Skip to content

समर्पणाची शोकांतिका -साहेब बीबी और गुलाम 

लग्नातून नक्की बाईला काय हवे असते !
मूल, घर, पैसे, संरक्षण या सगळ्यापेक्षा सुद्धा तिचा हक्क, तिचा सन्मान, ज्याच्यासाठी ती सर्वस्व देते. नवऱ्याने तो द्यावा हे लग्नात अंतर्भूत असते. लग्न ही जरी तडजोड मानली तरी आपला साथीदार आपला आहे या विश्वासावर लग्न टिकते.
सहजीवनाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना , अगदी कष्ट उपसताना सुद्धा मी हे माझ्या माणसासाठी करते आहे/ करतो आहे यावर ही निरगाठ टिकून राहते.
“ मी तुला पोसतो म्हणून मी हवे ते करेन” अशी जर नवऱ्याची भूमिका घेतली तर तिच्यात आणि ठेवलेल्या बाईत काय फरक उरला?
One doesn’t marry to be a glorified whore for the lifetime …

हे आताच्या तरुणीचे मनोगत नाही. १९५३ मध्ये बिमल मित्रा यांची साहेब बीबी गुलाम ही कादंबरी प्रदर्शित झाली
कादंबरीतला काळ त्याच्याही शंभर वर्ष आधीचा आहे.
ह्यातली नायिका सुद्धा आपल्या  आत्मसन्मानासाठी, एका पत्नीचा हक्क मिळवण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावते, त्याच्यासाठी संघर्ष करते, मृत्यूला सुद्धा सामोरी जाते. स्वतःचे भविष्य घडवण्याची जबाबदारी ती स्वतःच्या हातात घेते. भले ते मार्ग चुकीचे असतील पण ती आपल्या पुरुषाला मिळवण्यासाठी घराने आणि समाजाने आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडते.
ती घर सोडत नाही याला कारण आहे.
हा काळ फार जुना आहे. ज्याकाळी स्त्रीचा पती, हाच तिचा परमेश्वर,  हे मनावर बिंबवले जायचे.
बीबीच्या मनावर सुद्धा ह्याचा पगडा आहे पण “माझा परमेश्वर माझाच असणार” ही तिची जिद्द आहे.
भले तो ईश्वर स्वरूप असेल , पण म्हणून त्याला ती तिच्या हक्कांशी फारकत घ्यायला देत नाही.
आपल्या परमेश्वराला स्वतःशीच बांधून ठेवण्यासाठी ती स्वतःच्या चारित्र्याच्या आणि मूल्यांच्या सुद्धा सीमा ओलांडते. बीबीचे वेगळेपण यात  आहे.

गुरुदत्त प्रोडक्शनचा साहेब, बीबी और गुलाम या कादंबरीवर आधारित आहे.
सिनेमाच्या सुरुवातीला एका जुन्या, मोडकळीला आलेल्या हवेलीचे दर्शन होते. या हवेलीचे उत्खनन चालू आहे.

अतुल्य चक्रवर्ती , एक मध्यमवयीन आर्किटेक्ट, त्याची देखभाल करत आहे. जेवणाची सुट्टी होते. मजूर निघून जातात. आता त्या परिसरात तो एकटाच.
लांबून ओळखीचे सूर ऐकू येतात , “चले आओ, चले आओ, कोई दूर से आवाज दे “
त्याला एका स्त्रीचा आवाज येतो , “बैठो “
मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या आठवणी जागृत होण्याएवढी ताकद त्या मृदू हाकेत असते.
कथेचे वळण काय असणार आहे याची दिशा हे गीत देते. गीता दत्तच्या आवाजातली वेदना आणि गूढता त्या खंडहरचे  रहस्य अजून गडद करतात. भूतनाथच्या ओळखीचे हे गीत असते.
पहिल्यांदा या हवेलीत आल्यावर याच गीताने त्याला जाग येते. मध्यरात्रीची वेळ. ती भव्य हवेली आता अंधारात गुडूप झालेली असते. वर्ह्यांड्यात मात्र एक दिवा जळत असतो. बाहेर असणारा पहारेकरी मात्र गाढ झोपेत असतो.
त्याच्या सवयीचे असावे हे दृश्य आणि तो काळजाला घरे पाडणारा आवाज सुद्धा. रात्रीच्या शांततेला कापून जाणाऱ्या त्या आर्जवी आणि झपाटून टाकणाऱ्या आवाजात, वेदना असते, ओढ असते आणि कुणालातरी घातलेली साद सुद्धा. 
अतुल्यच्या आठवणींबरोबरच सिनेमा काही दशके पाठी जातो.
पडद्यावर आता दिसते एक भव्य हवेली. काय तिचा दिमाख!  मुख्य दरवाजासमोरील कारंजे, नोकरांची फौज, आलिशान झुंबर,  भरपूर दालने, उंची फर्निचर,  केवढा थाटमाट..

या सर्व वैभवाला शोभणाऱ्या, दागदागिन्यानी मढलेल्या स्त्रिया सुद्धा. या हवेलीच्या मालकांच्या मालकीच्या बायका.
जेवढी ही हवेली भव्य आहे तेवढेच त्यातील जिने, खोल्यांना जोडणारा पॅसेज, आतले वऱ्हांडे, अरुंद आणि अंधारी
आहेत. नवीन बदलणाऱ्या जगाचा, सुधारणांचा, त्याला स्पर्श सुद्धा झालेला नाही. आतल्या स्त्रिया आणि नोकरवर्ग ह्यांच्यासाठी तो सोन्याचा का असेना पण पिंजरा आहे.
 हवेलीचे मालक आहेत दोन भाऊ. मोठे भाऊ जाऊन काही वर्ष झाली आहेत. आता कारभार मधल्या भावाच्या हातात आला आहे. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणे आणि त्यातून मिळालेले पैसे उधळणे ह्यात त्यांचे आयुष्य चालले आहे.

धाकटा भाऊ तर मदिरा आणि  मदिराक्षीच्या सहवासात; स्वतःच्या देखण्या पत्नीचीही त्याला पर्वा नाही.

येथेच अतुल्यचा लांबचा मेहुणा नोकरी करतो. त्याला राहायला सुद्धा जागा आहे.
अतुल्य, जो त्याच्या आत्याने ठेवलेल्या नावाने, भूतनाथ म्हणून ओळखला जातो, त्यालाही राहायला जागा मिळते.
अट एकच. जे घडत आहे त्याकडे कानाडोळा करणे.
त्याचा मेहुणा त्याला मोहिनी सिंदूर कारखान्यात नोकरीला लावतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला वश करून घेण्याची शक्ती असलेला सिंदूर अशी याची ख्याती असते.  हा सिंदुरच त्याची ओळख या हवेलीच्या छोट्या बहूशी करून देण्यास कारणीभूत ठरतो .
पतीच्या दर्शनाला, प्रेमाला आसुसलेली छोटी बहू या सिंदुराची कीर्ती ऐकते. आपल्या घरात राहणारा  एक माणूस या कारखान्यात नोकरीला आहे हे समजल्यावर , आपल्या विश्वासू नोकराला त्याला घेऊन येण्याची गळ घालते.
हे तसे धारिष्ट्यच . हवेलीत स्त्रियांच्या कक्षात परक्या  पुरुषांना जायला मज्जाव आहे. पण छोटी बहू, इतर सुनांसारखी दागिने , उंची वस्त्रे , खाणे पिणे यात रमणारी नाहीच. गरीब घरात जन्माला आलेल्या या मुलीला केवळ तिच्या सौन्दर्यावर या घरात आणले आहे याची जाणीव आहे. ही सुंदरता सुद्धा जर त्याला वश करू शकत नाही तर आपण कशाच्या आधारे या घरात राहतो आहे हा तिच्या मानी मनाला पडलेला प्रश्न आहे. निर्वाणीचा उपाय म्हणून ती सिंदूर मागवायचा ठरवते.

सिनेमा सुरु झाल्यावर जवळ जवळ पन्नास मिनिटांनी मीना कुमारीचे पडद्यावर दर्शन होते.
भव्य भालप्रदेश, त्यावर ठसठशीत कुंकू ..छोटी बहूचे जगच तर त्याच्यात सामावलेले आहे, त्या खाली असलेले भावपूर्ण डोळे, त्याच्यात कारुण्य  आहे, स्नेह आहे आणि  दुसऱ्याला समजून घेण्याचा समंजसपणा. ती एकटी तसेच  भूतनाथ सुद्धा अनाथ. त्याचे बावरलेपण तिला उमजते. त्याचे नाव तस वेगळे. जो कुणी त्याचे नाव ऐकतो , तो त्याची चेष्ठा करतो, पण ती मात्र हसत नाही.
“हे तर देवाचे नाव आहे.”

तिचे हे त्याला सहज स्विकारणे  त्याच्यासाठी नवीन. तो एवढा भारावतो की आपल्याला आवडलेल्या मुलीबद्दल, जबाबद्दल सुद्धा तो बोलून जातो . तिचे डोळे, ओठांना पडलेली हलकीशी मुरड, चेहेऱ्यावर असलेली  स्निग्धता आणि दागदागिने, उंची वस्त्रांनी मुळच्याच सुंदरतेला आलेले तेज. 

सात्विक , खानदानी राजस सौंदर्य.  तिला त्याची जाण आहे. झोपडीतून महालात आणायला तेच तर तिचे तिकिट आहे. या मुलाबद्दल तिला सहानुभूती आहे  पण त्याच बरोबर आपल्या सौंदर्याच्या त्याच्यावर काय परिणाम होत आहे याचीही तिला जाणीव आहे. त्याचा उपयोग करून घ्यायला ती तयार आहे कारण …
कारण तिचे आपल्या नवऱ्यावर  प्रेम आहे. त्याला मिळवण्यासाठी हे धारिष्ठ करायला ती तयार आहे.
नवऱ्याचे प्रेम मिळवणे हा तिच्यावरील संस्काराचा अविभाज्य भाग आहे.
भूतनाथ जेव्हा पहिल्यांदा तिला पाहतो तेव्हा तिची सुंदरता, तिचे हळुवार वागणे, गोड़ बोलणे ह्या सार्यांनी भारावून जातो. आपल्या निष्ठा तिच्या पायी वाहतो. 
प्रेमळ, मानी , काहीशी भाबडी, हळवी , मातृत्वाला आसुसलेली, त्या साठी कोणतेही दिव्य करायचे धैर्य असणारी , प्रसंगी परपुरूषाची सुद्धा मदत घ्यायला न कचरणारी..किती असंख्य वेगवेगळे पैलू या सहा मिनिटांच्या sequence मध्ये मीनाने दाखवले आहेत .
मोहिनी सिंदूर आणल्यानंतर छोटी बहू ची मरगळ जाते. ह्या सिंदुराच्या शक्तीवर तिची श्रद्धा आहे.
ह्या प्रेमाची जातकुळीच वेगळी. विरहाचा शाप लेवून आलेले हे प्रेम. येणाऱ्या प्रत्येक पावलांचा कानोसा ती घेत आहे. लज्जेच्या आवरणात गुरफटलेली आतुरता, नटण्यासजण्यातला आनंद, इतक्या वर्षाच्या निराशेनंतर आलेली साशंकता, आणि तरीही मिलनाची आत्यंतिक ओढ.

मैने सेंदूर से माँग अपनी भरी
रूप सैय्या के कारण सजाया
इस दर से के पी की नज़र ना लगे
झट नैनन में कजरा लगा बैठी
पिया ऐसो जिया में —

शृंगाररसाचे एक सुंदर गीत इथे येते.
आपल्या प्रियकरासाठी नटणे ह्यासारखे दुसरे सुख प्रेमात आकंठ बुडलेल्या स्त्री साठी नसतेच.
गीता दत्त चा प्रत्येक सूर तिच्या हृदयात जाग्या होणाऱ्या प्रत्येक भावनेला न्याय देतो.

सिनेमात चाळीस मिनिटानंतर छोटी बहूचे दर्शन घडते खरे पण मीना कुमारीची ही भूमिका सिनेमाचे केंद्र आहे. तिचे व्यक्तिमत्व सुद्धा संदिग्ध. तिच्या भावजयीसाठी, छोटी बहू ही अतिशय साधी आणि मूर्ख बाई आहे. घरात एवढ्या सुखसोयी असूनही त्याचा भोग घेणे तिला जमत नाही. तिच्या नवऱ्यासाठी ती एक अनाकर्षक , रितीरिवाजांना कवटाळून बसणारी सामान्य बाई आहे. भूतनाथ तिच्या सौन्दर्याने भारावून गेला आहे. तिच्याबद्दल आदर आहे, धाक आहे , एक न सांगता येणारे आकर्षण आहे. तिला कशालाही  नकार देणे त्याला शक्य नाही ..
छोटी बहू अशिक्षित आहे, गरीब आहे आणि तरीही काळाच्या पुढचा विचार करणारी बाई आहे. जुन्या काळाच्या परंपरांचा पगडा असल्याने नवऱ्याचे स्थान तिच्यासाठी देवाच्या स्थानाएवढेच पवित्र आहे पण ती काही दबलेली स्त्री नाही. तिच्या पतीच्या  हृदयात स्थान मिळावे यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते .. तेवढी ती जिद्दी आहे.
ह्या साज शृंगाराचा मात्र तिच्या व्यसनी नवऱ्यावर काहीही परिणाम होत नाही .
चवताळून ती प्रश्न विचारते ,
“ माझ्यात काय कमी आहे की तू मला सोडून बाहेर जातोस ?”

“ त्या गातात,  नाचतात , पितात सुद्धा , तू करशील ?”
हा अत्यंत स्वार्थी, मूल्यहीन माणूस असे आव्हान देतो की तिने मागे सरकावे.

तिच्या घराची, समाजाची, संस्काराची हीच तर मागणी असते.
त्या वेळच्या जमीनदार कुटुंबातील स्त्रिया या घरीच राहायच्या, वारस द्यायच्या, घराची प्रतिष्ठा सांभाळायच्या आणि आपल्या नवऱ्याशी कृतज्ञ असायच्या. नवऱ्याने कसे वागावे ह्या बाबतीत समाज मुग्ध असायचा.
छोटी बहू हे नाकारते .
“जर तुला हवे तसे वागून मी तुला माझ्या जवळ ठेवू शकते तर हे सुद्धा मान्य .. “
आजच्या काळात हे वागणे विसंगत वाटू शकेल पण तिच्या परीने या दुटप्पी वागण्याला तिने दिलेले हे आव्हान आहे. 

पिया ऐसो जिया में समायो गयो रे ..ते  “न जाओ सैयां “..हा एक सिक्वेन्स आहे. A moving, pitiful  exploration of woman’s desires आणि नंतर आत्यंतिक नैराश्येतून झालेला नैतिक अधःपात.
एवढे करूनही जेव्हा तिचा कंटाळा येऊन तो झिडकारतो तेव्हा उशीरा झालेली जाणीव की
she has prostituted and degraded her basic values and morals to please him.…
.
जो मुझ से अखियाँ चुरा रहे हो,तो मेरी इतनी अरज भी सुन लो
पिया ये मेरी अरज भी सुन लो
तुम्हारी क़दमों में आ गयी हूँ,यहीं जियूँगी यहीं मरूँगी, यहीं मरूँगी.

This is the  craving to be understood and be loved .
दारूच्या नशेत असताना जेव्हा तिचा तोल जातो , तेव्हा नवऱ्याच्या डोळ्यातील घृणेने मात्र ती कोलमडते. मर्यादा सोडून त्याला खडसावते …
“ मला मूल हवे आहे. “ चार भिंतीच्या बाहेरही न गेलेली ती स्त्री पहिल्यांदा नवऱ्याच्या पुरुषार्थावर शंका घेते आणि पहिल्यांदा स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवते. 
अतिशय बोल्ड भूमिका होती ही . …
जमीनदाराच्या घरातील सर्वच पुरुष वेश्यागृहात दारू आणि बाई च्या सहवासात रात्र घालवत असताना , त्यांच्या घरंदाज स्त्रियांनी घरात बसून त्यांची वाट पाहणे हे सर्वमान्य होते. तिच्या नवऱ्याच्याच शब्दात सांगायचे तर दागिने मोड , दागिने घडव आणि  मिरव .. तुला काय कमी आहे इथे !
ही आज्ञा धुडकावून लावून नवऱ्याचा सहवास मागणारी  ती मात्र फार फार वेगळी असते.
अर्थात स्वतःचा मार्ग चुकला आहे याची जाणीव झालेली छोटी बहू ,परत मात्र फिरू शकत नाही. होणाऱ्या घसरणीपासून सावरणे तिच्या हातात राहत नाही . दारू तिच्या मनाचा आणि शरीराचा ताबा घेते.

छोटी बहू हे कॉम्प्लेक्स पात्र आहे. पारंपरिक आदर्श स्त्री, जिचे  जग  घराच्या चार भिंतीत सामावले आहे. केवळ पत्नी बनण्यात ती स्वारस्य नाही . तिला त्याची प्रेमिकाही व्हायच आहे.  स्वतःच्या काळ्याकुट्ट वर्तमानाला ती आव्हान देते, पितृसत्ताक संस्थेलाच प्रश्न करते आणि स्वतःला हवा तसा भविष्यकाळ घडवण्यासाठी  लढाही देते, नी शेवटी मृत्यूला कवटाळते.
नवऱ्यासाठी केलेले हे दिव्य अनेकांना मागासलेले वागणे वाटेल पण त्या काळाचा , एकूणच त्या घरातील आणि समाजातील स्त्री च्या स्थानाचा विचार केला तर लक्षात येते, कसलाही आधार नसताना , घरात केवळ एका सजावटीचे स्थान म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्त्रीच्या शोषणाविरुद्ध हा तिने तिच्या परीने केलेला उठावच आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.



2 thoughts on “समर्पणाची शोकांतिका -साहेब बीबी और गुलाम ”

  1. हा सिनेमा त्या काळातील अनेक सामाजिक पैलूंवर भाष्य करतो. मीनाकुमारी ही या दृष्टिकोनातून मला प्रतिनिधीच वाटते. छोटी बहू वाट करून देते त्या काळातील स्त्रियांच्या भावनांना.. इरेला पेटून उठणे आणि तडीस नेणे हा प्रवास अभिनयातून खूप लीलया पेलला आहे…पुन्हा पुन्हा पहावा असा सिनेमा 👌❤️❤️❤️
    फार फार सुरेख लिहिलंय प्रियादी 👌❤️

  2. विलक्षण सिनेमा.
    सगळंच भारी होतं.
    निर्मिती,अभिनय,गाणी
    सगळंच उत्तम.
    पूर्वी , लहानपणी जेव्हां पाहिला होता,तेव्हा त्या कथेच गांभीर्य कळलं नव्हतं.
    आता त्याची खोली जास्त उमजते,जाणवते.
    या एकाच सिनेमावर लिहिणं,
    तितक्या ताकदीचा सिनेमा आहे ना!

Leave a Reply to Vidula Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *