Skip to content

आपसे भी खूबसुरत आपके अंदाज है 

त्याची आणि तिची , दोघांची गाणी .
(पार्ट २ ) 
नात्यांच्या इतिहासात, लग्नाच्या बेडीत बांधलेलं स्त्री पुरुषाचे नाते, हा फार बळकट पण रेशमी बंध आहे. “Till death do us apart” ही अपेक्षा असल्याने नियतीचे आघात, जवळीकीमुळे होणारी अतिपरिचयात अवज्ञा ची मानसिकता  आणि तडजोडीची शक्यता ह्या सर्व गोष्टी पचवून सुद्धा तो आयुष्यभरासाठी टिकावा असाच बहुतांश जोडप्याचा कल असतो. निदान आता आता पर्यंत होता. ठरवून केलेल्या विवाहात तर त्याचा पाया जरी प्रेम नसेल तरी त्याची सांगता मात्र प्रेमात व्हावी अशीच इच्छा ठेवून लग्ने लागत होती आणि अनेकवेळा ती सफल सुद्धा होत होती. जवळीक आणि सवय यातून निर्माण झालेले हे प्रेम कदाचित नाटक सिनेमा, काव्यात वर्णिलेल्या प्रेमासारखे उत्कट, बेधुंद नसेलही पण त्यांनी कुटुंब वाढवले, एकत्र ठेवले.
स्त्री पुरुषांमधील आकर्षण आणि प्रेम हा बहुतांश सिनेमाचा विषय असेल तरीही पतिपत्नी मधील प्रेम, विश्वास आणि वचनबद्धतेवर आधारभूत, चित्रित केलेल्या गाण्यांची संख्या बरीच कमी आहे. विवाह हा महत्वाचा संस्कार मनात असल्याने, त्याची पवित्रता राहावी हा हेतू असावा  किंवा त्या दोघांत प्रेम असावे ही समाजाची सुद्धा अपेक्षा असल्याने त्यात काही थ्रिल किंवा नाट्य नसेल अशी समजूत असावी. आता लग्नच का करावे हा प्रश्न
नवीन पिढीला पडत असल्याने जी काही प्रेमगीते आहेत त्यांचे चित्रीकरण पाहणे म्हणजे गतकाळात हरवून जाणे. 

ऐ मेरी ज़ोहरा ज़बीं
(वक्त- रवी – मन्ना डे -अचला सचदेव -बलराज सहानी  )

पडद्यावर दिलवाले दुल्हनिया सिनेमा चालू होता. काजोलचा मेहंदीचा कर्यक्रम चालू असतो. तरुणांची गाणी, नृत्ये आणि मुलीचे वडील, अमरीश पुरी उत्स्फूर्तपणे गायला लागतात.
गाणे असते जवळ जवळ पंचवीस वर्षे प्रदर्शित झालेल्या वक्त या सिनेमातील, “ऐ मेरी ज़ोहरा ज़बीं “ एवढ्या वर्षांनी सुद्धा गाणे एवढे रिफ्रेशिंग वाटते. नवल नाही, एवढ्या लोकांसमोर उफाळून आलेले नवऱ्याचे प्रेम पाहून अचला सचदेव सारखीच फरीदा जलाल सुद्धा तितकीच गोड दिसते आणि गोड़ लाजते.
तीन मुलांचे आई वडील असलेले हे मध्यम वयीन जोडपे. त्याला व्यवसायात मोठे यश मिळाले आहे. ते आप्तेष्ट आणि मित्र मंडळींबरोबर साजरे करताना आलेले हे गीत. या सर्व प्रवासात त्याच्या पत्नीची मोलाची साथ आहे आणि त्याला त्याची कल्पना आहे आणि कृतज्ञता सुद्धा. हा आनंदाचा सोहळा आपल्या पत्नीला अर्पित करताना तो गातो,

ये शोखियाँ ये बाँकापन, जो तुझ में है कहीं नहीं
दिलों को जीतने का फ़न, जो तुझ में है कहीं नहीं
मैं तेरी मैं तेरी आँखों में पा गया दो जहाँ
ऐ मेरी ज़ोहरा ज़बीं
तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं, और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान

ज़ोहरा ज़बीं हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. अतिशय सुंदर हा फार वरवरचा अर्थ. रोमन देवता व्हिनस हिच्यासाठी ज़ोहरा हा शब्द उर्दू मध्ये वापरला जातो .. प्रेमाची देवता. ज़बीं म्हणजे कपाळ, चेहेऱ्याचा अत्यंत महत्वाचा भाग. ज़ोहरा ज़बीं म्हणजे   प्रेमाच्या देवतेचा सुंदर चेहेरा असा अर्थ आहे.
स्वतःच्या पत्नीच्या, त्याच्या तीन मुलांच्या आई बद्दल असलेले हे केवळ शारीरिक आकर्षण नाही, त्यात दोघांचा नात्यावर असलेला विश्वास, नाते निभावण्याची खात्री, कृतज्ञता, भक्ती आणि सोबत अशा अनेक भावना आहेत. प्रेमाची शक्ती शब्दात मांडता येत नाही खरी ( साहिर लुधियानवी बरेच जवळ आले आहेत) पण तो अशा प्रेमाचे वर्णन करत आहे जे त्यांना शेवटपर्यंत एकत्र बांधून ठेवणार आहे! आज अनेक ठिकाणी लग्नाच्या आधी संगीत करतात, त्यात हमखास टाळ्या घेणारे हे गाणे आहे.

 ये मेरा घर ये तेरा घर
(साथ साथ -जगजीत सिंग चित्र सिंग -दीप्ती नवल-फारुख शेख)

लग्नानंतर अनेक वर्षांनी आम्ही दुसरे घर घेतले. ह्या आधीचे घर सासऱ्यांनी घेतले होते. त्या घरात मी नवीन सून म्हणून आले, रुळले तरीही त्या घरावर सासूबाई आणि सासरे यांच्या संसाराचा ठसा होता. हे घर मात्र आमच्या दोघांचे. यातील एक एक वस्तू दोघांनी निवडली, एकमेकांच्या पसंतीचा विचार करून विकत घेतली, घराचा रंग, फर्निचर यावर आमची मोहोर उमटली. एक एक काडी जमवून घर घेण्याचा आनंद वेगळाच.
घर या शब्दच लाघवी. या शब्दात एक विलक्षण आत्मीयता आहे. ते सिमेंटचे असो किंवा मातीचे, जेव्हा दोन माणसे काड्या काड्या जोडून आपली वास्तू उभारतात, तेव्हा जरी ती साधी झोपडी असेल तरीही प्रेमिकांना त्याचे मूल्य एका महालाएवढेच वाटते.
“साथ साथ” या सिनेमातील नायक नायिकांचे घर उभे आहे ते त्यांच्या तत्वाच्या, आदर्शाच्या पायांवर. खरेतर श्रीमंत घरात जन्माला येऊन सुद्धा त्यांनी स्वतःचा एक वेगळा रस्ता निवडला आहे. हा रस्ता आहे प्रामाणिकपणाचा. हा रस्ता खडतर म्ह्णून तर त्यांच्या घरावर ना सावली आहे, ना चांदणे तिथे वस्तीला आले आहे. ह्या घराला मातीचा स्पर्श आहे. त्यांच्या राहणीमानासारखेच हे घर साधे पण पवित्र आहे. त्याच्या इच्छा समजून घेणारे हे सुजाण घर आहे.

यह तेरा घर यह मेरा घर, किसी को देखना हो गर
तो पहले आके माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र

घर म्हणजे काही भिंती, छप्पर नसते. घर म्हणजे वाटून घेतलेल्या जबाबदाऱ्या, एकमेकांवरील विश्वास, वाटणारी ओढ आणि या सर्वांमुळे आनंदाची होणारी बरसात.  साध्या, साध्या, वाटून घेतलेल्या कामाचे जे चित्रण या गाण्यात आले आहे ते पाहिले की आपले मन सुद्धा गुणगुणते, ये घर बहोत हसीन है” 

जिंदगी और कुछ भी नही , ‘तेरी मेरी कहानी है
( शोर -लक्ष्मीकांत प्यारेलाल–लता मंगेशकर -मुकेश, नंदा-मनोजकुमार)

 “एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है, ज़िन्दगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है” हे माझे अतिशय आवडीचे गीत आहे. काहीतरी हरवलेलं सापडल्याची कृतार्थता या गीतात आहे. जीवन त्यागून आणि भोगून समजलेली दोन माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे गीत गातील त्या गाण्यातील असोशी या गीतात आहे. प्रेमाचा अतूट बंध बांधणे आपल्या हातात असतेच. स्वप्नाच्या महालाखाली सुद्धा एक विश्वासाचा पाया असतो. तो असेल तर एका साध्या झोपडीत सुद्धा स्वर्ग निर्माण करता येतो.
“जिंदगी और कुछ भी नही , ‘तेरी मेरी कहानी है “हा साक्षात्कार जेवढा लवकर होईल तेवढे आयुष्य सुखात जाते.

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है,
जीवन का मतलब तो, आना और जाना है
दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है
ज़िन्दगी और…

जन्म आपल्या हातात नसतो, मृत्यू तर बहुधा चकवा देतो. हातात असते ते या  दोन क्षणातील क्षण. त्यातूनच आपले जीवन घडवायचे असते, जगायचे असते. प्रत्येक क्षणाची किंमत तर तो जगूनच द्यायची असते. मग तो सर्वार्थाने का जगू नये!
आयुष्य निभावणे यात काय कठीण आहे? निर्णय तर आपणच घेतलेला असतो, मग त्याच्याशी एकनिष्ठ का असू नये !

तूफ़ान तो आना है, आ कर चले जाना है
बादल है ये कुछ पल का, छा कर ढल जाना है
परछाईयाँ रह जाती, रह जाती निशानी हैं
ज़िन्दगी और…

अडचणी येतातच पण मन साफ ठेवून हातातला हात घट्ट पकडला तर निघूनही जातात. एकदा हे आयुष्य तुझे आणि माझे आहे असं उमगले तर, त्यांच्या खुणा जरी राहिल्या तरी त्या एकत्र राहायला मदत करतात.

तेरे बिना ज़िन्दगी से कोई, शिकवा तो नहीं
( आंधी — आर डी बर्मन -लता मंगेशकर -किशोरकुमार, सुचित्रा सेन –संजीव कुमार)

कोणत्याही नात्याचा अंत अटळ असतो.  कधी मृत्यूने संपते कधी संपून सुद्धा ताणले जाते तर कधी तोडावे लागते. हा निर्णय अवघड. जिथे नाते टिकवायला दोघांचे तादात्म पावणे आवश्यक आहे तिथे जर “ मी “ ने डोके काढले तर!
माझी महत्वाकांक्षा , माझ्या नात्याहून मोठी झाली तर ! हा “तर”  सोडवायला कठीण.
उत्तर सापडले तरी त्याची किंमत मोजावी लागते. आरतीने ही मोजली आहेच. संसार , मुलगी, प्रेम मनावेगळे करून यशाच्या पायऱ्या चढलेली ती, जेव्हा परत भूतकाळाला सामोरी जाते तेव्हा लक्षात येते की जे काही मिळवले आहे ते खरंच प्रेमापेक्षाही महत्वाचे आहे ?

तेरे बिना ज़िन्दगी से कोई, शिकवा तो नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन , ज़िन्दगी तो नहीं

हरवलेल्या नात्यांकडे पाहायचा एक वेगळाच समजूतदार नजरिया आहे हा. ह्यात पस्तावा आहे पण त्याचा आक्रोश नाही. निर्णय विचारानेच घेतला होता. त्याचा परिणाम ही समजूतदारपणानेच भोगायची आहे.

तुम जो कह दो तो, आज की रात चाँद डूबेगा नहीं
रात को रोक लो
रात की बात है
और ज़िन्दगी बाकी तो नहीं

रात्रीला थांबायला सांगणे ही वांझोटी इच्छा आहे . गेलेला काळ परतवणे तिच्या हातात नाही. आहे ती फक्त ही रात्र.
ती उलटली तर तसेही त्यांच्या हातात आता जपण्यासारखे आणि गमावण्यासारखे काहीही नाही.
आणि तरीही हे त्या दोघांचे गाणे आहे.
नाते टिकते ते जाणीव झाली की. ही जाणीव फार सुखदायक असतेच असे नाही. आरशात  आपली प्रतिमा बघणे पसंद करतो. आता नऊ वर्षांनी मात्र त्यांना स्व ची सुद्धा जाणीव झाली आहे.
आरतीला परत येणे शक्य नाही. तिची महत्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देणार नाही आणि तिच्या दुनियेत जे के ला स्थान नाही. त्याचा पुरुषी अहंकार ते दुय्यम स्थान स्विकारणार नाही, बाकी तिच्याहून पुढे जायची त्याची कुवत नाही.
एकदा आपले स्थान समजून चुकले, मान्य केलं  की नाते  समजूतदार होते आणि  तडजोड असूनही प्रेम जिंकते.
सिनेमाच्या शेवटी, आरती विमानात बसते. विमानात आभाळात झेप घेतं.
जे के जमिनीवर राहून निरोपाचा हात हलवतो. तिला शुभेच्छा देतो . आता त्याच्या डोळ्यात तिच्या विषयी अभिमान असतो आणि त्याच्या अहंकाराला हरवून जिंकलेले प्रेम .

भूली बिसरी यादों में,अब भी कही प्यार छुपा हैं
(विरुद्ध – आनंद राज आनंद — अजित परब –शर्मिला अमिताभ)

मूल हे पती पत्नीला जोडणारा  दुवा आहे. दोघांनी मिळून केलेली निर्मिती असल्याने ती सुंदर बनवण्याची जबाबदारी दोघांची असते. असे म्हणतात मूल जन्माला येत नाही ते पालकांना जन्माला घालते.
बाळ जन्माला आल्यावर आईला पान्हा फुटतो तर  रुंद झालेल्या छातीबरोबर येणाऱ्या जबाबदारीने वडिलांचे खांदे झुकतात. येणारे बाळ, दोघांच्या प्रेमाचे केवळ  प्रतीकच नसते; ते त्या  दोघांचा वारस असते.
मुलांच्या रूपाने आई वडिलांचे अस्तित्व या जगात राहते पण तेच मूल त्यांच्या आधीच काळाच्या पडद्याआड गेले तर!
“विरुद्ध” मध्ये अशा एका जोडप्याची कथा आहे ज्यांनी आपल्या मुलाला गमावले आहे. या दुःखातून सावरणे कठीण त्यात न केलेल्या गुन्ह्यात त्यांच्या मुलाचे नाव अडकवले आहे, तो कलंक सुद्धा त्यांना धुवून काढायचा आहे.
प्रेम, मूल्ये, परंपरा, कुटुंब यासाठी केलेला त्याग, त्यासाठी दिलेला लढा यांचा जमून आलेला मेळ या सिनेमात दिसतो.

शिकवों में क्या रखा हैं, सब कुछ हैं प्यार में
क्यों उम्र यह बता दे, एक इंतज़ार में
नज़रों के सामने से, पल पल गुजार रहा हैं
चल साथ चल साथ
भूली बिसरी यादों में. अब भी कही प्यार छुपा हैं

हे गाणे त्यांच्या मुलाला उद्धेशून आहे. शब्द जर पाहिले तर ते त्या दोघांसाठी सुद्धा आहे. सुखाच्या काळात बरोबर होतेच ते आता या आभाळाएवढ्या दुःखात सुद्धा त्याला मार्ग काढायचा असताना, तिचा हात हातात आहे हाच तर या नात्याचा सारांश आहे.
मला आवडलेली ही काही गाणी. ह्यातले तुमचे गाणे कोणते आहे?

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

27 thoughts on “आपसे भी खूबसुरत आपके अंदाज है ”

    1. Mrs smita dewappa Kokitkar

      खूप सुंदर…..शब्दच नाहीत प्रिया….लव्ह यू डियर

  1. Just to read and read more like this,along with the original songs.Priya I would.like to listen your writing and songs on you tube channel. Why you have not started you tube channel?
    And one more ,to meet you Priya personally and listen you,but.I am well awere that it will never be possible,just like I wont listen “चाफा “कारण चाफा बोलत नाही,तो बोलतो “प्रियाच्या ” लिखाणातून- – –
    Excuse me if I have offended – – -.

    1. YouTube channel was on my mind too but i don’t think i can manage it.
      भेट व्हायची असेल तर होईल की …
      Anyway Thank you Anant.

      1. Namrrataa Sawant

        काय मस्त लिहिलय प्रियादी…..simply superb as usual..

  2. प्रकाश बिद्री

    निवडलेली गाणी अर्थपूर्णही, भाऊक करणारी, स्त्रीपुरूष
    नात्याला गहरी करणारी…..

  3. Anita Gaitonde Dhopeshwarkar

    Khup sundar 👌👌❤️ sagali gani eka hun ek sundar .❤️❤️❤️😘

  4. Namrrataa Sawant

    काय मस्त लिहिलय प्रियादी…simply superb as usual

  5. ANAND SUDHAKAR MAMIDPALLIWAR

    utkrusht !!! priya ji tumchi prathibha vakhanya sarkhich aahe!!!! atyat najuk vishay tanmaytene hatalla aahe thumi!!!!!

  6. ANAND SUDHAKAR MAMIDPALLIWAR

    aaple aaklan mahnjhe(aandaj) aaplya peksha nakkich khoobsurat aahet yat shankach nahi!!!

  7. Absolutely stunned!
    बाकी माझ्याकडे शब्द नाहीत प्रिया!

  8. विदुला

    प्रिया,

    आहाहा..
    गोड गाणी
    त्यांचं सुंदर वर्णन.❤️❤️❤️

  9. Dr Kirti Sathaye

    नात्याकडे पुन्हा पुन्हा बघून पाडताळयला लावता तुम्ही .
    आत्मीयता आणि लाघव खूप आवडलं

Leave a Reply to प्रकाश बिद्री Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *