Skip to content

ABBA च्या गीतांनी नटलेली संगीतिका

२०१५ च्या जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टाने दोन महत्त्वाचे निर्णय दिले.

पहिला गर्भपाताचा अधिकार. काही विशेष परिस्थितीत चोवीस आठवडय़ानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करता येईल. बलात्कारातून झालेली संतती, मातेच्या आरोग्याला धोका असेल तेव्हा, आई मानसिकदृष्टय़ा सक्षम नसेल तर, अशा  विशिष्ट परिस्थितीत ह्या निर्णयाचा खूप फायदा होईल. अर्थात हा निर्णय आला म्हणून बेजबाबदार वागायचे लायसन्स मिळेल असे ज्यांना वाटते त्यांनी हा विचार करावा की सततच्या गर्भपात करण्याने आईच्या आरोग्याला धोका पोचू शकतो.
दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय होता की मुलाला आता आईचे नाव लावता येईल त्यामुळे विधवा, घटस्फोटित, अविवाहित अगदी वेश्यांच्या मुलांची सुद्धा वडीलांचे नाव नाही म्हणून अडवणूक होणार नाही. आपल्या समाजात स्त्रीला महत्वाचे स्थान आहे. मातृदेवो भव म्हणून आई वंदनीय आहे.
कन्या, पत्नी आणि माता या तीनही स्वरूपात स्त्रीला पुजताना तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वामुळे पुजले जाते की तिला या भूमिकेत जगण्याची संधी मिळवून देणाऱ्या पुरुषामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे. पित्याच्या नावाशिवाय जन्माला आलेली कन्या, लग्नबंधनाशिवाय पुरुषाजवळ राहणारी स्त्री आणि पित्याचे नाव आपल्या अपत्याला देऊ न शकणारी माता यांच्या भूमिका आणि कर्तव्ये सारखी असताना केवळ पुरुषाच्या नावाची जोड नाही म्ह्णून तिला अपमानित व्हावे लागते हा इतिहास आहे.
या पार्श्वभूमीवर, कोर्टाने दिलेले हे दोन्ही निर्णय अत्यंत क्रांतिकारी होते. 
तरीही याच्या पलीकडे जाऊन मनात आले,  लग्न न करता बाळ जन्माला घालायचे असेल तर त्याचे संगोपन करण्याची माझी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमता आहे का हे सुद्धा पहायला हवे.  कुटुंबात वाढणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. ती त्याच्या सर्वांगीण विकासाची गरज सुद्धा आहे. स्वतःच्या मातृत्वाची भूक भागवताना आपण तो हक्क हिसकावून घेतो का ह्याचाही विचार व्हायला हवा. मी हे नैतिक  का अनैतिक हा विचार करत नाही. जी जबाबदारी पेलण्यामागे प्रेम असते, जबाबदरीची जाणीव असते आणि पेलण्याची क्षमता असते ते सर्व नैतिकच असावे. तरीही काही गोष्टीचा परीणाम हा  दुसऱ्यांना कळत न कळत हानी पोचवतो. 
निर्णय चांगलाच  आहे. फक्त जेव्हा स्पर्म डोनेशन किंवा लग्न न करता मूल जन्माला घातले आणि उद्या जर त्या मुलाला कमी जाणवली तर!  त्याही पेक्षा आईला गंभीर आजार, झाला, अकस्मात मृत्यू झाला तर त्या मुलाची जबाबदारी कायद्याने कोणाकडे असणार याचा विचार करावा इतकंच..
एकल पालकत्व हा विषय गंभीर आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मामा मीया (Mamma Mia) हा सांगीतिक सिनेमा ह्याच विषयावर आधारित आहे. ह्या सिनेमाची हाताळणी मात्र विनोदाच्या अंगानी केली आहे. सिनेमाचे मुख्य अंग आहे संगीत.

वीस वर्षाच्या सोफीचे  होणारे लग्न हा सिनेमाचा केंद्रबिंदू.
सोफीचे (Amanda Seyfried) बालपण ग्रीस मधील एका छोट्याश्या बेटावर जाते. तिच्या कुटुंबात दोनच माणसे आहेत. ती आणि तिची आई, डोना. (Meryl Streep). आईचे या बेटावर एक छोटेसे रिसॉर्ट आहे. गुजराण होण्याइतपत उत्पन्न आहे. सोफीचे लग्न, सोफीनेच ठरवले आहे. सगळे मनासारखे होत असूनही तिचे मन मात्र अस्वस्थ आहे. एवढ्या वर्षात आपले वडील कोण हा प्रश्न सतावत असला तरी आईला वाईट वाटेल म्हणून आपल्या कुतूहलाला तिने आपल्या हृदयात बंदिस्त करून ठेवले होते पण आता लग्नाचा दिवस जसा जवळ येतो आहे तसे आपल्या लग्नात वडील असावे ही इच्छा अजून प्रबळ होत चालली आहे.
अपघातानेच तिच्या आईची डायरी सोफीला सापडते. 

तिच्या जन्माच्या वेळी घडलेल्या घटना त्यात नमूद केलेल्या असतात. तरुण वय, विवेकाचा अभाव, आंधळे प्रेम, त्यातून वाट्याला आलेला विश्वासघात, त्यातून बाहेर पडताना केलेल्या चुका आणि त्या सर्वांची परिपूर्ती म्हणजे दिवस राहणे.
दिवस राहणे ही निसर्गाची किमया आहे. दोन तापलेल्या शरीरांचे जवळ येणे ही क्रिया त्याच्यासाठी पुरेशी आहे. नैतिक अनैतिक, जबाबदारी हे शब्द काही त्याच्या कोशात नाही. ते विचारी माणसांच्या कोशात असतात. त्यासाठी विचार करण्याची  क्षमता वापरली नाही की हे असे अपघात होतात आणि त्याला एक नाही, दोन नाही तर तीन पुरुष जबाबदार असतात. ह्यात नक्की आपले वडील कोण हे सोफीला जाणून घायचे आहे.त्या तीन माणसांचा पत्ता शोधून सोफी, आईच्या नकळत या तिघांनाही लग्नाचे आमंत्रण पाठवते. 

लग्नाचा दिवस उजाडतो. एक एक पाहुणे बेटावर यायला सुरुवात होते. ह्यात डोनाच्या, तान्या आणि रोझी ह्या
दोन मैत्रिणी असतात. सोफीने पाठवलेल्या आमंत्रणाला उत्तर म्हणून डोनाचे तीनही मित्र, हॅरी( Colin Firth), बिल(Stellan Skarsgard) आणि सॅम (Pierce Brosnan) हजर होतात. आईला आवडणार नाही, रुचणार नाही म्हणून सोफी त्यांना लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करते खरी पण डोनाला ही बातमी मिळतेच आणि डोना सैरभैर होते.
भूतकाळात गाडल्या गेलेल्या या सत्याचा सामना करणे तिच्यासाठी लाजिरवाणे असते. 
डोनाला आपले प्रेम मिळते का? सोफी आपल्या वडिलांना शोधून काढण्यात यशस्वी होते का? सोफीचे पितृत्व कोणाकडे हे  निश्चित झालेले नाही. ह्या सत्याशी सामना झाल्यावर त्या तिघांची काय प्रतिक्रिया होते? सोफी एवढ्या लहान वयात लग्नाचा जो निर्णय घेते त्यावर कायम राहते का? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहण्यासाठी मामा मिया पाहायला हवाच.
कथा विनोदी अंगाने जात असल्याने, एकल मातृत्व, लग्नाशिवाय झालेली संतती हा सिनेमाचा विषय गंभीर असूनही सिनेमा हसवतो. ABBA ह्या लोकप्रिय बँडच्या गाजलेल्या गीतांचा कथा पुढे सरकवण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे.
मूळ गायकांनी ती गायलेली नसून सिनेमातील कलाकारांनी ती गायलेली आहे हे विशेष. तसे रूढार्थाने कुणीही गायक नसले तरीही गीतांना सर्वच कलाकारांनी न्याय दिला आहे. विशेषतः मेरील ने गायलेले “The Winner Takes It All” हे गीत.
I’ve played all my cards
And that’s what you’ve done too
Nothing more to say
No more ace to play
The winner takes it all
The loser standing small

आयुष्यात जे पाहिजे ते मिळवणे हा एक खेळ असतो. तुम्ही तुमची पाने खेळता, समोरचा त्याची. हार-जीत मान्य करून पुढे जायचे असते. जो जिंकतो तो जिंकतो हे एकदा लक्षात आले की पाठी वळून न बघता हरणारा आपल्या मार्गाला लागतो.
आयुष्यात हे मार्गाला लागणे महत्वाचे. 
भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार आहे त्यामुळे हा सिनेमा पाहताना अनेकांना हा फार superficial वाटण्याची शक्यता आहे. आणि हा सिनेमा खरेतर एक फँटसी आहे पण ज्यांना ABBA चे संगीत आवडते, मेरील स्ट्रीप आवडते त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. दीड  तासाची करमणूक.
मातृदिनासाठी हा सिनेमा का हा प्रश्न कुणालाही पडू शकेल. बॉलीवूड आणि असंख्य प्रादेशिक सिनेमा आहेत ज्यांनी ह्या नात्याचे पैलू दाखवले आहेत. आईने केलेला त्याग, तिचे संस्कार, कठीण परिस्थितीत सुद्धा तिची न ढळलेली श्रद्धा ह्याचे दर्शन ह्या सर्वच सिनेमातून दिसते.
आताचा काळ वेगळा आहे. आई ही सुद्धा माणूस असते. तिच्या हातून चुका होऊ शकतात. मुलांहून वेगळ्या तिच्या आकांक्षा असू शकतात हा विचार समाजात रुजला आहे. घटस्फोट, एकल पालकत्व, लग्नाशिवाय मिळालेले मातृत्व, सरोगसी, एकट्या स्त्री ला सुद्धा मूल दत्तक घेण्याचा किंवा जन्माला घालण्याचा मिळालेला अधिकार ह्या गोष्टी आता दुर्मिळ राहिल्या नाहीत. त्या चांगल्या की वाईट हा या लेखाचा विषय नाही, या सिनेमाच्या अंगाने नाहीच पण सिनेमा पाहताना काही गोष्टी जाणवल्या त्या साठी हा सिनेमा निवडला.

मला आवडलेल्या गोष्टी
—————————
डोनाच्या हातून चुका झालेल्या आहेतच. त्याची तिला जाणीव आहे पण त्याची शिक्षा ती मुलीला देत नाही. आपल्या चुकीचे खापर तिच्यावर फोडत नाही. कॅथॉलिक, कर्मठ कुटूंबातली असल्याने तिच्या कुटुंबाची तिला मदत नाही. ती आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते. स्वतःचे छोटे रिसॉर्ट काढते. ते चालवण्यासाठी कष्ट करते. मेहेनतीने ते वाढवते, आपल्या मुलीला वाढवते. त्या घरात पुरुषाचे अस्तित्व नाही, पण सोफीला वाढवताना त्याची कमतरता ती भासू देत नाही. 

स्वातंत्र्य देतानाच त्याचा वाईट उपयोग ती करणार नाही ह्याचे संस्कार देते. आई आणि मुलीत प्रेमाचा बंध आहे. त्या दोघांच्या नात्यात प्रामाणिकपणा आहे. आपले वडील कोण ह्याची उत्सुकता सोफीला असली तरी आपल्या वागण्याने आई दुखावली जाऊ नये यासाठी सोफी जागरूक आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्या वडिलांची भूमिका निभावण्याची विनंती ती आपल्या आईला करते. आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची जाणीव तिला आहे आणि तिच्याप्रती ती कृतज्ञ आहे.
सिनेमाच्या शेवटी डोनाच्या आयुष्यात आलेले तीनही पुरुष आपली चूक मान्य करतात आणि सोफीला मुलगी म्हणून स्विकारतात. रूढी परंपरा ह्याचाही पेक्षा प्रेम हेच कुटुंबाला बांधून ठेवते ही या सिनेमाची थीम आहे.
स्वतःच्या चुका मान्य करून, त्याची जबाबदारी घेणे आणि त्यातून धडा शिकून आपले आयुष्य सावरणे हा या सिनेमाचा संदेश आहे.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owners. 

26 thoughts on “ABBA च्या गीतांनी नटलेली संगीतिका”

  1. Shalmali Gokhale

    सिनेमाचा गाभा तू असा स्टेप बाय स्टेप आणि नेमका दाखवतेस. डोळ्यासमोर घडतंय असं लिहिणं ही हातोटी. उत्तम लेख.

    1. थँक यू. मी जे काही आतापर्यंत लिहिले आहे त्यात तुमचं सर्वांचा खूप वाटा आहे. अगदी मनापासून सांगते. एवढी encouragement मिळाली आहे.
      .

  2. Pranita Deshpande

    मामा मिया…तू तर नेहमीप्रमाणेच ओघवतं लिहिले आहेस….मी हा चित्रपट बघितला नाही,आता नक्कीच बघेन….

  3. सुंदर लिहिलेस ग… डोळ्यासमोर चित्र उभे करणे ही तुझी…हातोटी च आहे…
    बघितला पाहिजे सिनेमा असे लगेच वाटावे इतके सुंदर…उलघडतेस सगळे…👌👌❤️

  4. किती सुंदर लिहिलंय…. स्वातंत्र्याला विवेकाचं बंधन खरंच खूप आवश्यक असतं. Movie पाहीन की नाही माहीत नाही, पण तुम्ही अगदी अलवार सगळं मांडलं आहे. डोळ्यासमोर उभं राहतं सगळं.

  5. Shraddha Karandikar

    मेरिल स्ट्रिप माझी आवडती अभिनेत्री आहे. तिचे एक दोन चित्रपट पाहिले आहेत.
    मी movies खूप कमी बघते, अगदी strongly recommended असेल तरच. तू लिहीत आहेस म्हणजे उत्तम चित्रपट असणार, त्यातून musical म्हणजे बघायलाच हवा. आता माझ्याकडे must watch अशी यादी असेल, thanks a lot ♥️

    1. काही चांगल्या सिनेमांवर महिन्यातून एकदा लिहीन .
      विषय न पटणारा तरीही हा प्रश्न समाजात नक्की येणार असे हल्ली वाटते आहे आणि घड्याळ उलटे फिरणे शक्य नाही. अशावेळी चूक स्वीकारून आयुष्य सुधारणे आपल्या हातात असावे . कॉमेडी संगीतिका असल्याने ताण येत नाही . नक्की बघ
      Thank you Shraddha.

  6. अतिशय सुंदर लिहिता तुम्ही, ABBA ची ती गाणी म्हणजे प्रचंड nostalgic feelings आहेत. हा चित्रपट नक्कीच बघेल मी🙏
    Again thank you so much for the vibes 🙏

  7. मुलांना विवेकाची नीट ओळख करून दिली की त्यातून जबाबदारीने वागणे अपसुकच येते. तरूण वय, आणि त्या वयाच्या मागण्या या सर्वच संस्कृतीमधे सारख्याच पध्दतीने
    काम करतात. मानसिक नी शारिरीक ओढ, त्याने घडणाऱ्या घटना या निसर्गनियमाचा अविष्कार. या घटनांविषयीचा अपराधभाव बाळगण्याचं खरेतर कारणच नाही. हां, त्यातून येणारी जबाबदारी कशी स्विकारायची याचा निर्णय विवेकाने घ्यावा, एवढेच मुलीला आईने ती वयात येतांनाच सांगणे गरजे
    आवश्क असते. विशेषतः डॅाक्टर-मानसोपचार तज्ञ यांनाही या प्रक्ियेचा भाग करणे आवश्यक आहे.
    या चित्रपटाची नायिका विवेकाने आणि जबाबदारीनेच वागली आहे. तुम्ही लिहिले त्यानुसार ती एक आदर्श आईच म्हणायची. मुद्दा रहातो पुरूषाचा. चित्रपटात त्याचा ऊहापोह केल्याचे दिसत नाही. पुरूष जबाबदारी नाकारतो म्हण्यापेक्षा
    जे घडते त्याविषयी कमालीची बेफिकीरीच समाजात आढळते.

    लेखात नेहमीप्रमाणे विचारांची नेमकी आणि तटस्थ मांडणी,
    हे वैशिष्ट्य आहेत. चित्रपट शब्दातूनही चित्रदर्शी असणं यात तुमचा हातखंडा आहे.

    सुंदरच.

    1. अगदी बरोबर.
      आता मुलांवर विचारांची जबरदस्ती करणे शक्य नाहीच. योग्यही नाहीच. त्यांचे जग फार मोठे आहे आणि त्यांना तिकडे वावरायचे आहे. निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे.
      तिथपर्यंतच त्यांचे अस्तित्व आहे.
      मग तो करिअरचा निर्णय असो , लग्नाचा, लग्न न करण्याचा ..कोणताही पण त्याचा त्रास स्वतःला न होऊ देणे, झालाच तर रास्ता बदलण्याचे धाडस अंगात असणे आणि रस्ता बदलून आपली वाटचाल सुरु ठेवणे हा आयुष्याचा खरा अर्थ आहे .
      थँक यु Prakash sir तुमचे प्रोत्साहन माझ्या प्रवासात नेहेमी राहिले आहे ..ते असू दे

  8. नेहमीप्रमाणे ओघवतं. बघायला हवा हा पिक्चर. 👍

  9. चित्रपटाचा गाभा उलगडुन नेमकं सत्त्व लेखात उतरवण्याची हातोटी आहे तुमच्यात. फार छान लिहीले आणि सिनेमा नक्की पाहीन

    1. Thank you Rahul .
      You will Love it, especially Songs.
      भारतीय मानसिकतेला पचेल अशी कथा जरी नसली तरी आई मुलीचा जो बंध आहे तो खूप आवडला.
      एवढी कठीण परिस्थिती असून आणि निराशा वाट्याला येऊनही, तो तुटत नाही , कुठेही नात्यात, ना त्यांच्या व्यक्तिमत्वात कडवटपणा येत नाही. कुणाला दोष देणे नाही आणि रडत आयुष्य बरबाद करणे नाही .
      मला फार आवडले हे .

  10. विवेक constant, coherent असेलच असं नाही. Same about संयम. नीयती दुर्बळ क्षण पेरून ठेवते असं वाटतं. बाकी कर्मभोग असावेत. ‘रॉमेडी’ सदृश genre तला सिनेमा आहे. सुसह्य असतात. कँमेरॉन डायझ, मेरिल स्ट्रीप ही मंडळी नेहमीची यशस्वी.

    1. संयम काय विवेक काय, माणसाची परीक्षा असतेच.
      एक मात्र आहे, चूक झाली की मान्य करून पुढे जाण्याचा विचार आणि प्रयत्न करायला हवाच. रेंगाळण्यात काही अर्थ नाही. ना आयुष्य जगता येत ना संपवता येत.
      रॉमेडी …परफेक्ट
      नाहीतर विषय म्हणजे योगा योगाची खिचडी आहे. मला तिची जिद्द आवडली.
      आणि गाणी .. ABBA च्या सगळ्याच गाण्यांचे शब्द फार छान आहेत आणि इथे फार खुबीने बसवले आहेत.

Leave a Reply to Archana Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *