याही काळजाला हात घालतो.
सिनेमातील पात्रे सुद्धा वास्तववादी आहेत. त्यातली काही सहृदयी आहेत, मदत करायची त्यांची मनापासून इच्छा आहे. टिंकूच्या आईला कुट्टप्पाईबद्दल आस्था आहे पण तिच्या हातात कसलीही सूत्रे नाहीत.
बदकांची अंडी बदके उबवत नाहीत, त्याच्यासाठी कोंबड्यांचा उपयोग केला जातो आणि काम झाल्यावर त्यांना हुसकावून लावले जाते. आयुष्यात बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याचे जरी शिक्षण घेतले तरी  गरिबांच्या पदरात शुन्य असते ही जगाची रीत इथेही प्रत्ययास येते.

वासुदेवन या नटानी आजोबांचा रोल वठवला आहे.सत्तर वर्षाच्या नटाचा हा पहिलाच रोल. त्यांचा व्यवसाय मासेमारी. खेड्यात चित्रीकरणाची तयारी चालू असताना, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची, जयराज यांची वासुदेवन यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आपले आजोबा सापडले. 

हीच गोष्ट, मुलाची भूमिका करणाऱ्या अशांत शाह याची. तो सुद्धा  रूढार्थाने अभिनेता नाही. मात्र आपली भूमिका त्याने समजून निभावली आहे. मूळ  रशियन कथेचा शेवट फार दुःखद आहे पण  ह्या सिनेमाचा  शेवट मात्र आशेचा  किरण  दाखवतो. .

फटाक्यांच्या  कारखान्यात  खितपत पडलेला कुट्टप्पाई आपल्या आजोबांना पत्र लिहितो  स्वतःची परिस्थिती सांगून, परत यायची इच्छा व्यक्त करतो. ज्या गावात कधीच कोणतेच पत्र येत नसते, तिथे मात्र हे पत्र पोचते आणि कदाचित कुट्टप्पाईचा वनवास संपेल या सकारात्मक विचारावर हा सिनेमा संपतो.
केरळ मधील कुट्टनाड येथे  सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. नजर जाईल तिथपर्यंत शांत निळसर जलाशय, किनाऱ्यावरील झाडांचे पडलेले प्रतिबिंब, स्वतःच्याच जगात रममाण झालेली काळी करडी बदके, त्यांच्या आयुष्याच्या दोऱ्या कोणा भलत्याच्याच हातात आहे पण त्याची  त्यांना जाण नाही, किनाऱ्यावर बांधलेलं मचाण आणि तिथून दिसणारा सूर्यास्त.
दिसणारे  जग सुंदर आहे पण  सिनेमाच्या  मूडला अनुसरून कॅमेराने त्याला गढद रंग दिला आहे.
एम जे राधाकृष्णन यांनी जे टिपले आहे त्याला  तोड नाही.
हा लहान मुलांचा चित्रपट आहे पण ही परीकथा नाही. या कथेला उत्तर नाही. जे घडते आहे ते इतके सहज आहे, वास्तविक आहे त्यातली अपरिहार्यता गळ्यात आवंढा आणते.
कथेच्या शेवटी बदकांचा कळप किड्यांच्या शोधात दुसऱ्या भागात जातो आणि स्थलांतरित पक्षी आपल्या गावाला परत जातात आणि आपले मन मात्र कुट्टप्पाईच्या परतणाऱ्या छोट्याश्या पावलांचा वेध घेते. 
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा सिनेमा युट्युब वर पाहण्यास उपलब्ध आहे. 

टीप –आज १२ जून. बालमजुरांच्या शोषणाविषयी जागरूकता निर्माण करणे यासाठी हा दिवस समर्पित आहे.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.



Tags:

12 thoughts on “हरवलेल्या निरागसपणाची गोष्ट,”ओट्टल”.  ”

  1. विदुला

    प्रिया,
    नेहेमी प्रमाणे च अप्रतिम परीक्षण.
    ❤️
    तुझ्या मुळे भाषा भगिनी भेटतात.
    वेगळे चित्रपट कळतात.

    1. Thank you Vidula. हा सिनेमा युट्युब वर आहे ..with subtitles
      तुला खूप आवडेल

  2. हा ब्लॉग वाचण्यासाठी आतुरतेने वाट बघत असते. Anton Chekhov ची कथा खूप करूण शेवट असणारी आहे. हा सिनेमा मात्र नक्की बघावा असा आहे हे या परीक्षणावरून नक्कीच कळते.
    केरळच नाही तर आंध्र, तमिळनाडू राज्यातील बालकामगार हा प्रश्न खूप विदारक आहे. शिवाकाशी येथे तर घराघरातून जबरदस्तीने मुलं कामाला नेली जातात फटाक्यांच्या कारखान्यात. बालकामगारांना यातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणे शक्य असूनही राज्यसरकार दुर्लक्ष करते हा अनुभव आहे तिथला. फार सुरेख लिहिलंय. नक्की नक्की बघणार. असेच एक से बढकर एक परीक्षण वाचावयास मिळू देत.

    1. Thank you so much Kamini.
      अशा प्रतिक्रिया लिहायला उद्युक्त करतात.
      निदान आठवड्यातून एखाद्या चांगल्या सिनेमावर लिहायचा विचार आहे.
      हा सिनेमा बघ .youtube वर आहे.
      तू म्हणतेस ते खरे आहे ..इथे धारावी मध्ये सुद्धा जरी च्या कारखान्यात मुलं डांबून ठेवतात …
      कमी पगारावर राबवून घेतात …त्यात एका खोलीत कोंडणे ..त्याने किती आजारी होऊन मरतात …दुर्दैव

      1. Shraddha Kandalgaonkar

        Priya,
        नक्कीच बघेन मी हा सिनेमा..तुझे लिखाण नेहमीप्रमाणे मनाची पकड घेणारे

  3. मस्त लिहिलंस ..👌
    एक वेगळ्या सिनेमाची ओळख..

    1. Vaishali, Thank you .
      हा बघ ..नेहेमीपेक्षा फार वेगळा .
      आपण खूप गोष्टी गृहीत धरतो ..हे असे दुःख तर माहित ही नसते .. आपली ओंजळ भरलेली आहे हे असे चित्रपट दाखवून देतात .
      अप्रतिम सिनेमा आहे.

  4. Human bondage is unavoidable. However, childhood must be celebrated as a crown jewel of civilization. नंतर सगळं आहेच…’गमन’ सिनेमा आठवला… आजकाल अपेक्षा, स्पर्धा यांच्या ओझ्याखाली दबलेली मध्यमवर्गीय मुलंही एकप्रकारे कुटप्पाईच… तेही child labour च. भरचौकात कडाक्याच्या उन्हात खेळ करणारी डोंबारी मुलंमुली, traffic signal वर पैसे मागणारी लहान मुलं, उपहारगृहात काम करणारे ‘पो-या’ लोक…Child labour is ubiquitous. पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत तर ‘बच्चाबाजी’ हा भयंकर प्रकार चालतो. तिथं आणि इथेही मदरशांत अल्पवयीन मुलांचं शोषण होतं अशा बातम्या माध्यमातून कानावर पडतात. Child trafficking मोठी समस्या आहेच. At certain stage of being life interests much more than art.

    1. जगणे कठीण झाले आहेच
      भरमसाठ लोकसंख्या , आणि साधने मूठभर लोकांच्या हातात .
      त्यात असे दुर्दैवी जीव भरडले जाणार …शक्य होईल तेवढे आपल्या हातून करावे ..
      निदान आपल्या कडे काम करणाऱ्या लोकांच्या मुलांचे तरी जमेल तेवढे ..
      मध्यम वर्गीय मुलं सुद्धा पोळली जाणे हा मुद्दा सुद्धा खरंच भयंकर आहे.

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *