Skip to content

आपसे भी खूबसुरत आपके अंदाज है.  

त्याची आणि तिची , दोघांची गाणी .
(पार्ट १)
——————————-
गेल्याच आठवड्यातील गोष्ट.
बस स्टॉपवर उभी होते. तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ दोन माणसांचा आधार घेवून हळूहळू चालत येताना दिसले. दोनही माणसांचे हात गुंतलेले म्हणून पटकन पुढे जाऊन मी टॅक्सीचे  दार उघडलं. पाठून त्यांची पत्नी येत होती. व्यवस्थित वेशभूषा, केसांचा बॉब, भारदस्त पण थोडेसं  कडक व्यक्तिमत्व.
एवढ्यात या गृहस्थांनी मला बोलावलं. आभार मानतानाच, पत्नीची ओळख करून देताना ते म्हणाले, “माझं  वय पंच्याऐंशी आहे आणि हिचं  चौर्याऐंशी.”
कदाचित एवढा वेळ दार धरून ठेवावे लागले याची दिलगिरी असावी असे वाटलं  मला पण पुढचे वाक्य माझ्यासाठी मात्र अगदी आनंदमिश्रित आश्चर्याचे होतं . 
“ जेव्हा प्रेमात पडलो, तेव्हा मी सोळा आणि ती पंधरा वर्षाची होती”
आतापर्यत चेहेरा कोरा ठेवून बघ्याची भूमिका घेणाऱ्या त्या चक्क लाजल्या. जवळजवळ सत्तर वर्षाचा सहवास आणि तो सुद्धा असा हवाहवासा. हे नुसते आकर्षण नव्हतं, त्यात जिव्हाळा होता, आदर होता, विश्वास होता आणि  हो, या वयात त्यांच्यातली  मैत्री जिवंत होती.
अशा मैत्रीची ही गाणी.

ऐ उड़ी उड़ी उड़ी ऐ ख़्वाबों की पुड़ी
( साथिया- ए आर रहमान – अदनान सामी -राणी मुखर्जी-विवेक ओबेरॉय)

मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात, सर्वांचा विरोध धुडकावून लग्न करतात. नांदा सौख्यभरे हा आशीर्वाद मात्र काही वाट्याला येत नाही. सुरुवातीचे फुलपाखरी दिवस लवकर उडून जातात आणि शुभ मंगल झाल्यावर सावधान का म्हणतात याचा अंदाज यायला लागतो. दोन जीवांना प्रेमाचा धागा एकत्र आणत असेलही पण त्यांना बांधून ठेवण्याएवढा तो काही बळकट नसतो. 
“ऐ उड़ी उड़ी उड़ी ऐ ख़्वाबों की पुड़ी”हे गाणे मात्र संसाराच्या सुरुवातीचे. नव्या नव्हाळीचे दिवस, एकमेकांत आकंठ बुडालेले दोन जीव , मग प्रेमाचा जल्लोष असणारच.
राणी आणि विवेक ओबेरॉय यांनी रंगवलेली एक एक फ्रेम पाहताना, प्रेमात वेडे पिसे होणे म्हणजे काय याचा अर्थ समजतो.

ऐ उड़ी उड़ी उड़ी ऐ ख़्वाबों की पुड़ी
ऐ अंग रंग खिली ऐ सारी रात हो गयी

प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे  विरह. इथे तर ते दोघे पती पत्नी आहेत. घराच्या विरोधामुळे एकमेकांपासून दूर, पण एक दिवस खोटे उघडे पडते आणि दोघांनाही आपापली घरे सोडावी लागतात. त्यांच्यासाठी मात्र ही पर्वणी.
तो म्हणतो, रंगवलेल्या स्वप्नांना मी आतापर्यंत एका कागदात नीट गुंडाळून ठेवले होते, आज मात्र ती बाहेर पडली आहेत.
त्यांनाही ही पंख फुटले आहेत आणि माझी सारी रात्रच रंगीत झाली आहे.

छेड़ दूं मैं कभी प्यार से तो तंग होती है
छोड़ दूं रूठ के तो भी तो जंग होती है
छेड़ दूं मैं कभी प्यार से तो तंग होती है
खामखा चूम लूं तो भी तो जंग होती है

कधीतरी माझ्या प्रेमाने ती चिडते आणि तिच्या रागामुळे मी लांब गेलो की ती रुसते, रुसवा काढायला मी माझ्या ओठांची मदत घेतली की सुद्धा भांडते..
या गाण्यात नव्याची नवलाई आहे, एकमेकांवरील विश्वास आहे, पहिल्या प्रेमातील उत्स्फूर्तता आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या सहवासात वाटलेली  सहजता आहे. हा रोमान्स एकविसाव्या शतकातला . काहीसा धसमुसळा , पुढच्या गीतात मात्र एक संयम आहे आणि तो जबरदस्तीने ठेवावा लागल्याने चोरटेपणातून जागा झालेला  खट्याळपणा सुद्धा.

अब के सजन सावन में
( चुपके चुपके –एस डी बर्मन –लता मंगेशकर- शर्मिला टागोर-धर्मेंद्र  )

नवीन लग्न झालेले जोडपे आहे हे. प्रेम विवाह पण म्हणून काय झालं! जिजाजींना एक वेगळे स्थान असतेच की. त्यात ते हुशार असतील तर कौतुक सुद्धा असते.
नायिकेच्या जिजाजींना हरवायची पैज लागते त्यांच्यात.
आपली ओळख लपवून नायक त्यांच्या घरात राहिला आहे. त्याचे खरे स्वरूप जिजाजींना ओळखता येईल का ही परीक्षा आहे. घेणार आहे लाडकी पत्नीचं. नवीन लग्न, नवलाईचे दिवस आणि ओढून घेतलेला विरह. एकमेकांना एकांताशिवाय स्पर्शही करायची बंदी. ही सुद्धा दोघांचीही परीक्षा. मनाला काबूत ठेवायचे; पण प्रेम थोडेच लपते. शिवाय हा एक खेळ आहे. संशय तर निर्माण करायचा पण त्यात सापडायचे नाही. 
म्हणून ही केलेली छेडछाड.
 
दो दिलों की बीच खड़ी कितनी दीवारें 
कैसे सुनूंगी मैं पिया, प्रेम की पुकारें 
चोरी चुपकेसे तुम लाख करो जतन, सजन 
मिल न सकेंगे दो मन
एक ही आँगन में

आणि नंतर धर्मेंद्रचे च्च च्च च्च. हे केवळ जिजाजींना फसवणे नाही, पैज जिंकणे ही नाही, माणसाला सवलत मिळाली की त्यातले थ्रिल जातं. खरेतर गुपित उघड केले तर अडवायला कोणीही नाही. ते लग्नबंधनात बांधलेले पती पत्नी आहेत. तरीही हा खट्याळपणा जास्त उत्कट. हवाहवासा.
लग्न झाले की रोमान्स उडून जातो असे म्हणतात पण खरेतर  ज्या क्षणाला तुम्हाला ज्याच्याबरोबर, ज्याच्या साथीने आयुष्य जगावेसे वाटते असे कोणीतरी भेटते, तेव्हाच तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते . And then it becomes a familiar, comforting, lifelong affair .

आपकी आँखो मी कुछ महके हुए से राज है
(घर – आर डी बर्मन – लता -किशोर –रेखा -विनोद)

लग्नाला काही महिने उलटून गेले आहेत. एकमेकांबरोबर जगण्यासाठी त्याने तर आपल्या वडिलांचे घर सोडून तिचा हात पकडला आहे. एक छोटेसे घरकुल उभारले आहे. एवढ्या महिन्यात एकमेकांची ओळख झाली आहे, एकमेकांचे स्पर्श, त्यातली ओढ आता परिचित आहे. तिच्या डोळ्यातली चमक त्याला काय हवे ते सहज सांगून जाते. माणसाला हवे ते लगेच देऊ नये, संयमाची घेतलेली परीक्षा रोमान्सला अजून गुलाबी करते.
तिच्या डोळ्यात डोकावून तो तिला,  तिचे गुपित सांगून टाकताना म्हणतो,

आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं

हिंदी सिनेमात जोडप्याचा नर्म शृंगार फार कमी सिनेमात दाखवला आहे. शरीराची ओढ पण त्याची ओळख असल्याने असलेली सहजता. घरातील प्रत्येक जागेचा, अगदी गच्ची, बाथरूमचा सुध्दा  उपयोग करून त्या दोघांतील जवळीक दाखवणे हे बेडरूम मध्ये प्रशस्त पलंगावर लेटलेल्या दोघांपेक्षाही फार सूचक, फार मादक. पूर्ण घरच जवळिकीसाठी उत्सुक. त्याला साथ दिली आहे रेखाच्या डोळ्यातील आव्हानाने, अंगभर नेसलेल्या साडीत दडलेल्या तिच्या गच्च शरीराने, गालावर फुललेल्या लाजेने आणि विनोदच्या मोकळ्या हास्याने. प्रेमात डुबून गेलेल्या उत्सुक पुरुषाचे हास्य सुद्धा एवढे निर्मळ असते.
विनोद मेहराचा हा त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट रोल आहे.
ह्या गाण्यातील सर्वात सुंदर आहे ते शेवटचे कडवे.

आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं
बे वजह तारीफ़ करना, आपकी आदत तो नहीं
आपकी बदमाशियों पे, ये नये अंदाज हैं
आणि त्यात जाणवणारे लताचे अस्फुट हास्य. बाईंच्या आवाजातच अभिनय होता तो असा.

एक ही ख़्वाब कई बार देखा है मैं ने
(किनारा -आर डी बर्मन –भूपिंदर सिंग –हेमा -धर्मेंद्र )


या गाण्याच्या चित्रीकरणासारखेच “किनारा” या सिनेमातले “एक ही ख्वाब कई बार से देखा है मैने“ हे गाणे मला अतिशय आवडते.
किनारा या सिनेमात गीतात जे आहे त्या दोघांचे, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी, यांचे लग्न झालेले नाही. ठरलेले आहे.
काही दिवसांतच ती या घराचा उंबरठा ओलांडून इथे त्याच्यासोबत राहायला येणार आहे. त्याच्या काही दिवस आधी पाहिलेले हे स्वप्न.

एक ही ख़्वाब कई बार देखा है मैं ने
तूने साड़ी में उड़स ली है मेरी चाभियाँ घर की
और चली आयी
बस यूँही मेरा हाथ पकड़ कर
एक ही ख़्वाब कई बार   …

त्याच्या  घरी फक्त  त्याचा  हाथ  पकडून  आलेली ती ..त्याला नकोच  आहे दुसरे काही …
स्वतःबरोबर, घराची चावी ही  तिलाच देऊन तो निवांत आहे .. 
हे स्वप्न सुद्धा किती साधे! 
सुखी संसार, त्यातली ती सकाळची वेळ, रात्रीच्या सहवासाने सकाळ  सुद्धा आळसावलेली, त्या दोघांसारखीच
आणि तो तिला सांगतो ..

मेज़ पर फूल सजाते हुए देखा है कई बार
और बिस्तर से कई बार जगाया है तुझको
चलते फिरते तेरे कदमों की वोह आहट भी सुनी है
एक ही ख्वाब कई बार से देखा है मैने

त्याच्या चेहेरा  हसतोय पण  डोळे  मात्र आतुर. .हे  स्वप्न लवकरच ठरवणार आहे तो ..
तोच नाही तर त्याचे घरसुद्धा तिची वाट पाहतेय.
हे नुसते प्रियकर प्रेयसी चे गाणे नाही; तर एका सुखी संसाराचे स्वप्न आहे. लहान, साध्या, नेहेमीच्याच गोष्टी; पण परस्परांवर प्रेम असेल तर आयुष्य सुगंधी होऊन जाते.
टेबलावर फुले ठेवताना त्याला ती दिसते. तिच्या पावलांची चाहूल घराच्या काना कोपऱ्यातून ऐकू येते.  सुस्नात होऊन गुणगुणत ती बाहेर येते  आणि त्याच्या चेहेऱ्यावर होते तिच्या ओल्या केसांची शिंपण.
पत्ते खेळताना डाव मनासारखा आला नाही म्हणून ती रुसते आणि मग तो हसतो म्हणून चिडायचे विसरून आपणही हसते.  .एक सहजपणा आहे त्यात. तो अभिनय नाहीच. ते  आहे जागेपणी पाहिलेले स्वप्न.

तेरी बिंदिया रे, आय हाय ‘तेरी बिंदिया रे
(अभिमान -एस डी बर्मन- लता -रफी – जया –अमिताभ)



प्रेमात जे जे काही शक्य नाही ते ते करण्याचा प्रेमी प्रयत्न करतात. गाणे ही तर फार शुल्लक गोष्ट आहे. त्यात ते दोघातही जर गायक असतील तर संगीत हा दोघांना अजून जवळ आणणारा दुवा आहे.
तो प्रसिद्ध गायक, ती एका शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाची, स्वतः शास्त्रोक्त संगीत शिकलेली मुलगी.
गाणे ही त्याची केवळ आवड नाही तर व्यवसाय आहे, तिच्यासाठी गाणे ही भक्ती आहे. देवाची, नवऱ्याची.
तिला जरी कल्पना नाही तरी त्याला तिच्या आवाजाची, तिच्या तयारीची कल्पना आहे. आपण जर एक टीम म्हणून गेलो तर व्यावसायिक दृष्ट्या आपली जोडी यशस्वी होईल याची खात्री आहे.
लग्नाच्या रिसेप्शनला तो आपल्या पत्नीची ओळख संगीताच्या माध्यमातून करून देतो.

मेरा गहना बलम तू, तोसे सज के डोलूं
भटकते हैं तेरे ही नैना, मैं तो कुछ ना बोलूं

एका गरीब घरातील मुलगी. आवाजाच्या जादूने तो आकर्षित झाला आहे. तिच्याशी लग्न करण्याइतपत त्या आवाजाने त्याला भुरळ पडली आहे. तिला मात्र त्याची कल्पना नाही. पतीला  परमेश्वर मानण्याची मानसिकता आहे तिची. तिचे डोळे केवळ त्यालाच शोधत आहे. ही सादगी त्याला नवीन. त्याचा खट्याळ प्रश्न आहे, 

“तो फिर ये क्या बोले है, बोले है, बोले है
तेरा कंगना”
या गर्दीत बावरलेल्या तिला, त्याचा डोळ्यांचा तर आधार आहे. तो दिसतो म्हणून ती धीर करून म्हणते,
“बोले रे अब तो छूटे ना, तेरा अंगना”
या सिनेमाच्या आधीच जया आणि अमिताभचे लग्न झाले होते आणि जया आपल्या पहिल्या मुलीच्या वेळेला गरोदर होती तेव्हा या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. नवीन जोडप्याची नव्हाळी आहे या गीतात.


.Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owners.

36 thoughts on “आपसे भी खूबसुरत आपके अंदाज है.  ”

  1. खुप छान गाणी व त्या गाण्यांचे रसभरीत वर्णन प्रिया 👌👌❤️

    1. This is simply precious Priya..
      Such a beautiful Portrayal of each and every song. You make us feel it live.❤️

      1. वाह, प्रिया ताई… फार सुंदर लिहिलंय. आवडती गाणी.

  2. मस्त मस्त प्रियाताई.
    गाणी 👌👌👌आणि त्यांचं रसग्रहण नेहमीप्रमाणे उत्तम. 💞♥️

    1. कधीतरी अशा गाण्यांवर प्रोग्रॅम करा तुम्ही ..मजा येईल Smita. 🙂

    2. Mrs smita dewappa Kokitkar

      अप्रतिम गाणी…खूप छान!!अगदी छान चपखल रसग्रहण!!

      1. Priya tai kay lihu hi sagali gaani khup आवडीची आहेत.
        आणि तुझं लिखाण म्हणजे फक्त 💗

  3. विदुला

    प्रिया,
    काय लिहू??
    नेहमीसारखच 👌👌👌

  4. अप्रतिम लिहिलंय प्रिया. गाणी खास आहेतच; पण त्यांचं विश्लेषण करून तू चार चाँद लावलेस.

  5. Shraddha Kandalgaonkar

    प्रिया,
    कितीही बोलले तरी कमीच आहे ..त्यामुळे तू लिहीत रहा आणि आम्ही असेच जीवापाड तुझ्यावर आणि तुझ्या लेखनावर प्रेम करत राहू

  6. व्वा व्वा! उत्कृष्ट निवड गाण्यांची आणि त्यावर तुमचं अप्रतिम लेखन!! मस्तच सगळं!!

  7. प्रिया दी , as usual मस्त..👌
    गाणी आणि लिखाण ❤️❤️

  8. Priya …… mast treat dilis. Lajavab presentation. You really shud make one audio – video programme.

Leave a Reply to Priya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *