Skip to content

मेरी आँखो में बस गया कोई रे.


उन्हाळ्याची सुट्टी पडली होती आणि रविवार होता. दूरदर्शनवर कसला तरी भंकस सिनेमा म्हणून आम्ही मैत्रिणी फिरायला जात होतो. अचानक “रात और दिन” चे टायटल सॉंग कानावर पडले. तळमजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीतून डोकावून पहिले तर गाण्यावर थिरकत असलेली नर्गिस. 
“अरेच्चा, हा सिनेमा कसा काय लागला?”  मी खिडकीतूनच विचारले.
“नर्गिस गेली …” 
आम्ही त्याच पावली माघारी आलो.
रात और दिन सिनेमा बरोबरच श्रद्धांजली, चर्चा, तिच्यावरील स्तुतिसुमने, तिच्या अंत्य यात्रेचे दर्शन आणि सुनील दत्तच्या बरोबरीने तिची शवपेटी उचलून चालणारा राज कपूर, दूरदर्शन नर्गिस मय झाले होते.

राज कपूर माणूस म्हणून मला कधीच समजला नाही  पण नर्गिस राज ही जोडी मात्र आवडली. त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट, त्यांची अभिनयाची जुगलबंदी सगळेच आवडले.


ते कदाचित आभासी असेल, पण तिचा त्याच्यावरील विश्वास, प्रेम, तिचा प्रामाणिकपणा, तिचे समर्पण आणि तिची vulnerability जी फक्त त्याने पाहिली  असेल; ते सगळे अगदी खरे होते. ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या सिनेमात दिसते.  नर्गिस गेली आणि राज कपूरच्या सिनेमातील सत्य आणि पावित्र्य ही गेले, राहिली ती फक्त नग्नतेच्या स्वरूपातील भेसूर सुंदरता.
आर के शी फारकत घेतल्यानंतर,मदर इंडिया, रात और दिन सारखे काही उत्तम सिनेमा तिने दिले पण नर्गिसमधली प्रेयसी आर के बरोबर संपली. ती नजाकत, ती कोवळीक, ते नाशिलेपणा, संपले. आपले आयुष्य तिने उभे केले खरे पण बरेच काही गमावून.
स्त्री आणि पुरुषांच्या नात्याला अनेक पदर असतात.ती अत्यंत चांगली पत्नी होती, आई होती. समाज सेविका म्हणूनही तिने आपला ठसा उमटवला. भावनांची कोवळीक मात्र सिने-कारकीर्दीबरोबर अस्ताला गेली.
काल एक जून. ती असती तर चौऱ्याण्णव वर्षाची झाली असती. 
माणसांच्या भावना जाणून घेण्यात नियतीला इंटरेस्ट नसावा नाहीतर दोन जून हाच दिवस राज कपूरने एक्झिट घ्यायला निवडला नसता. माणसाच्या निधनानंतर, जन्मतिथी की पुण्यतिथी ह्या गोष्टींना अर्थ नसतो. त्यांचे स्मरण होते तेवढेच खरे. एक जूनला न विसरता नर्गिस आठवते आणि दुसरा दिवस उजाडला की नुसताच राज नाही तर नर्गिस-राज ही जोडी आठवते.
त्या दोघांची ही गाणी.

जाने न नज़र पहचाने जिगर,ये कौन जो दिल पर छाया
(सिनेमा-आह, शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, लता मंगेशकर -मुकेश) 


मुकेश लक्षात  आहे  ते त्याच्या दर्दभरी  गीतांमुळे. खरेतर खाजगी आयुष्यात अतिशय हसतमुख अशी  त्यांची प्रतिमा होती.  मित्रात रमणारे, कुणाशीच शत्रुत्व  नसणारे असे अजातशत्रू व्यक्तिमत्व. मी तुमच्यासारखे  गाऊ शकणार नाही असे रफींना त्यांनी मोकळेपणे सांगितले  होते.
या व्यक्तिमत्वाला  शोभून दिसतील अशीही काही लोकप्रिय गीते आहेत. राज कपूरचा आवाज असल्याने आणि त्या गीतांना शंकर जयकिशन यांचा परिसस्पर्श झाल्याने ही  गाणी अभिनय आणि सूर यामुळे श्रवणीय तर आहेत शिवाय प्रेक्षणीय सुद्धा  आहेत.

आवाज़ ये किसकी आती है, जो छेड़ के दिल को जाती है
मैं सुन के जिसे शर्मा जाऊं, है कौन जो दिल में समाया
मेरा अंग-अंग मुस्काया

“आह”  सिनेमात एका अपघाताने आणि गैरसमजाने दोन जीव भेटतात.  आजच्या काळात व्हिडीओ कॉल सहज होत असल्याने  जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेली माणसे सुद्धा एकमेकांना पाहू शकतात पण पन्नाशीच्या  दशकात हे शक्य नव्हते. पत्र पाठवले जाते एकीला जिला त्याच्यात काहीही खास दिसत नाही पण त्या पत्राची भाषा, त्यातील काव्यात्मकता, सच्चाई यामुळे कुणी दुसरीच आकृष्ट होते. स्वतःची  ओळख लपवून पत्राचे उत्तर देते.
योग्य त्या ठिकाणी पत्र न पोचल्याचे समाधान नियतीला  वाटल्याने, ती या खोटेपणाला मंजुरी देते आणि दोन अनोळखी जीव प्रेमाच्या नाजूक धाग्यात अडकतात.
हे गाणे खट्याळ आहे. भिजलेले नायक नायिका, एक खोली, एकमेकांना पाहण्यापुरताच मध्ये असलेला कंदिलाचा उजेड आणि चेहेऱ्यावरील संकोच, मिस्कीलपणा, थोडीशी धिटाई आणि आतुरता
हे गाणे, त्याचे  चित्रीकरण म्हणजे डोळ्यांना आणि कानांना मेजवानीच.  

अंदाजचे चित्रीकरण सुरु होताना राज आणि नर्गिस प्रेमात पडले. तो विवाहित होता, ती अतिशय लोकप्रिय होती.प्रेमात पडणाऱ्या दोन व्यक्तींना त्याचे भान नव्हते. राज कपूरने आपल्या चित्रपट कारकिर्दीला नुकतीच सुरुवात केली होती. सिनेमा त्याच्या आयुष्याचा महत्वाचा भाग होता. अभिनय, दिग्दर्शन, संगीताचा कान, कथेची जाण, त्याचे वेगळे विषय, निर्मिती उत्कृष्ट व्हावी म्हणून घेतलेला ध्यास ..
असंख्य पैलू आणि कारणे देता येतील तिच्या प्रेमकहाणीला.

जो मैं जानती उन के लिये
मेरे दिल में कितना प्यार ऐ
इतना प्यार मैं करती क्यों!!
आह सिनेमातले हे गीत नर्गिसला पडलेला प्रश्न असणार.

इतना प्यार मैं करती क्यों
(आह-शैलेंद्र-शंकर जयकिशन-लता  )

दोन उत्कट आणि संवेदनशील कलाकार जेव्हा काहीतरी उत्तम करण्याच्या ध्यासाने एकत्र येतात, तेव्हा हे आकर्षण फक्त शरीराचे नसते. तुमचे ध्येय, तुमच्या आकांक्षा, आयुष्याकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा या सर्वांचे प्रतिबिंब तुम्हाला त्या व्यक्तीत सापडते. दुसऱ्याच्या डोळ्यात स्वतःची ओळख पटणे अनपेक्षित असते. तू आणि मी एकच आहे हा साक्षात्कार झाला की आड वळणाने प्रेम सुद्धा तुमच्या आयुष्यात धडकतं.
आह या सिनेमाची नायिका सुद्धा असे न ठरवता  पेमात पडते. राज बहादूर हा खरेतर तिच्या बहिणीचा पेनफ्रेंड. तिच्या वतीने त्याला पत्रे  लिहिताना कधीतरी दोघे समोरासमोर येतात. तिच्या पत्रातून त्याला ती आवडलेली असतेच, समोर  आल्यावर ते आकर्षण जास्तच गढद होते. तिच्यासाठी मात्र प्रेमात पडणे म्हणजे बहिणीशी प्रतारणा.

जो मैं सोच समझ के चलती, हद से बात गुज़रती क्यों
अन्जाने नयनओं से उलझ के, जीते जी मैं मरती क्यों
इतना प्यार मैं करती क्यों

प्रेमाचा  बाण तर जखम करून गेला आहे. आता परत फिरणे अशक्य आणि  त्याला खरी ओळख देणे हे  सुद्धा अडचणीचे.
ही वाट एवढी कठीण आहे असे समजले असते तर पाऊलच ठेवले नसते असे मनात येते तिच्या ..

आग या सिनेमापासून केवळ आर के बॅनर्सची सुरुवात झाली नाही तर या बॅनरने पडद्यावरील एका उत्कट जोडीला जन्म दिला. नायक नायिकांची प्रेमप्रकरणे सिनेसृष्टीला नवीन नव्हती पण यातील काही प्रेमकथा सिनेमात आणि लोकांच्या हृदयात अमर झाल्या . बरसात सिनेमातली, भर पावसात राजच्या हातावर विसंबलेली, आवेगाने थरथरणारी नर्गिस, सिनेप्रेमींच्या आठवणीतून पुसली जाणे शक्य नाही. Pure passion was unleashed for the first time on the screen.
बरसात, आवारा, श्री ४२०, चोरीचोरी आणि कोणत्याही सिनेमातील त्यांची प्रेमगीते, प्रेमदृश्ये याची साक्ष देतील .
आवारा सिनेमातील “दम भर जो इधर मुह फेरे “ हे गीत तर व्हॅलेंटाईन दिवसाचे प्रतीक गीत म्हणून ठेवायलाही हरकत नाही.

.दम भर जो इधर मुह फेरे ,ओ चंदा
(आवारा- शंकर जयकिशन — लता –मुकेश )

काय मजा आहे पहा! शेकडो गाण्यात चंद्राचा निरोप्या म्हणून, वाटाड्या म्हणून उपयोग करून घेतला आहे; पण इथे मात्र ती म्हणते ,
“आज पहिल्यांदाच मी माझ्या प्रियकराला  भेटते आहे. त्या क्षणाला  तुझीही उपस्थिती नको आहे मला. जा, ढगामध्ये लपून बस.”

अर्थात बोलणे वेगळे कारण शब्दांना धैर्य असते पण मनाला नाही . तिची हया, शरम तिच्या उत्कटतेला अटकाव करत आहे!
तो मात्र आहे चोर, त्यात आधीच बदनाम आहे.  त्याला सवय आहे चोरण्याची मग हृदय चोरणे कस काय अपवाद असेल?
तो सांगतो,
मै चोर हुं काम है चोरी ,दुनिया में हुं बदनाम
दिल को चुराता आया हूँ ,ये ही मेरा काम …. 

उलट आवाहन करतो तो चंद्राला …

आना, तू गवाही देने, ओ चंदा …
मै उनसे प्यार कर लुंगा, बाते हजार कर लुंगा …

इथे” प्यार”चा अर्थ हिंदी सिनेमाने बदलला. आधीच्या काळातील, चार हातावर उभे राहून केलेले प्रेम बदलले.
रात्रीच्या चंद्रप्रकाशात एका छोट्याश्या बोटीवर याचे चित्रण आले आहे. कामुकता या शब्दाचा अर्थ पडद्यावर पाहायचा असेल तर हे चित्रीकरण पाहावे. It sets the screen on fire. नर्गिसचे डोळे किती बोलतात. लाज, आकर्षण, आतुरता. नजरेत किती भावना लपला आहेत तिच्या  आणि राज कपूरची ती बेदरकार नजर.  त्याचे तिला हात पिरगळवून जवळ खेचणे सुद्धा नवीन …
“आवारा”  या शब्द जिवंत झाला आहे इथे.
उत्कटता, आतुरता शब्दात आहे, अभिनयात आहे.  शब्द, अभिनय, सूर सगळंच जुळून आले आहे या गीतात . 

आता काही दिवसांत पाऊस येईल. वारा, गारा, कणीस आणि भज्यांबरोबर “प्यार हुआ इकरार हुआ है” हे गाणे सुद्धा मनात रुंजी घालेल.
हे पावसाचे गाणे आहे.
प्यार हुआ इकरार हुआ है
(श्री४२०- शैलेंद्र-शंकर जयकिशन-मुकेश -लता मंगेशकर)

एकत्र प्रवासाची नुकतीच सुरुवात झाली आहे या वाटेवरुन. ओळख पटली आहे, शपथांची देवाणघेवाण ही झाली आहे तरी सुद्धा एक हुरहूर, कुठेतरी असलेली असुरक्षिततेची भावना ह्या गीताच्या शब्दांत आहे..

कहता है दिल रस्ता मुश्किल
मालूम नही है कहा मंझील …
या प्रवासाचा अंत कुठे होणार, कसा होणार याची कल्पना नाही आणि तरीही हातात हात घेवून एका छत्रीतून केलेली वाटचाल .

कहो की अपनी प्रीत का गीत ना बदलेगा कभी.—-त्याने मागितलेले वचन …
बाहेरचे वादळ आता शमू लागले आहे. मनातली कातरता आता संपली आहे. त्याच्या सादेला प्रतिसाद देताना ती सुद्धा एकत्र राहण्याचे वचन मागते.
तुम भी कहो इस राह का
मीत ना बदलेगा कभी
वादळ बरंच काही धुवून काढतं. झोडपणाऱ्या पावसामुळे झाडे उन्मळून पडतात आणि  म्युनिसिपालटीच्या गाडीने ती वाहून नेली की रस्ता स्वच्छ दिसतो.  मनात येतं, अरेच्चा, आतापर्यंत सावली देणारी ही झाडे आपल्या विसाव्याच्या जागा होत्या. त्या पडल्या आणि मग मात्र त्यांच्या फांद्यांची, पानांची अडचण होऊ लागली. आता तर बोलताना सुद्धा आपल्या नकळत आपण बोलून गेलो,  गाडीने कचरा नेला. नात्याचे सुद्धा असेच असते. त्यात कसलीही सुरक्षा नसलेले नाते तर  संपल्यावर त्याच मोलाचे होते.  म्हणून कदाचीत प्रेम करायला लोकं घाबरत असतील.

डरना मुहोब्बत करले
(अंदाज -मजरुह सुलतानपूरी–नौशाद- लता मंगेशकर- शमशाद बेगम ) 
हिंदी सिनेमात हा पहिला प्रेमाचा त्रिकोण असेल . स्टार कास्ट दिलीप, राज आणि नर्गिस . त्यावर कळस म्हणजे नौशादचे संगीत आणि लता मंगेशकरचा उदय.
आताच्या काळात या सिनेमाची थीम फारशी भावणार नाही, पटणार नाही पण त्या काळाचा विचार केला तर जे पती पत्नी नाहीत अशा स्त्री पुरुषात निर्मळ, निरोगी मैत्री असू शकते का असा ह्या सिनेमाचा विषय होता .
दिलीप आणि नर्गिस यातली मैत्री ही राज आणि नर्गिस च्या संसारात वादळ आणते. It was an author backed role आणि तिने सोने केले या कठीण भूमिकेचे. यात तिची वेशभूषा सुद्धा तिच्या convent educated व्यक्तिमत्वाला साजेशी होती.

डरना मोहब्बत करले , उल्फत से झोली भरले .
दुनिया है चार दिन की , जी ले चाहे मरले …
आयुष्याकडे बघण्याचा इतका सरळ साधा दृष्टीकोन; राजकपूर बरोबर असतानाही होता आणि जेव्हा राजने साथ तोडली तेव्हा परत न फिरण्याच्या निर्णयात सुद्धा होता.  हे दोन्ही निर्णय कठीण  होते.

कर ले  वोही जो दिल की लगन है
सोच ना मंझिल दिल की कथन है
विवाहित पुरुषाच्या आयुष्यात त्याची सावली होऊन जगणे, स्वतःच्या अपेक्षांना दुय्यम महत्व देणे, कुणाचीही पर्वा न करता त्याच्या पाठी ठाम उभे राहणे आणि या सर्वांचे मोल शून्य आहे याची जाणीव झाल्यावर परत पाठी न बघता, जिथून संपले त्याच बिंदूवर नवीन सुरुवात करणे … 
जगण्यावर प्रेम केल्याशिवाय हे अशक्य आहे.

राज कपूरचा सफल निर्माता, दिग्दर्शक हा प्रवास सोपा नव्हता. शून्यातून निर्माण केलेलं विश्व होते ते. कलाकाराची प्रेरणा म्हणून नर्गिसने त्याच्या आयुष्यात भूमिका बजावलीच पण आर्थिक योगदान सुद्धा दिले. असे म्हणतात नर्गिसने आर के स्टुडिओने निर्माण केलेल्या सिनेमात एक बंदा रुपया घेऊन काम केली आहेत.
श्री ४२० सिनेमातली नर्गिसने रंगवलेली विद्या म्हणजे सामान्य  माणसाची सद्विवेकबुद्धी. सुरुवातीला राज बद्दल वाटणारा अविश्वास, प्रेमात पडल्यावर त्याच्यावर ओवाळून टाकलेला जीव आणि राजचे खरे रूप लक्षात आल्यावर ही वाट सोडून देण्यासाठी त्याची केलेली विनवणी आणि नंतर प्रेमाला हरवणारी तिची स्वतःच्या मूल्यावरील निष्ठा. या सिनेमाच्या शेवटी तिच्या मिठीत राजला मोक्ष मिळतो. आवारातील स्वप्नदृश्यात राजकपूरला धीर देणारी नर्गिस कुणीच विसरू शकणार नाही. ते तर स्वप्नदृश्य पण जागते रहो सारख्या वास्तववादी चित्रपटात, जगाकडून तुडवलेल्या एका गरीब माणसाला पाणी देऊन त्याची जगण्यावरची निष्ठा बळकट करणारी नर्गिस होती.
नवल नाही की नायिकेची गरज नसणाऱ्या सिनेमात सुद्धा नर्गिसला छोटी भूमिका देण्याचा मोह राजला टाळता आला नाही.
सिनेमाच्या शेवटी तहानलेल्या राजला ती पाणी  देते. पाण्याला जीवन म्हणतो आपण.
She was his life. 

जागो मोहन प्यारे जागो
(जागते  रहो- शैलेंद्र –सलील चौधरी – लता मंगेशकर) 
कृष्ण मूर्तीच्या समोर ह्या गीताचे चित्रीकरण झाले असेल तरीही हे भजन नाही. पहाटेचे गीत आहे हे. नवीन दिवसाच्या स्वागताचे गीत. मनाला उभारी देणारे गीत.

कशाचीतरी तीव्र ओढ असणे हे सर्वात धोकादायक आहे. त्याची किंमत भरपूर असते. स्वतःला गमावून, स्वाभिमानाचा बळी देऊन त्याचा पाठपुरावा करावा लागतो. यात यश मिळणे न मिळणे हे  सुद्धा नियतीच्या हातात असते. मनापासून कुणावर जीव लावणे आणि त्यात अपयश येणे हे पेलणे कठीण. माणूस कोरडा होतो, आतून रिकामा होतो. ती कोवळीक, ती निरागसता , तो वेडा आत्मविश्वास परत येत नाही .
गेलेल्याची आठवण काढणे म्हणजे स्वतःच्याच हृदयाला चिमटीत पकडून पिरगळणे. जे मिळणे शक्य नाही त्याची आठवण येणे सर्वात वेदनादायक असते.

आ जावो तडपते है अरमान
(आवारा –हसरत जयपूरी -शंकर जयकिशन- लता मंगेशकर )
येण्याचे वचन देऊन  तो निघून गेला आहे. आता  रात्र संपून पहाटेचे रंग आभाळात उधळायला  सुरुवात झाली आहे तरीही त्याचा  कुठेही पत्ता नाही. तिला हे मात्र माहिती नाही की त्यांनी जे  ठरवले आहे ते पूर्ण न करण्याची शपथ तिच्याच पालकानी घेतली आहे.

घबराके नज़र भी हार गई 
तकदीर को भी नींद आने लगी, नींद आने लगी
तुम आते नहीं, मैं जाऊँ कहाँ, अब रात गुजरनेवाली है

त्याकाळच्या नायिकांच्या अभिनयात दिसणाऱ्या मेलोड्रामाचा लवलेश सुद्धा नर्गिस च्या अभिनयात दिसत नाही. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही; दिसते ती फक्त जीव पिळवटणारी वेदना. चोरी चोरी, अनहोनी, बरसात, आशियाना अशा अनेक सिनेमात ही जोडी गाजली. त्यांच्या गीतातले माझे सर्वात आवडीचे गीत आहे.
मेरे आंखो में बस गया कोई रे, मोहे नींद न आयी मै क्या
(बरसात–शंकर जयकिशन–शैलेंद्र– लता मंगेशकर)


दल सरोवरातून संथ गतीने जाणारी नाव. धुक्याची चादर पांघरून जगापासून लपलेले ते दोन जीव ,
ज्याच्यामुळे झोप उडाली आहे त्याच्याकडेच केलेली लाडिक तक्रार आणि त्या विभ्रमाकडे भान हरपून पाहणारा तो. 
तारुण्याची लागलेली चाहूल आणि सुराने नादावलेले मन .

आमच्या आधीच्या पिढीचा आदर्श असतील राज आणि नर्गिस. आम्ही आलो तेव्हा अमिताभ पडदा व्यापून उरला होता. गाण्याची जागा मारधाडीने घेतली होती आणि प्रेमाची सुडाने. नायिकेचे महत्व फक्त चेतवण्यापुरतेच राहिले होते. अशावेळी राज नर्गिस च्या पडद्यावरील प्रतिमांनी प्रेमाची ओळख करून दिली. They were natural, charming and the performances were effortless!
प्रेम आभासी असेलही, याही प्रेमकथेचा शेवट अपूर्ण राहिला. तरीही प्रेमाचे लोभस रूप जे त्यांनी पडद्यावर साकार केले त्यासाठी त्यांना सलाम. या सर्वानीच मनात कुठेतरी खोल स्त्रीत्वाची जाणीव जागवली. हे लिहिणे म्हणजे त्या क्षणांचे ऋण फेडणे.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

28 thoughts on “मेरी आँखो में बस गया कोई रे.”

  1. विदुला

    आहाहा..

    कमाल लिहिलं आहेस.
    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  2. अश्विनी मयेकर

    Excellent….या प्रेमजोडीसारखंच तुझं लेखन खेचून नेतं बरोबर…❤🌹

    1. Thank you Ashwini. ह्या सगळ्या प्रवासात तुझे खूप मोठे योगदान आहे

      1. अप्रतिम लिहिलंय !!!!

        खूप सुंदर मांडले आहेस प्रिया..
        कितीही वेळा वाचले तरी..मन भरत नाहीये..

        प्यार hua ikrar hua..खूप आवडते गाणे..
        किती वेळा ऐकले..आणि बघितले तरी समाधान होत नाही….
        बाकी नर्गिस क्या aushyat सुनील दत्त होता..हे फक्त ऐकून कधीतरी त्या मयापुरीत वाचूनच माहीत होते
        पण राज कपूर आणि तिची chemistry…..अहाहा..केवळ सुंदर👌👌👌❤️

        तुझ्या लिखाणासाठी तुला…😘😘😘

        1. Thank you Archana. तू त्यांची गाणी बघितली तर समजते , ते एकमेकांत किती गुंतले होते ..निदान त्या क्षणासाठी ते खरेच होते .

  3. अप्रतिम…

    जागते रहो मधला तो सीन विसरू म्हणता विसरत नाही… दोघेही इतके परफेक्ट आहेत त्यात की ही केमिस्ट्री परत दिसली नाही याचं दुःख होतं

    1. नर्गिसची जी खास खोली होती तिथे पद्मिनी आली आणि नर्गिस ने RK कायमचे ओलांडले. त्याबरोबर पांढऱ्या रंगाची शुचिता संपली . कलात्मकता संपली , Value addition संपले. खरेतर समाजमान्य नाते नसून त्यांनी जे निर्माण केलं ना , ते अफाट होते .
      म्हणून कदाचित ही जोडी अजून रसिकांच्या मनात आहे
      Thank you Swati 🙂

      1. Vrushali Upadhye

        खूप सुंदर लिहिलंय! तुमच्या नजरेतून ही गाणी आणि त्याचे वर्णन केवळ अप्रतिम ❤️

  4. मला राज कपूर एक अस्सल सिनेकलावंत म्हणून आदरणीय वाटतात. बोलपट निर्मिती, दिग्दर्शन, संगीत, अभिनय इत्यादी कलात्मक बाजू तसेच इतर आर्थिक, व्यावसायिक बाजू यशस्वीपणे आणि प्रभावीपणे हाताळून स्वत:ची legacy निर्माण करण्याचं कर्तृत्व त्यांनी गाजवलं. नर्गिस यांना वगळून यांपैकी कशाचंही श्रेय एकट्या राज कपूर यांना देता येत नाही हे ही खरंच. अर्थात् लताबाई, मुकेश, शंकर जयकिशन, शैलेंद्र इत्यादी दिग्गज देखील यात तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण स्वतः राज कपूर हे केंद्रस्थानी होते हे नाकारता येणार नाही.

    गाणी सगळीच आवडती आहेत. I am rediscovering Raj Kapur. Latest I watched ‘मेरा नाम जोकर’…I think it takes one directly to the showman’s heart and soul.

    1. बनी रूबेन यांनी लिहिलेलं चरित्र मी वाचले होते. त्यात त्यांच्या आत्मविश्वासाचा अंदाज येतो.
      कदाचित पृथ्वीराज यांच्या नावाचे वलय असेल तरीही जे काही त्यांनी निर्माण केले ती क्षमता फक्त त्यांची होती .
      Foresight सुद्धा. चेंबूरला जमीन घेऊन स्टुडिओ टाकणे हे सोपे नव्हते.
      आणि कमर्शिअल असूनही त्यांनी कलात्मकता जोपासली .
      नर्गिस गेली आणि ती संपली
      ..खाजगी आयुष्य आणि चित्रपट दोन्हीत वाहवत जाणे घडले .
      राज हे नाव एकट्याने येत नाही ..राज नर्गिस असेच येते ते या मुळे .
      Thank you so much Hemant.

  5. उदय शेवडे

    सर्वप्रथम ” ब्लॉग” लिखाण सुरू केल्याबद्दल अभिनंदन. (कदाचित माझा प्रतिसाद उशीरा आला असेल, क्षमस्व !)

    राज आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचा अतिशय सुरेख आढावा आपण घेतलात.उत्कृष्ठ लेख ! माझ्यामते अनेक वर्ष अनेकांना भुरळ पाडणारी ही जोडी असावी. ही जोडी म्हणजे प्रेम या संकल्पनेचे Icon असावे.

    हा केवळ आढावा नाहीतर आपल्या आधीच्या पिढीच्या चित्रपटाबद्दलचं प्रेम आणि आपुलकी दिसते. बरं हे लिखाण एकांगी नाही. राजकपूर दिग्दर्शक म्हणून उभा कसा राहिला ? इथपासून ते ते त्याचे माणूस आणि दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रवास कसा झाला हे जसं सांगतं तसंच “नर्गिस गेली गेली आणि राज कपूरच्या सिनेमातील सत्य आणि पावित्र्य ही गेले, राहिली ती फक्त नग्नतेच्या स्वरूपातील भेसूर सुंदरता.” हे वाक्य राजकपूर या दिग्दर्शकाचा आलेख दर्शवणारं आहे.

    आपलं लिखाण हे केवळ हे सिनेमाच्या गाण्यांची जंत्री नसते तर ती गाणी अनेक पिढ्यांचे भावविश्व
    असते. व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत याची जाणीव करून देणारे असते म्हणून “सर्वानीच मनात कुठेतरी खोल स्त्रीत्वाची जाणीव जागवली. हे लिहिणे म्हणजे त्या क्षणांचे ऋण फेडणे.” हे वाक्य हे प्रत्येक वाचकाचे होऊन जाते……लिखाणालाही सलाम.

    1. उदय, Thank you so much. माझ्या लिखाणाच्या प्रवासात तुम्ही सुरुवातीपासून बरोबर होता , ही प्रेरणा आणि हे उत्तेजन, म्हणून असेल हा प्रवास सुरु राहिला.
      राज नर्गिस खरं पाहायला गेले तर आपल्या आधीच्या पिढीची जोडी आणि तरीही त्यांच्या गाण्याची कॉपी परत परत होत राहते यात ह्या जोडीचे मोठेपण आहे .
      अजूनही रिफ्रेशिंग …विषय , संगीत , अभिनय

      राज कपूर खरेतर जे काही वाचले त्यावरून अजिबात पटत नाही …आवडत नाही असे म्हणता येत नाही ..कलाकार वेगळा असतो ..त्याचे वायरिंग वेगळे असते ..
      सामान्य माणसाने लांबून आढावा घ्यावा .
      त्यांना आदर्श करू नये ..त्यांच्याकडून आपण ठरवलेल्या आदर्शांची अपेक्षा करू नये
      ..अर्थात याच्या पलीकडे जाणारे आदर्श कलाकार असतात ..पण ते त्यांचे क्रेडिट .

  6. अहाहा काय कमाल लिहिलंत👌👌
    फारच सुरेख👌👌
    बरेचदा वाटतं हे दोघे दुरावले नसते तर बरंच काही रसिकांच्या पदरी पडले असते.
    संग्रही ठेवावा असाच लेख 👌🏼👌🏼❤❤❤❤

    1. राज कपूर स्खलनशील होताच . प्रेम असेल तरी निष्ठा नव्हती त्याच्याकडे .
      हे अपरिहार्य होते.
      निदान तिने आपले आयुष्य सावरले ही जमेची बाग.
      Thank you Kamini.

  7. संदीप पेंढरकर

    राज नर्गिस हा माझा विक पॉइंट. त्यावर किती लिहावे, किती वाचावे अपुरेच. पण दी, तुझे लिखाण वाचणे एक मेजवानीच. राज, नर्गिस आणि संगीत आणि समूह नृत्य नेत्रसुखद …..
    अजरामर….

    1. Thank you Sandeep. राज ने जे जे काही केले निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून , ते खरंच काळाच्या पुढचे होते .

  8. माझी सर्वात आवडती जोडी राज नर्गीस .तिचं ते नशिले डोळे आणि राजचा निरागस चेहेरा .तू इतकं छान लिहिलंय कि सोनेपे सुहागा .गाणी तर बेहद खुबसुरत

  9. माझी आवडती जोडी राज नर्गिस त्यावर तुझं लेखन सोनेपे सुहागा

Leave a Reply to संदीप पेंढरकर Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *