Skip to content

मेरे पास माँ है
-चित्रपटाच्या इतिहासातील आईचा बदलता चेहेरा. 

आज मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बँक बॅलन्स है, बंगला है, गाडी है,
क्या है, क्या है, तुम्हारे पास ?
विजय वर्माचा हा प्रश्न रवी वर्माला नाहीच. हा प्रश्न त्याच्या भूतकाळाला आहे, हा प्रश्न त्याच्यावर अन्याय करणाऱ्या समाजातील सर्व घटकांना आहे, हा प्रश्न नियतीला सुद्धा उद्धेशून आहे. त्याने तिलाच तर आव्हान देऊन हे वैभव मिळवले आहे.
सहा फूट उंच विजय वर्माच्या चेहेऱ्याकडे बघताना मान उंच करावा लागणारा रवी वर्मा पाहून आपल्याही मनात येतं, खरंच, काय आहे याच्याकडे?
“मेरे पास माँ है“ विजयच्या डोळ्याला डोळे भिडवून, शांतपणे आणि ठामपणे, रवी वर्मा उत्तरतो.
थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी “
भिकाऱ्यांची विवशता, लाचारी, दुःख सुटाबुटातल्या विजय वर्माच्या डोळ्यात तरळते. संपूर्ण सिनेमा बच्चनला डोळ्यासमोर ठेवून लिहिला असूनही “मेरे पास माँ है“ हा शशी कपूरच्या वाट्याला आलेला डायलॉग हिंदी सिनेमाच्या इतिहासातील ऑल टाइम हिट डायलॉग्समध्ये गणला जातो.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.
सुख आणि समृद्धी आता हाताच्या अंतरावर आली.  आतापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणारे, स्वतःच्या प्रगतीची, सुखी संसाराची, समाधानी कुटुंबाची स्वप्ने पाहू लागले.  कुटुंबात अनेक व्यक्ती असतात. त्या विचाराने, प्रवृत्तीने वेगवेगळ्या  असतात. त्यांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, त्यांच्या स्वतःच्या आकांक्षा वेगवेगळ्या असतात. त्याने वाद होतात, कुटुंब मोडतात.
ते मोडू नये यासाठी कुटूंबातील भली माणसे आपले सर्वस्व पणाला लावतात. त्याग करतात, प्रसंगी आपल्या प्राणाचीही आहुती देतात. बऱ्याच वेळा घरातील मोठी स्त्री ही जबाबदारी उचलते. स्वतः धग सोसून अवघ्या घराची आई होते. 
भारतीय चित्रपटात सुद्धा या समाजमानसाचे  प्रतिबिंब उमटले.
सिनेमाने निरपेक्ष प्रेम, विश्वास, विवेक, करुणा, माणुसकी या शाश्वत मूल्यांचा पुरस्कार केला. त्या साठी त्यांनी आईचा चेहेरा निवडला.

हिंदी सिनेमातील पहिली गाजलेली आई होती “लीला चिटणीस” 

सुरुवातीला नायिकेच्या भूमिका गाजवल्यानंतर चाळीसच्या दशकात त्यांनी सहाय्यक भूमिका करायला सुरुवात केली.
शहीद या सिनेमातील त्यांची नायकाच्या आईची भूमिका गाजली. या सिनेमाला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. नायक (दिलीप कुमार) हा क्रांतिकारी असतो तर त्याचे वडील (चंद्र मोहन) हे पोलीस कमिशनर. मुलानी या लढ्यात पडावे ही त्यांची इच्छा नसते.
नवऱ्याशी एकनिष्ठता आणि मुलावर प्रेम या कात्रीत सापडलेली आई, लीला चिटणीस यांनी परिणामकरीत्या रंगवली. स्वातंत्र्य लढ्याबद्दल सहानुभूती असली तरीही क्रांतिकारी चळवळीत सामील होणाऱ्याचा दर्दनाक शेवट ती जाणून आहे. मुलाचे भविष्य डोळ्यासमोर दिसत असल्याने तिचा ह्याला विरोध आहे.
त्यात वडील ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करत असल्याने, मुलाच्या अशा वागण्याने त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा येईल हे ही तिला माहित आहे.
मुलगा पकडला जातो आणि त्याला फाशीची शिक्षा होते. तुरुंगात भेटायला जाताना, चेहेरा हसरा ठेवून ती मुलाला आशीर्वाद देते खरी पण हे शेवटचे दर्शन आहे हे जाणवल्यावर ती कोसळून पडते.
उसने हसू आणून मुलाशी बोलणे ते अवसान गमावून दारातच कोसळणे ह्या पाच मिनिटांच्या सीन मध्ये लीला चिटणीस यांनी अभिनयाच्या सर्व  छटा दाखवल्या. सहन करणाऱ्या आईच्या भूमिकेवर पुढची जवळजवळ पंचवीस वर्षे लीला चिटणीस यांचे नाव कोरले गेले. 
संगीताची घराणी असतात तशी अभिनयाची सुद्धा.
वैधव्य आल्याने अकाली प्रौढत्व आलेली, साधी, पांढरी,  सुती,  ठिगळ लावलेली साडी नेसणारी, सतत खोकणारी आणि पलंगाजवळ ठेवलेल्या औषधाच्या रिकाम्या बाटलीकडे हताश नजरेने बघणारी, कुटुंबाच्या निर्वाहाकरता शिवण मशीन चालवणारी आई अशी आईची प्रतिमा बनली. ती पडद्यावर आली  की सतार रडायची, व्हायोलिन विव्हळायची आणि संतूर अबोल व्हायची .
अचला सचदेव, निरुपा रॉय, सुलोचना या कलाकारांनी आपल्या भूमिकांनी या घराण्याला योगदान दिले.

नवरा आणि मूल या शिवाय ही जगणे असते हे दाखवणारी आई होती मदर इंडिया ची राधा. 

नायक पळून  गेला तरी कोणत्याही  परिस्थितीत, कुणालाही शरण न जाता, स्वतःच्या कर्माने स्वतःची उन्नती घडवणारी  स्त्री  “मदर इंडिया“ या सिनेमात नर्गिसने रंगवली. राधा प्रेमळ पत्नी आहे, मायाळू आई आहे, आज्ञाधारक सून आहे पण तिची घरच्या आणि शेतीच्या कामात बरोबरीची जबाबदारी आहे. त्यामुळे नवरा परागंदा झाल्यावर सुद्धा ती माघार घेत नाही. सावकाराने बैल नेल्यानंतर सुद्धा नांगर खांद्यावर घेऊन स्वतःचे शेत नांगरणारी राधा स्त्री कर्तृत्वाचे प्रतीक आहे. शहरातील नोकरी करून पैसे कमावणारी सुशिक्षित स्त्री आणि स्वतःचे शेत, स्वतःच्या परिश्रमाने फुलवून पुरुषांचे वर्चस्व धुडकावून लावणारी अशिक्षित स्त्री ह्या दोहोंतील फरक या सिनेमाने नष्ट केला.
राधा गरीब आहे पण सदाचारी आहे, निराधार आहे पण निश्चयी आहे, त्यागमूर्ती आहे पण कणखर आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढताना स्वप्ने पाहण्याएवढी आशावादी आहे. गावातील सावकार, सुखीलालचा तिच्यावर डोळा आहे. त्याच्याशी संबंध ठेवून स्वतःचं आयुष्य सुखी करणे तिला सहज शक्य आहे पण तिला तिच्या चारित्र्याचा सार्थ अभिमान आहे. भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची क्षिती न बाळगता, ती सत्याचा आणि सत्वाचा मार्ग स्विकारते. .
सिनेमाच्या शेवटी, राधाचा मुलगा, बिरजू सावकाराच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मूल्यांवर अटळ असलेली राधा मुलाला विरोध करते. तो जेव्हा घोड्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा जीवही घेते.
आतापर्यंत मुलावर प्रेम करणारी, त्याच्या कोणत्याही कृत्यावर पांघरूण  घालणारी किंवा हताश होऊन रडणारी आई प्रेक्षकांनी पाहिली होती पण मुलगा चुकला तर त्यालाही शिक्षा करायला न कचरणारी आई मदर इंडियात पहिल्यांदा दाखवली गेली. 
शोषितांच्या या कठीण संघर्षात, आपले चारित्र्य आणि कर्तव्य यावर अढळ राहणाऱ्या एका सामान्य आईचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
दिवार मधली निरुपा रॉय किंवा अग्निपथ मधली रोहिणी हट्टंगडी या राधाच्याच अवतार आहेत. त्यांचे मुलावर प्रेम आहे पण आपल्या मूल्यांवर श्रद्धा आहे. प्रेम का विश्वास हा प्रश्न निर्वाणीच्या प्रसंगात सुद्धा त्यांना गोंधळात टाकत नाही. त्यांची श्रद्धा अटळ आहे.


“मेरे करण-अर्जुन आयेंगे!” करण अर्जुन मधली राखी मुलांसाठी टाहो फोडत नाही. नवऱ्याला, मुलांना मारून टाकलेल्या राक्षसांपुढे हार मानत नाही. एकाकी, निर्धन अवस्थेत सुद्धा ती त्यांना ठणकावून सांगते, “माझी मुलं येतील. तुमचे अन्यायाचे साम्राज्य संपवायला नक्की येतील“
ते परत जन्म घेतात. हे अतिरंजित वाटत नाही कारण त्यामागे एका आईची प्रार्थना आहे, जिद्द आहे आणि विश्वास आहे.
“मेरे पास माँ है” हा म्हणून गाजलेला डायलॉग आहे.

स्वातंत्र्यानंतर मनात आशा नी डोळ्यात स्वप्न घेऊन देशाची वाटचाल सुरु झाली खरी पण प्रश्न मोठे होते, रस्ता खडतर होता. स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घेतानाच प्रगतीच्या व्याख्या ठरवायच्या होत्या. सत्तरच्या दशकात समाज रचनेत बरेच बदल घडून आले. स्त्री शिक्षणाची सुरुवात आधी झाली होतीच. घराला हातभार म्हणून स्त्रियांनी नोकरी करायला सुरूवात केली. घराचा उंबरठा ओलांडला गेला. हातात पैसे मिळू लागले. आर्थिक स्वातंत्र्याबरोबर आत्मभान आले आणि आपल्या प्रगतीत संसार, मुलं हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे , संपूर्ण आयुष्य नाही याची स्त्रीला जाणीव झाली.
मातृत्व हवेहवेसे असले तरी ती आपल्या करिअर मध्ये बेडी असू नये याचीही खूण गाठ स्त्री ने बांधली.
ह्याचे चित्र १९७५ मध्ये आलेल्या आँधी या सिनेमात दिसले.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार दिग्दर्शित आँधी या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे. समाजकारण आणि राजकारणाला वाहून घेतलेल्या धूर्त पुरुषांच्या जगात जिंकण्यासाठी पाय रोवून असलेल्या “स्त्री” नेत्याची, आरतीची ही कहाणी आहे. आरतीचा प्रेम विवाह. त्यांच्या संसार वेलीवर फुलही आले आहे.
आरतीने स्वतःहून गृहिणी आणि माता या दोन्ही जबाबदाऱ्या आनंदाने स्विकारल्या आहेत.
सुंदर सहजीवन जगत असतानाच राजकारणात ओढल्या गेलेल्या आरतीला स्वतःची महत्वाकांक्षा खुणावू लागते. पैसा आणि बुद्धिमत्ता याची देणगी असलेली आरती सफलतेच्या एक एक पायऱ्या चढून जाते. पती आणि मुलगी यांचं स्थान आता मर्यादित राहतं. त्याची जागा सभा, भाषणं आणि राजकीय डावपेच घेतात. माणसाला सर्व मिळत नाही. पर्याय स्विकारावे लागतात आणि आरती स्वतःच्या महत्वाकांक्षेला निवडते. ती घराचा उंबरठा ओलांडते. मुलीचा ताबा नवऱ्याकडे देते आणि स्वतःच्या करिअरला पूर्णतः वाहून घेते.
नऊ वर्षांनी तिची आणि तिच्या नवऱ्याची जेव्हा भेट होते तेव्हा ती आपल्या मुलीबद्दल विचारते. मुलीला हॉस्टेल मध्ये ठेवले आहे ह्याची तिला कल्पना नाही.
या वर्षात मुलगी कुठे आहे हा प्रश्न तिला पडला असेल तरी मुलीची भेट घेण्यासाठी तिने काही प्रयत्न केले आहेत याचा उल्लेख सिनेमात नाही. असे नाही की तिचे मुलीवर प्रेम नाही पण  कारकिर्दीच्या या टप्प्यावर मुलगी का करिअर हा प्रश्न तिला पडत नाही .

आखिर क्यों ची निशा (स्मिता पाटील) सुद्धा चाकोरीतील आई पेक्षा वेगळी आहे. 

ती सुशिक्षित आहे पण अनाथ. एका नातेवाईकाने तिची जबाबदारी घेतल्याने त्यांच्या उपकाराखाली दबली गेली आहे. एका श्रीमंत मुलाशी तिचे लग्न होते. सुरवातीचे दिवस नविन नवलाईत जातात. नायिका गरोदर रहाते. तिची काळजी घेण्यासाठी धाकटी बहीण या घरात येते आणि सिनेमाला कलाटणी मिळते. तिचा नवरा आणि तिची बहीण ह्यांचे विवाहबाह्य संबंध लक्षात आल्यावर ती घर सोडते.
पुरुष प्रधान संस्कृतीत, लेखिका बनून स्वतःचा ठसा उमटवते आणि त्या बरोबर पैसे, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता सुद्धा. घर सोडून जायची जेव्हा वेळ येते तेव्हा स्मिता आपल्या मुलीला नेत नाही. मुलीला नेता येत नाही म्हणून स्वतःची कुचंबणा सुद्धा करून घेत नाही. तिचे आईपण किंवा पत्नीचे स्थान कुठेही तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आड येत नाही. मुलीला नेणे शक्य नाही, त्यासाठी कायद्याचा लढाही देणे शक्य नाही. तिची तशी आर्थिक परिस्थिती नाही तिला कुणाची मदत सुद्धा नाही.
घरातील काम करणाऱ्या बाईला ती आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याची विनंती करते.
नंतरही जेव्हा व्यवसायात नुकसान झालेला कबीर, मुलीच्या लग्नासाठी तिच्याकडे पुस्तक देण्याची विनंती करतो, तेव्हा ती त्याच्या प्रकाशन संस्थेला पुस्तक देतेच शिवाय त्यातून मिळालेले उत्पन्न सुद्धा.
आपले आईचे कर्तव्य ती पार पाडते. ती आपल्या मुलीला मात्र भेटत नाही.
“मला ओळख द्यायची नाही कारण जर तिला आपल्या वडिलांचे वर्तन, खरे रूप समजले तर एकूणच पुरुष जातीबद्दल तिला घृणा येईल, तिचा विश्वास उडेल“
कोणत्याही मुलीचा पहिला हिरो हा तिचा पिता.  त्याचे वर्तन, त्याचे प्रेम, त्याने दिलेली सुरक्षितता मुलीचे व्यक्तिमत्व घडवते.आपल्या मुलीचा भ्रमनिरास होऊ नये, तिचे पुढले आयुष्य समाधानात, आनंदात जावो म्हणून स्मिता तिच्यापासून दूर राहते.
कोणत्याही परिस्थितीत भावनाविवश न होता निर्णय घेणारी ही आई आहे. 
१९९० च्या नंतर जागतीकरणाबरोबर सुबत्ता आली , शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी वाढल्या. मध्यमवर्गीय समाजाकडे पैसा खेळू लागला. सिनेमाने सुद्धा याची नोंद घेतली.
हम आपके है कौन किंवा मैने प्यार किया ची आई (रीमा लागू), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधली किंवा कुछ कुछ होता है मधली आई (फरीदा जलाल) ह्या हिंदी सिनेमातील संपन्न, समाधानी आई होत्या. 

 पांढऱ्या, ठिगळ लावलेल्या साडीची जागा रेशमी, रंगीत साड्या किंवा सलवार कुर्ता यांनी घेतली. करवा चौथला समारंभाचे रूप आले. त्यांच्या हातचा गाजरहलवा त्यांच्या मुलांना आवडलाच पण त्या साठी चुलीवर स्वयंपाक करून धुराने खोकला होण्याचा जमाना गेला. यांच्या मदतीला बाई होती. स्वयंपाकघर आधुनिक होते. प्रेमाने घास भरवणारा नवरा होता. आता आयुष्यात करायचे काही राहिले नाही असे निवृत्तीचे भाव घेऊन थकलेले, भागलेले हे मातृत्व नव्हते.
उत्साही, चैतन्यदायी, देखणी आई हिंदी पडद्यावर दिसू लागली. ती गृहिणी जरी असली तरी बिचारी नव्हती. तिला घरात महत्वाचे स्थान होते. तिच्यावर प्रेम करणारी घरातली माणसे होती. ती सुशिक्षित होती. ती कुणाची जबाबदारी नव्हती, उलट कठीण परिस्थितीत तिचा सल्ला घेता येईल अशी मार्गदर्शक होती.
दिलवाले दुल्हनिया मध्ये फरीदा जलालला आपल्या मुलीच्या प्रेमाबद्दल समजते, तेव्हा ती शाहरुख आणि काजोलला आपले दागिने देऊन लग्न करून घेण्याचा सल्ला देते. नवऱ्याची धास्ती तिलाही आहे पण ती मुलीच्या बाजूने उभी राहण्याचा निर्णय घेते. 

मैने प्यार किया है मध्ये, रीमा लागू आपले कंगन देऊन,  सलमानला, भाग्यश्रीकडे पाठवते. 
किरण खेरने दोस्ताना या सिनेमात मिसेस आचार्यचा रोल वठवला. आपला मुलगा गे आहे हे समजल्यानंतर त्याच्या बाजूला उभे राहणे,  त्याला आणि त्याच्या मित्राला आशीर्वाद देताना “जिते रहो, फुलो फलो“ म्हटल्यानंतर आपली चुकी लक्षात आल्यावर “ खैर छोडो, ये तो तो नही हो सकता “हे एका दमात म्हणणं हे एका बाजूला  विनोदी होते आणि दुसऱ्या बाजूला  या नात्याचा स्विकार आई बदलल्याची साक्ष होती. 


पारोच्या आईचे काय स्थान आहे याची कल्पना नाही. संजय लीला भन्साळीने मात्र आपल्या सिनेमात सुमित्रेला, पारोच्या आईला अमर केले आहे.किरण खेरची सुमित्रा हळवी आहे, स्वप्नाळू आहे. काहीशी भाबडी आहे, सोशिक आहे. आशावादी आहे. एका लहान मुलासारखी उत्साही आहे. पारोचे देवदासशी लग्न होणार या कल्पनेनें ती आनंदित होते. भान हरपून नाचते आणि जेव्हा अपमान होतो तेव्हा मात्र ती बदलते. “आयी तो थी तुझे दुवा देने की तेरे घर चाँद सा बेटा हो. पर अब तो यही दुवा निकलती है, की तेरा घर भी चांदनीसे आबाद हो. तेरे घर भी बेटी हो “
मुलीचा झालेला अपमान सहन न झाल्याने तिच्या तोंडातून हे शब्द येतात. आपल्या मुलीच्या सन्मानासाठी कुणाचीही पर्वा न करणारी आई किरण खेरने जिवंत केली.
हे एकविसावे शतक आहे. या शतकातली स्त्री स्वतंत्र आहे. स्वतःच्या पायावर उभी असल्याने धाडसी आहे. स्मार्ट आहे. करिअरिस्ट आहे. हाय सोसायटीत वावरणारी आहे. सन्मानाने जगणारी आहे.
एकल पालकत्व असो किंवा कुटूंबात राहूनही स्वतःचे अस्तित्व जपणारी असो..आईचा एक वेगळा चेहेरा हल्लीच्या काही चित्रपटात दाखवला गेला आहे. आई या शब्दाच्या समाजाने ठरवलेल्या चाकोरी बाहेरील का असेना, त्या बऱ्यापैकी सत्याच्या जवळ जाणाऱ्या आहेत. अस्सल आहेत.

जाने तू या जाने ना मधली सावित्री 

जाने तू या जाने ना ही एक प्रेमकथा आहे. नायक आणि नायिकेच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात तर झाले आहे पण या दोघानांही आपल्या मनाचा अंदाज नाही. रत्ना फाटक ह्यांनी या सिनेमात नायकाच्या (इम्रान खान) च्या आईचा रोल वठवला आहे. ही आई आपल्या मुलाच्या बाबतीत हळवी आहे  पण एवढी हळवी आहे की एकप्रकारे मुलगा मोठा होऊन ही त्याच्या निर्णय स्वातंत्र्यावर तिचा अविश्वास आहे. आपल्या वडिलांचा लढाऊ बाणा मुलात उतरू नये म्हणून ती प्रयत्नशील आहे आणि तरीही ती मुलाची मैत्रीण आहे. 
कपूर अँड सन्स मधील आईचा रोल तसा कठीण आहे. हे पात्र गुंतागुंतीचे आहे. ही आई परफेक्ट नाही. मुलांना वाढवताना तिच्या हातून चुका झाल्या आहेत. काही गोष्टी लपवून ठेवून तर तिने त्यांचे नुकसान केले आहे.
यातील आईचा चेहेरा अपूर्ण आहे, मानवी आहे. 

मिमी या सिनेमातील नायिका.

राजस्थानच्या एका खेड्यातून सिनेमात काम करण्यासाठी नायिका बॉलिवूडमध्ये येते. पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी एका अमेरिकन जोडप्यासाठी सरोगसी आई होण्याची ऑफर स्विकारते. जेव्हा ते मुल डाऊन सिन्ड्रोमची शिकार असेल हे लक्षात येते, तेव्हा जोडप्याने मुल स्विकारण्यास नकार दिल्यावरही त्या मुलाची आई होण्याची जबाबदारी पेलवते.

बधाई हो या सिनेमात नीना गुप्ता वयाच्या बावन्नाव्या वर्षी गरोदर राहते.


गर्भपात हा पर्याय असूनही मूल वाढवण्याचा निर्णय घेते. तिची मुलं मोठी आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी स्विकारणे कठीण. अजूनही आपल्या समाजात आई वडिलांचे सेक्स लाईफ हे सहज पचनी पडत नाही. ते मुलांसाठी आदरणीय असतात, त्यांचे पालक  असतात पण मुलं हे विसरतात की ती सुद्धा सर्वसामान्य माणसे असतात आणि त्यांनाही ह्या गरजा असतात. ज्या वयात नातवंडे सांभाळण्याची अपेक्षा असते त्या वयात हा निर्णय घेणे आणि त्या भूमिकेचे बेअरिंग सांभाळणे नीना गुप्ताने आपल्या अभिनयाने सहज केले आहे. हे सहज स्विकारले जावे हाच सिनेमाचा हेतू आहे.

इंग्लिश विंग्लिश ह्या सिनेमाचा विषय तर गृहिणींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. 

अनेकवेळा घर आणि संसाराला वाहून घेतलेल्या स्त्रिया स्वतःची स्वप्ने विसरतात. घरातील इतर लोकांवर आपले लक्ष केंद्रित करतात. हा जॉब पूर्ण वेळ असूनही अनेक वेळा त्याची किंमत नसते. नवरा मुलं सर्वच तिला गृहीत धरतात. अनेकवेळा कुचेष्टा करतात.
शशी ही अशीच एक गृहिणी. नवरा आणि मुलं हेच तिचे जग. नाही म्हणायला, लाडू करून विकण्याचा तिचा छोटासा व्यवसाय आहे पण त्याचे काही घरातलं लोकांना कौतुक नाही. त्यात तिला इंग्रजी नीट बोलता येत नाही म्हणून तिची मस्करी करणे हे तर नेहेमीचेच. अमेरिकेला जायचा एक चान्स तिच्या आयुष्याला कलाटणी देतो. इंग्रजी बोलायला यावे म्हणून ती क्लासला जाते. मुलीनी, नवऱ्याने केलेली हेटाळणी मागे टाकून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. गेलेला आत्मविश्वास मिळवते आणि स्वतःवर प्रेम करायला शिकते.

मुलांनी टाकले, मारले तरी त्याची मनधरणी करणारी, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणारी आई ते मुलांवर प्रेम करूनही स्वतःचा आत्मसन्मान जपणारी आई हा टप्पा हिंदी सिनेमाने या शतकात पूर्ण केला. ही त्यातली काही पात्रे ज्यांनी आई या शब्दाचे विविध पैलू दाखवले.
यात तुम्हाला आवडलेली आई कोणती आहे?आणि का? 

Disclaimer–

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owners.

57 thoughts on “मेरे पास माँ है
-चित्रपटाच्या इतिहासातील आईचा बदलता चेहेरा. 

  1. Dr. Shiva Aithal

    प्रिया ताई 🙏मातृत्व या विषयावरचे तुमचे हे लेखन आणि गेल्या काही दशकांतील बॉलीवूड चित्रपटांमधील आईच्या व्यक्तिरेखेतील परिवर्तन खरोखरच फक्त मोहक अन्आi मनोरंजकच नाही तर, आई वर एक वेगळ्या प्रकारचे अध्यात्मिक मंथनाच हे. मातृप्रेमाचे सार आणि सिनेमातील मातांचे उत्क्रांत चित्रण मांडण्याची तुमची क्षमता खरोखर उल्लेखनीय आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही प्रत्येक लेखात जसे लिहिता, तुमच्या शब्दांमध्ये एक काव्यात्मक लय आहे जो हृदयाला स्पर्श करतो आणि कायमचा प्रभाव सोडतो. तुमच्या उत्कृष्ठ लिखाणातून तुमचा प्रकाश उजळवत राहा आणि तुमच्या सखोल अंतर्दृष्टीने इतरांना प्रेरणा देत राहा. 😊🙏

  2. obviously Naragis
    but Most of them are acted well.
    I dont remembar smita patil.
    u have covered a lovely span Shahid might have seen by very few .Dilip kumar n Chandra mohan n even then Lailita chitnis was fantastic

  3. Digambar.tendulkar

    Excellent Ma’am.
    The face and facts of motherhood in Indian society are changing, and that is being reflected in Movies.
    In the coming years, we will see different women as mothers, NOT different mothers as women.

  4. Vrushali Khandeparkar

    Wonderful write up. You have perfectly shown the journey of motherhood in our films. ❤️❤️

  5. काळ,प्रकृती,परिस्थिती,जीवनातील आव्हानांचे स्वरूप त्यानुसार स्त्रीचे व तिच्यातील मातृत्वाचे दर्शन घडते. चित्रपट माध्यमातून दाखवल्या गेलेल्या आईच्या भूमिकेतील पात्रांचे विविध पैलू अप्रतिम रित्या मांडलेस प्रिया. यातील कोणती आई आवडली असे विचारशील तर हत्ती व आंधळ्यांच्या गोष्टी सारखे आहे असे मला वाटते.

  6. नेहेमीसारखाच इत्यंभूत आढावा घेतला तुम्ही आईचा. यात श्यामच्या आईचा देखील उल्लेख हवा 😀
    बाकी आईचे बदलते रुप आणि तिची लोभसता याचा मात्र पुरेपुर रस उतरला आहे

    1. शामची आई मराठी म्हणून टाळला.
      पिठोरी अमावास्येला मातृ दिन असतो …तेव्हा लिहिणार आहेच.
      thank you.

  7. Satish Karmarkar

    दिल एक मंदीर है. या चित्रपटात मुलाच्या पुतळ्याचे अनावरण करतांना कार मधुन येतांनाचे अचला सचदेव यांचे मुद्राभिनय हे अविस्मरणीयच आहे. तो उल्लेख अवश्य करावे ही विनंती.

    1. काही गोष्टी राहून गेल्या …त्या वर परत लिहीनच
      थँक यू.

  8. वाह,सुंदर लेख…सिनेमातली आई ,रधाची श्रध्दा,आणि कर्तव्य मध्ये बजावलेली चोख भूमिका…मेरे पास मा हे…हे अजरामर वाक्य खूप काही प्रेरणादायी…मस्त लिहिले आहेस.हे भारतीय संसृती, परंपरा ला नीतिमू ल्य ला धरून लिहिलेले योग्य भूमिका ही आहेत चित्रपटातल्या. अगदी सर्वांस म्हणून त्या भावल्या.

  9. Pratibha Kulkarni

    प्रिया खरं सांगायचे तर मला त्या त्या काळातली ती प्रत्येक आई आवडली आहे कारण ती त्या त्या वेळी जशी परिस्थिती असेल तशी वागली आहे. कारण आपल्या समाजात आई हे व्यक्तिमत्त्व असंच अपेक्षित होतं आणि आहे……अर्थात त्याला अपवाद आॅधी मधील सुचित्रा सेन, स्मिता पाटील ह्या सारख्या आहेतच पण तरीही आई ही त्यागमूर्ती च असावी अशी अपेक्षा असते त्यामुळे सहाजिकच ती तशीच दाखवली जाते. अर्थात आता मात्र हीच आई खूप बदलत चालली आहे. ती काही अंशी का होईना स्वतःला ही प्राधान्य देते आहे आणि हा बदल खरच खूप स्वागतार्ह आहे. ….मनातून मात्र अजूनही ती “आई” च आहे जिची जागा कोण ही घेऊ शकत नाही.

    घार हिंडते आकाशी…
    चित्त तिचे पिलापाशी…..❤

    अप्रतिम लिहिलयस प्रिया. पहिला च लेख “आई” वर ! नक्की च तिचे आशिर्वाद तुला असतीलच…❤🌷🌷

    1. काय सुंदर लिहिलंस !
      खरंय , आई ती आईच .
      म्हणून मी हुतूतू आणि हायवे मधील आईचा उल्लेख केला नाही.

  10. Shalmali Gokhale

    उत्कृष्ट लेख. आईच्या सगळ्या भावछटा अनुभवायला मिळतात. एकच वाटलं, दुर्गा खोटेंचा उल्लेख हवा होता.

  11. मस्तच, ब्लाॅगमधे मजकूर आणि फोटो हातात हात घालून येतात ते भारी.
    लिखाण नेहमीप्रमाणे 👌👌👌👌

  12. अत्यंत सुंदर, अप्रतिम आई या संज्ञेचे खूप छान निरनिराळे पैलू वाचायला मिळाले. खूप सहज आणि ओघावत्या शब्दात. मस्तच… 💕

  13. संदीप पेंढरकर

    Ofcourse, नर्गिस….. ती बिरजुला गोळी घालताना एकच वाक्य म्हणते, ” वो दुल्हन गाव की लाज है, मैं बेटा दे सकती हु, मगर गाव की लाज नही दे सकती l

  14. हाँलीवुडमधील आया हा वेगळा विषय घेणार आहात का ? मला टर्मिनेटरमधील सारा काँनर आठवते जिनं आईची प्रतिमा बदलुन टाकली.
    कालच् आई या विषयावरचा एक नवीन सिनेमा netflix वर बघितला. नाव आहे The Mother. आणि मदर आहे Jennifer Lopez. एक वेगळीच् आणि कणखर माता दाखवली आहे.

    नेहमीसारखे यावर काही अभ्यासपुर्ण लिहाल का ??

    1. I am writing on Mamma Mia and The Rosemary’s baby. Out of the box movies. The mother i have not seen yet. I will surely go through it . Thank you.

  15. Shraddha Kandalgaonkar

    प्रिया
    फारच छान आणि focused लिहिले आहेस..तुझे भाषेवरचे प्रभुत्व वादातीत आहे.पण सिनेमा चा अभ्यासही मस्त आहे..असेच लेख सतत लिहीत रहा ..

    श्रद्धा

  16. वैशाली

    छान लेख…
    मला आयांची सगळीच रूपं आवडली…
    ब्लॉग सुरू करण्यासाठी छान मुहूर्त निवडलास…आईचे आशीर्वाद असणारच.खूप शुभेच्छा..

  17. वैशाली

    छान लेख…
    मला आयांची सगळीच रूपं आवडली…
    ब्लॉग सुरू करण्यासाठी छान मुहूर्त निवडलास…आईचे आशीर्वाद असणारच.खूप शुभेच्छा..

  18. प्रिया तुझ्या पोस्ट किंवा ब्लॉग वर कंमेंट करणे होतच नाही, बस तुझे लिखाण नुसते भरभरून वाचत जावे वाचत जावे असे होत राहते. अप्रतिम सुंदर खूप सुंदर …आजून पूर्ण वाचायचा आहे ब्लॉग …न वाचता आणि वाचल्यावर माझी हीच प्रतिक्रिया असेल

  19. कालानुरूप “आई” च्या भूमिकेतील बदल
    सोदाहरण मांडला आहे.
    समाजातील सर्व थरांत हा बदल दिसून येतो.

  20. सर्वप्रथम ‘ब्लॉग’ सुरु केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा! हिंदी सिनेमातील मातृदर्शन हा तुम्ही खूपच विषय रंजकपणे मांडला आहे. मातृत्वातील वेदना, ममता, ऋजुता, मार्दव, करूणा, प्रतारणा, प्रसंगोपात काठिण्य, संस्कार आणि जडणघडण यांबाबतची सजग तळमळ या बाबी हिंदी सिनेमाने खरोखरच पडद्यावर जिवंत केल्या. All these are higher points of motherhood, albeit, being human there must be gray terrains and dark crevices too.. येणाऱ्या काळात या विषयाची सम्यक, समतोल, वास्तविक मांडणी करणारे प्रगल्भ दिग्दर्शक येतील ही अपेक्षा. पुनश्च अभिनंदन आणि शुभेच्छा!

    1. विषय बराच विस्तृत होता. मजा म्हणजे ४० ते सत्तर या काळातील आईचा साचा सारखा होता. अपवाद मदर इंडिया सारखे काही सिनेमा.
      सत्तर च्या दशकातील आई स्व भान आलेल्या आहेत. नव्वद मधील चंगळवाद अंगात असलेल्या आणि सुखवस्तू
      अर्थात ethics आणि चांगुलपणा व्यक्तिरेखेत असल्याने लक्षात येत नाही … पण वेशभूषा आणि एकूणच पैसे उडवणे .

      विसाव्या शतकापासून आई बदलली आहे .. मिमी काय किंवा इंग्लिश विंग्लिश
      ह्या त्यातल्या त्यात matured व्यक्तिरेखा .
      Thank you.

  21. Hi Priya , the different facets of Mother in Hindi Cinema is a topic where it’s really difficult to mention all the aspects of Mother. But you have very beautifully written about Mother in different eras. Enjoyed reading it. I loved Sri Devi’s role in English Vinglish. I think that’s a role which most of the women can relate with today, as in every middle class house, children keep criticising their mother for the wrong pronunciations n simple habits.The determination of Shashi is praiseworthy n does give a lesson to every mother that she must pursue her dreams at any cost…..Aradhana was another beautiful movie in which Sharmila Tagore enacted the role of a Sacrificing Mother so well….. Keep writing… Would love to read your blogs.

    1. Thank you Nita.
      I have covered ninety years of film industry. From Shaheed to English-Vinglish, the transition was inevitable. I have not only seen this but experienced it also. Shashi is very close to heart because i can easily relate to her.
      Thank you once again.

  22. Vandana Tendulkar

    प्रिया नेहमीप्रमाणेचं तुझं लेखन अफलातून…प्रत्येक पिढी दरम्यान आईची प्रतिमा बदलत गेली पण मातृत्व तेच तसंच असतं ह्याचे पदर छान उलगडले आहेस…आई म्हटल्यावर ती प्रेमाने ओथंबलेली असली तरी कर्तृत्वात ती माता कधीही मागे पडत नाही….मला रीमा लागू ही आई नेहमीच आवडायची.सुखवस्तू सधन कुटुंबातील आईचा रोल तिने साकारला आहे.खर पाहता अशा कुटुंबातील आयांची आतल्या आत मुस्कटदाबी,कुतरओढ होत असते.तरीही अशा आयां ती कसरत चेहऱ्यावर कधीही न दाखवता त्या समाजात वावरत असतात.. ते रूप रिमाने आपल्या अभिनयाद्वारे खूपच छान साकारलं आहे…तिच्या त्या अभिनयाने कळायचं की अशा समाजातील आया ह्या नटवून ठेवलेल्या बाहुल्या असतात.…अर्थात काही अपवाद असतील म्हणा…रीमा आवडली म्हणून इतर आवडल्या नाहीत असंही नाही हं,सगळ्या आपापल्या परीने the great च….एकंदरीत तुझं कौतुक व लेखन शैलीला सलाम❤️

    1. रीना आपल्या काळातली आई. घरात असलेली, गृहिणी असलेली तरीही संपन्न, नीटनेटकी, स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव असलेली तरीही कमिटेड ..
      आणि रीना फार सुंदर दिसली आहे .
      Thank you Vandana.

Leave a Reply to Vrushali Khandeparkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *