Skip to content

मराठी पाऊल पडते पुढे. 

स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ ब्रिटिशांबरोबर केलेला लढा असं म्हणता येणार नाही. परकीय, जुलमी सत्तेविरुद्ध असंख्यांनी बंड केली. उठाव केला. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा केलेला विचार म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत घेतलेलं  सतीचे वाण. मध्ययुगीन राजवटीत सुलतानाला विरोध म्हणजे प्राणाशी गाठ, परंतु स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने मूठभर मावळ्यांच्या साथीने, राजांनी या भमीवर भगवा फडकावला. 

अनेक शतकांच्या काळरात्रीनंतर स्वराज्याचा उषःकाल येथील रयतेला बघता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं  लोककल्याणकरी रयतेचा राजा या भूमीला मिळाला. शिवकालावर आजवर मराठीत अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. यात भालजी पेंढारकर हे नावं  अग्रक्रमी आहे.

 कोणी किर्तीसाठी, कोणी मनोरंजनासाठी, कोणी आर्थिक फायद्यासाठी चित्रपट काढतात पण भालजी यांच्या चित्रपटाला वैचारिक अधिष्ठान होते. पारतंत्र्याच्या काळात स्वराज्याची स्फूर्ती आणि स्वराज्य मिळाल्यावर सुराज्याची प्रेरणा यासाठी त्यांनी चित्रपट माध्यमाचा उपयोग केला. आपल्या या उद्देशाचे स्मरण राहावे म्हणून त्यांचा प्रत्येक चित्रपट महाराष्ट्र गीताने सुरु होई. भालजींच्या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन जेव्हा दिल्लीला झाले , तेव्हा केंद्रीय नभोवाणी मंत्री वसंत साठी यांनी म्हंटले आहे , “ आम्ही जो इतिहास शिकलो , तो पुस्तकांपेक्षा यांचे चित्रपट पाहिल्याने. उज्ज्वल इतिहासाचे एक एक पान  पाहताना असे वाटे आपणही नेताजी पालकर व्हावे, तानाजी व्हावे , बाजीप्रभू व्हावे नी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करावे. त्यांच्या चित्रपटामुळे छत्रपती शिवरायांचे कार्य आमच्या नजरेसमोर उभे राहिले आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. 

भालजींच्या कार्याला दिलेली ही मोठी पावती आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज हे भालजींचं  आराध्य दैवत. त्यांच्या चिंतन, मनन व पूजनाद्वारे त्यांना कार्याची दिशा व प्रेरणा मिळाली. .शिवकार्याच्या  प्रचारासाठीच त्यांनी आपली वाणी, लेखणी वाहून घेतली आणि चित्रपट निर्मिती केली. त्या चित्रपटातील एक सोनेरी पान म्हणजे “ मराठा तितुका मेळवावा “ हा चित्रपट.

चित्रपटाला सुरुवात होते ती आदीलशाहीच्या जुलमी राजवटीत होरपळलेल्या जनतेच्या दृश्यांनी. कुणाची जमीन बळकावली जात आहे तर कुणाची गुरे ओढून नेली जात आहेत. लेकीबाळींची विक्री होते आहे. रयतेला वालीच नाही. राखणाराच जर तळे चाखत असेल तर तक्रार कुणाकडे करणार! गावच्या गावे ओस पडतात.
देवाला साकडे घातले जाते.
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतुन मावळ देवा , देऊळ सोडून धाव रे

हा टाहो देवाच्या कानावर गेलाच असावा.
या  परिस्थितीत पुणे आणि सुपे येथील आपल्या जहागिरीचा कारभार एक चौदा वर्षाचा मुलगा आपल्या हातात घेतो. वय लहान पण त्याची स्वप्ने मात्र मोठी असतात. एका छोट्याश्या जहागिरीचा कारभार पाहाताना हिंदवी स्वराज्याचे भव्य स्वप्न त्याच्या नजरेसमोर तरळू लागते. जीवाला जीव देणारे साथीदार असतात आणि पाठीवर हात असतो तो प्रत्यक्ष आदी शक्तीचा.
देव्हाऱ्यात तिची मूर्ती त्याला आशीर्वाद देत असतेच पण तिचेच रूप, त्याची आई बनून त्याच्या पाठी भक्कम उभी असते. 

“राजेपण नावात नसते, केवळ राजे म्हणून कुणी राजा होत नाही. भूमीचे आणि प्रजेचे पालकत्व जो निभावतो तो खरा राजा”
जिजाऊंच्या मुखातून राज्यशास्त्र, नीती शास्त्र बोलते. बाल शिवाजीचा, छत्रपती शिवाजी महाराज होण्याकडे प्रवास चालू होतो .
अवघ्या चौदा वर्षाचे राजे रोहिडेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात. बरोबर असतात जेधे, पासलकर, मालुसरे सारखे त्यांचे जीवलग. हे सतीचे वाण याची कल्पना असतेच पण आता माघार घ्यायची नाही हा निर्धार असतो.
आता टाकायचे असते ते पहिले पाऊल. राजांना तोरणा किल्ला खुणावतो.
रोहिडेश्वर ते तोरणा स्वारी हा कालखंड “ मराठा तितुका मेळवावा “ह्या चित्रपटात चित्रित केला आहे. 

या सिनेमातील एक महत्वाची व्यक्तिरेखा भाव्या. राजांचा निष्ठावान मावळा. काशिनाथ घाणेकर यांनी ही भूमिका केली आहे.एकीकडे बाल  शिवाजीची  स्वराज्य उभारणी नी दुसरीकडे त्यांच्या मावळ्याची त्यांना मिळालेली साथ भालजीं पेंढारकरांनी उत्कटतेने चित्रित केली आहे. शिवाजी महाराजांनी पाहिलेलं  स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी असंख्य लोकांनी आपले प्राण पणाला लावले.. कसल्याही लोभाला, मोहाला बळी न पडता पराक्रमाची शर्थ करून या धरतीवर स्वराज्य निर्मिले. राजांच्या विचारांनी भारलेल्या मावळ्याचा हा प्रवास म्हणजे , 

“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती , 
देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती “ 

ते गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. नसानसात जोश भरणारी ही कविता इतकी आवेशपूर्ण आहे की ऐकणाऱ्याचे  हृदय अभिमानाने भरून यावे! या गीताच्या गीतकार आहेत प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके. खुद्द लता मंगेशकर यांनी या गीताला संगीत दिलं  आहे आणि स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.  हा एक सुरेल योगायोग आहे. 

 मराठा तितुका मेळवावा या सिनेमात अजून एक सुरेल वीर गीत आहे . 
तोरण गडावर स्वराज्याचे तोरण बांधायचा निश्चय शिवाजी राजे करतात. ते तडीला नेण्यासाठी स्वतः उतरतात. त्यावेळी त्यांच्या वाट्यात आलेलं विघ्न, भाव्या, आपले प्राण धोक्यात घालून दूर करतो. तोरणा सर होतो नी कानावर मंजुळ सूर पडतात . 

स्वराज्य तोरण चढे 
गर्जती तोफांचे चौघडे 
मराठी पाऊल पडते  पुढे .. 

यातला सुरुवातीचा श्लोक समर्थ  रामदास यांचा आहे असा समज असला तरी याची रचना शांताबाई शेळके यांचीच आहे. संगीत आहे लता मंगेशकर. आनंदघन या नावानी त्यांनी काही मोजक्या सिनेमांना संगीत दिले. त्यांचा हा अतिशय गाजलेला सिनेमा .
सिनेमात जिजाऊंची भूमिका सुलोचना यांनी केली. या नंतर  अनेक कलाकारांनी ही भूमिका वठवली आहे पण सुलोचना बाईंचा ठसा कुणालाही पुसता आला नाही.

शालीन, सात्विक , घरंदाज सौन्दर्य असलेल्या या चेहेऱ्याने जिजाबाईंच्या व्यक्तिमत्वाला चेहेरा दिला. शिवाजी राजांची आई ते  हिंदवी  स्वराज्याची राजमाता  एवढा मोठा कॅनव्हास असलेले हे  इतिहासातील व्यक्तिमत्व उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले.
राजे आणि त्यांचे जे संवाद आहेत त्यातून त्यांची धर्मावरची निष्ठा, अन्यायाची चीड, प्रसंगी हातात शस्त्र घेऊन शत्रूपुढे उभे राहण्याचे धाडस, रयतेविषयी माया , आश्रय मागायला येणार्यांना निवारा द्यायची उदारता, मुलाविषयी वाटणारा अभिमान, काळजी, माया आणि त्याच बरोबर तो भावी राजा आहे हे जाणून त्याची केलेली जडणघडण … ह्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या अभिनयातून समर्थपणे दाखवल्या.
जिजाऊ म्हणून त्यांना पडद्यावर पाहताना सुलोचना लाटकर यांना प्रत्यक्ष जिजाऊंनी आशीर्वाद दिला असावा असे वाटते एवढी ताकदीची ही भूमिका आहे.
या वर्षाच्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाली. इतिहासात शिवरायांचा राज्याभिषेक पाहून तृप्त मनांनी जिजाऊंनी डोळे मिटले आणि आता वर्तमानात राज्याभिषेकाच्या ३५० व्या स्मृतिदिनी पडद्यावरील जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला.

ह्या सिनेमाशी संबंधित निर्माता दिग्दर्शक भालजी पेंढारकर, कलाकार चंद्रकांत गोखले,  काशिनाथ घाणेकर आणि सुलोचना ही माणसे काळाच्या पडद्याआड गेली पण त्यांची निर्मिती मात्र अजरामर आहे .
(सिनेमा YouTube, Dailymotion या प्लॅटफॉर्म वर पाहायला उपलब्ध आहे. प्रिंट थोडी फिकट असेल तरीही कुठेही outdated वाटत नाही)

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner.

16 thoughts on “मराठी पाऊल पडते पुढे. ”

  1. उदय शेवडे

    सुरेख लेख !
    भालजी आणि सुलोचना यांच्यावर उचित भाष्य !

        1. Mrs smita dewappa Kokitkar

          सुलोचना दीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  2. Ashvinikumar Haldankar

    सुलोचना दीदींना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली…महाराजांचा 350 वा राज्याभिषेक पाहून जिजाऊ गेल्या हि भावना अतिशय आवडली.
    ताई तुमचे लिखाण 🙏

  3. अतिशय सुरेख लेख. सगळं विवेचन पुन्हा पुन्हा वाचावेसे असे. यातील कलाकारांना दिलेली शब्दांजली फारच छान. सुलोचनाबाईंसाठी तर खूप खास. मस्त👌👌👌

    1. youTube वर आहे . टेकिंग जुने असेल तरी अभिनयामुळे मस्त वाटतो सिनेमा
      .मुद्दाम बघ ग .
      Thank you Kamini.

  4. काय सुरेख लिहिले आहे. हा सिनेमा त्यातील कलाकार आणि अप्रतिम गाणी खरंच अजरामर आहेत. 😊

    1. Thank you so much Mrunal . कुठेही हा जुना वाटत नाही .
      शेवटचे दृश्य तर पाहून मन भरून येते .

Leave a Reply to Mrs smita dewappa Kokitkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *