Skip to content

 वेदनेची सम्राज्ञी-मीना कुमारी

विनोद मेहता यांनी लिहिलेले मीना कुमारी हे पुस्तक नावाजले गेले आहे . बर्यापैकी रिसर्च करूनही किती तरी गाळलेल्या जागा राहतात . त्या भराव्या असे वाटतही नाही . या पुस्तकाची सुरुवात आणि शेवट एका वाक्याने केला आहे ” Wish I had known you “

पाकिजा आणि साहब बीबी और गुलाम या सिनेमांनी तिची एक प्रतिमा निर्माण केली , जी तिच्या आयुष्याशी  मिळती जुळती होती. कदाचित त्यामुळेच सहन करणारी , प्रेमाला तरसणारी , आयुष्य उध्वस्त करून घेणारी सोशिक भारतीय नारी अशा रूपातील मीना आठवते .
या दोन भूमिकांनी ट्रॅजेडी क्वीन म्हणून ती अजरामर झाली.
तिच्या चेहऱ्यातील सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे तिचे भावपूर्ण काजळी टपोरे डोळे. अश्रूभरल्या डोळ्यांनी तिने प्रेक्षकांकडे पाहिले की थिएटर मुसमुसायला लागायचे. तेव्हढी ताकद होती त्यात. मग अशा काही घटना घडत गेल्या की ती जिवंतपणी आख्यायिका बनली.
तिच्या काळातील ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. १९६३ मध्ये ज्या तीन भूमिकांना फिल्मफेअरने पारितोषिकासाठी निवडले , त्या तीनही भूमिकांना तिचा चेहेरा होता. हा एक रेकॉर्ड आहे. जर तिच्या भूमिकांचा आवाका पहिला तर लक्षात येते, तिची स्पर्धा तिच्याशीच होती. आझाद , कोहिनूर नी मिस मेरी या भूमिका हटक्या आहेत..  She had impeccable comic timing.
तिच्या दुःखी भूमिकात  सुद्धा मेलोड्रामा नाही.  
तिला फार शब्दांची गरज भासतच  नाही. तिचे डोळे बोलतात.  काठोकाठ भरलेल्या डोळ्यांतील पाणी कधी पापण्यांचा पहारा सोडून बाहेर येत नाही. तिच्या दुःखासारखेच ते थिजून राहते.हसावे मधुबालासारखे .अगदी खळखळून …
रडावे मात्र मीना सारखे .  
दुःखाला सुद्धा या बाईने मानी बनवले हे विशेष.
ग्रेस च्या कविता जशा वाचून झाल्यावर छळतात तशा तिच्या भूमिका, सिनेमा संपल्यावर आपला पाठलाग करत राहतात.
पुढे सिनेमातील जग नी खरे आयुष्य यांची सरमिसळ होऊ लागली. एक प्रतिमा बनत गेली जी नष्ट करणे तिच्यातल्या कसलेल्या अभिनेत्रीला सुद्धा जमले नाही. 

पडद्यावरची इमेज जेव्हा तिच्या आयुष्याचा भाग बनली तेव्हा करिअरच नाही तर तिच्या आयुष्याची घसरण सुरु झाली.  एक मात्र निश्चित, पाकिजा आणि  साहेब बीबी और गुलाम हे दोन सिनेमे तिच्या प्रवासातील जरी milestones असतील तरी वेगळ्या अशा अनेक  भूमिका आहेत , गाणी आहेत ज्यांनी ती परिपूर्ण अभिनेत्री आहे असे आपण निश्चित म्हणून शकतो.
३१ मार्च १९७२ मध्ये या जगातील तिची भूमिका संपली. तिला जाऊन चोपन्न वर्षे पूर्ण होतील. तिच्या गाजलेल्या काही गाण्यांचा  हा आढावा.  जेवढ्या काही भावना अस्तित्वात आहेत , त्या तिने आपल्या अभिनयाने जिवंत केल्या आहेत.

१) वात्सल्य
” आ जरी आ निंदिया तू आ ” (गायिका –लता मंगेशकर, चित्रपट – दो बिघा जमीन  )
——————————————————————————-

परिणिता आणि दो बिघा जमीन या दोन्ही सिनेमांचे  शूटिंग एकाच स्टुडिओत चालू होते.  बिमल रॉय दिग्दर्शक. आपले काम संपवून मीना,  दो बिघा जमीनचे शूटिंग पाहायला जायची.
हा सिनेमा पाहून ती एवढी भारावली की ती तिने हट्ट धरला , “ दादा, मला एक छोटीशी का होईना , यात भूमिका द्या “
सिनेमाचा विषय गंभीर, शिवाय ही शोकांतिका. प्रेक्षकांना रिझवण्या साठी काही गाणी किंवा विनोदी प्रसंग याला जागाच नव्हती. तरीही कुठे तरी एक हलकासा सुखद क्षण यावा म्हणून “ आ आरी आ , निंदिया या तू आ “ हे गीत लिहिले गेले.
” आ जरी आ निंदिया तू आ ” ही हिंदी सिनेमातील मन शांत करणारी अंगाई  मीना कुमारीवर चित्रित आहे . खानदानी वेशभूषा, कपाळावरील घुंघट, कुशीत विसावलेले मुल, त्याचा हात तिच्या चेहेऱ्यावर  विसावलेला, अगदी विश्वासाने.  चेहऱ्यावर  मूर्तिमंत वात्सल्य आणि याला जोड लताबाई यांच्या आवाजाची .
ही भूमिका आणि हे गीत केवळ मीनासाठी तयार केले. आईच्या भूमिकेत ती जेवढी शोभून दिसली तेवढी वात्सल्यमूर्ती कुणालाही साकार करता आली नाही.
संसार की रानी है तू, राजा है मेरा लाडला
दुनिया है मेरी गोद में, पूरा हुआ सपना मेरा
आजा री आ, निंदिया तू आ….

हाताचा पाळणा करून जोजवणारी मीना .
मीना कुमारीला आई व्हायचे होते आणि कमाल अमरोही यांनी ते होऊ दिले नाही असा प्रवाद आहे . हे  विभक्त  होण्याचे एक कारण सांगितले जाते . असेही म्हंटले जाते, करिअरला बाधा येऊ शकते म्हणून मीनाने मूल  व्हायला दिले नाही. पुढे जेव्हा वाटले तेव्हा बराच उशीर झाला. ते ही शक्य आहे. लग्नानंतर तिच्या यशाचा आलेख उंचावत गेल्या. सिनेमा तिच्या नावावर विकले जाऊ लागले. ते यशस्वी सुद्धा होऊ लागले.
कलाकाराच्या जगातले  नियम वेगळे असतात. त्यात एकदा आई झाली की भूमिकांचा ओघ नी  स्कोप दोन्ही कमी होतो.
पण जसे अंगाई म्हंटली की लता मंगेशकर यांचा आवाज गुंजू लागतो तसेच पडद्यावर आईच्या प्रतिमेला मीना कुमारीने स्वतःचा चेहेरा दिला. पडद्यावर काम करणाऱ्या सर्व बाल कलाकारांची ती लाडकी माँ होती. अनेकांच्या खूप मधुर आठवणी आहेत. डेझी इराणी यांनी म्हंटले आहे, ती एवढी प्रेमळ होती की माझी सिनेमातच नाही प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तीच आई व्हावी असे मला नेहेमी वाटायचे. तिच्या सावत्र मुलांची सुद्धा ती अतिशय लाडकी अम्मी होती .
किशोरी ताईंचे सहेला रे मी ऐकते , तेव्हा वाटते , त्याचा सहेला , त्यांचे संगीत असणार .
मीनाचे मूल , तिच्या भूमिका सुद्धा असतील … तेवढाच न्याय तिने आपल्या भूमिकांना दिला आहे. तितकेच झोकून तिने काम केले आहे.

२ )भक्ती
लौ लगाती गीत गाती  (गायिका –लता मंगेशकर, चित्रपट –  भाबी की चुडिया )
————————————————————————

सध्या आस्तिक नास्तिक वाद रंगतोय. आपण आस्तिकका नी कसे झालो ही ही सांगता येणार नाही एवढ्या न कळत्या वयापासून मी आस्तिक आहे.
अम्मा सकाळी देवाकडे दिवा  लावून , फुले घालून चार पाच श्लोक म्हणून पूजा आटपायची नी कामाला लागायची.  तिच्या दिनक्रमाचा तो एक भाग होता . संध्याकाळी न चुकता दिवे लागणीच्या वेळेला घरात देवापुढे दिवा लावून परवचा, कविता, श्लोक एकत्रच म्हंटले जायचे.

कशालाही न घाबरणारी अम्मा पावसाला घाबरायची. वीज चमकायला लागला की तिचे ओठ शिवस्तुती पुटपुटायचे. ते ऐकू यायचेच असे नाही ..पण मंगेशवर असलेली श्रद्धा , विश्वास , त्याला घातलेले साकडे जाणवायचे. तो सुखरूप  ठेवेल हा तिचा प्रबळ विश्वास जाणवायचा नी आम्हीही निर्धास्त व्हायचो. देवाच्या फोटोसमोरील ठेवणारे छोटेसे निरांजन,ढगाळ काळोखी वातावरणात त्या छोट्याश्या प्रकाशात चमकणाऱ्या भिंती, केवड्याच्या अगरबत्तीचा दरवळ आणि खिडकी कडे उभी राहून शिवस्तुती म्हणणारी अम्मा हे दृश्य अजूनही आठवते नी मग मन शांत होते.
“भाबी की चुडिया” मधले ज्योती कलश ही गीत जास्त प्रसिद्ध आहे पण हे गाणे लागले की देवाला स्वतःबरोबरच घेऊन आपली रोजची कामे उरकणारी अम्मा आठवते मला.
याची चित्रीकरण सुद्धा अगदी साधे.
निरंजनात लावायला वाती वळणारी एक साधीशी गृहिणी. अंगणातल्या तुळशीला दिवा दाखवताना उजळलेला तिचा चेहेरा घरातल्याच साध्याश्या फुलांचा बनवलेला हार , मनापासून म्हंटलेली प्रार्थना ,  ठसठशीत कुंकवाने विलक्षण तेजस्वी दिसलेला तिचा चेहेरा.

हर घर में हर सुहागन
मंगल रहे मानती
लौ लगाती गीत गाती
त्यात मागितले काय तर सौभाग्य. घरातल्या सर्वांच्या सुखासाठी केलेली विनवणी.
नंतर सुरु झालेली तिची न संपणारी कामे ..नी तरीही चेहेऱ्यावर असलेला प्रसन्न भाव . मीनाच्या चेहेऱ्यावर ती तृप्ती सुद्धा केवढी मोहक वाटते.

३) खेळकर
ना बोले ना बोले ना बोले रे ( सिनेमा आझाद , आवाज -लता मंगेशकर)
—————————————————————–

आझाद हा सिनेमा तद्दन व्यावसायिक सिनेमा  होता. मीनाकुमारीची भूमिका एका अल्लड मुलीची आहे. तिच्या प्रतिमेशी विसंगत. एक वेगळीच खेळकर, हसरी मीना इथे पाहता येते . एक नर्तिका म्हणून जरी ती प्रसिद्ध नसली तरी मुळातच डौलदार असल्याने अतिशय आकर्षक दिसते , नाचते .. 

याद करो जमुना किनारे, साँवरिया
ओढ़ी थी राधा की काहे गगरिया
इस कारन ना तुम संग बोले रे, राधा ना बोले, ना बोले रे
यमुनेच्या काठावर पाणी भरायला जाणाऱ्या गोपींची खोडी काढणे हा कृष्णाचा छंद आणि राधा तर त्याची आवडती गोपी . जिच्यावर प्रेम तिलाच सतावणार न !  आज मात्र त्या गुन्ह्याला माफी देण्याचा काही इरादा नाही . वाट अडवल्याने, आधीच घरी परतायला उशीर झालेला आहे आणि त्यात भरलेली घागर सुद्धा फोडली मग कसे माफ करणार! त्याला त्रास देण्याचा उपाय माहित आहे तिला . 
बोलायचे नाहीच. बोलणे तर राहूदेच, चेहेरा सुद्धा दाखवायची तयारी नाही तिची. 

रूठी हुई यूँ ना मानेगी छलिया
चरणों में राधा के, रख दो मुरलिया 
त्याच्या विनवणीने मात्र तिच्या हृदयाला पाझर फुटला आहे . तरीही त्या मानिनीची बोलायची तयारी नाहीच जोपर्यंत आपली प्राणप्रिय बासुरी तो तिच्या पावलावर ठेवून सफशेल माफी मागत नाही . नृत्याच्या स्टेप्स खूप साध्या आहेत पण  भाव … आहा Priceless

४) मुग्धता
नग्मा ओ शेर की सौगात किसे पेश करूं (गायिका –लता मंगेशकर , चित्रपट -गजल )
——————————————————————————-

हे प्रेमगीत नाही. प्रेमाच्या आधीची पायरी आहे ही. प्रेमापेक्षा याची लज्जत जास्त. निसर्ग नियमाने वयात आल्यावर , शरीरच नाही तर मन सुद्धा बदलते आहे. पहिल्यांदाच स्वतःच्या कोषातून , बाहेर पडून , स्वतःपेक्षाही कुणावर तरी जीव ओवाळावा अशी ओढ लागणारे हे वय. तो  कुणावर जडवावा  याचा मात्र तिला अंदाज नाही.
ही स्थिती तशी सुरक्षित ..
समोरच्याचा चेहेराच अनोळखी असल्याने, त्याच्या परिणामाची भीती नाही. प्रेम निभावण्याची जबाबदारी सुद्धा नाही . केवळ कल्पनेने शहरण्याचा हा काळ.

गर्म सासोमे छुपे राज बताऊ कीस को
नर्म होठो में दबी बात किसे पेश करू
नुकताच तारुण्याला आवाज फुटलेल्या वयातील ही मुलगी .आता कुठे प्रेम या शब्दाची ओळख पटू लागली आहे पण ती ओळख पटवून देणाऱ्याचा शोध घेण्याची ओढ .
माझ्या मुग्ध भावना , ज्या सुप्तावस्थेत आहे त्या कोणावर उधळू ?
एवढा आर्जवी आणि तरीही निरागस प्रश्न …

इथे कॅमेरा तिच्या चेहेऱ्यावर  रेंगाळतो …
तिचे भुरभूरणारे केस , गालावर रेंगाळणाऱ्या बटा, चंचल, अस्थिर, लाजरे डोळे ,

नर्म होठो में दबी बात किसे पेश करू,  म्हणणारे ओठ …
ओठात दबलेल्या त्या निर्जीव माळेचा सुद्धा हेवा वाटतो …

५) रोमँटिक 
मेरी जा मेरी जा ( गायिका -लता मंगेशकर, चित्रपट -यहुदी )
——————————————————–

प्रेमात पडणे हे पडलेल्या माणसासाठी अंतिम सत्य असतें. पडेपर्यंत मात्र आपला विश्वास बसत नाही.जेव्हां तो क्षण येतो, हो , प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ,तेव्हा Cynic turns into zealot.
प्रेम चेहेऱ्यावर दिसता कामा नये आणि  लपवता तर येत नाही , अशा स्टेज ला माझी मैत्रीण, एकी बद्दल म्हणाली होती, काय खुळ्या सारखी ती हसतेय.. मंद वाटते. 
एका मोठ्या अपघातात पडावे पण जखमेची खूण काही दाखवता येत नाही . प्रचंड भूक तर लागलीय पण त्याच्या आठवणीत धड घास जात नाही ,, एकाच वेळी सारे चराचरआपल्या बरोबर बागडत आहे असे वाटते तर दुसऱ्याच क्षणी अनामिक भीतीने पोटात खड्डा पडतो.
तो दिसला की न पुसता येणाऱ्या लालीने चेहेरा गुलाबी होतो. आयुष्याचच सोहळा होणे म्हणजे काय हे जाणण्याचा हा क्षण .This is a euphoria. ही अनुभूती देणारा अनोळखी परदेशी असेल तर !
भारतीय कलाकारांनी “उर्दु बोलणारी रोमन पात्रे” पडद्यावर रंगवणे हे एक मोठे धाडस होते पण बिमल रॉय च्या दिग्दर्शनाने हे साध्य झाले.  ज्या काळात, रोमन राज्यात ज्यू लोकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जात होती त्या काळात एक मूळची  रोमन पण ज्यूच्या घरात वाढलेली मुलगी एका रोमन राजकुमाराच्या प्रेमात पडते.
तिला तो कोण आहे त्याची कल्पना नाही. एका गाफील क्षणी ती त्याच्याकडे बघून हसल्यावर , ती फसण्याऐवजी तोच घायाळ झाला आहे. जे घडायला नको ते घडून गेले तरी त्याची कबुली द्यायची तिची तयारी नाही आणि हा सावधगिरीचा इशारा मानायला तिच्या हृदयाची तयारी नाही .

जिनकी निगाहों ने घायल किया,
लेंगे उन्हीं से दिल की दवा
न हम मुस्कुराते न वो पास आते
उसकी मिली है हमको सज़ा, क्या करें
मेरी जाँ मेरी जाँ …

एकाचवेळी आकर्षक , खोडकर आणि जिद्दी दिसण्याची किमया केवळ मीनाच करू शकते. उंचावलेल्या भुवया , मुडपलेले ओठ आणि खट्याळ डोळे .. अभिनयाची रेंज अशा गाण्याच्या माध्यमातून सुद्धा दिसून येते.

६) आर्तता
कच्ची है उमरिया कोरी है चूनारिया, मोहे भी रंग देता जा ( सिनेमा- चार दिल चार राहें , गायिका-मीनाकपूर, )
—————————————————————————————————

प्रेम सगळ्यांसाठी सारखं नसते.  माणसे तरी कुठे सारखी असतात!सुंदरता, हुशारी, श्रीमंती…या सगळ्या गोष्टी माणसाला आत्मविश्वास देतात , बळ देतात..नकाराची भीतीच माहित नसणारी माणसे प्रेमात पडली की आणि सुंदर दिसतात. ज्याच्या वाट्याला नकारच आला असेल त्यांचे काय !  
निसर्गनियम सारखा असतो. वयात येताना कुणावर तरी जीव जडतोच. आत्मविश्वास नसलेल्या माणसांना मात्र  स्वतः मधली कमतरता दुसऱ्याच्या नजरेत पाहताना अधिकच जास्त वाटते..मनातला न्यूनगंड उफाळून येतो ..
अनेक वेळा अकल्पित झालेले प्रेमाचे दर्शन दुःखाला निमंत्रण देते.

गावात होळीचा सण साजरा होत आहे. स्त्री पुरुष आनंदाने विभोर होऊन नृत्य करत आहेत. प्रणयाचे नर्तन. प्रत्येकाचा हक्काचा जोडीदार आहे. त्यांच्या थिरकत्या पावलांत मिलनाची ओढ आहे.
ती मात्र एकटी. 
जन्माने हरिजन, रंगाने काळी नी नशिबाने अनाथ, गरीब सुद्धा पण अंगात उफाळलेल्या मदन ज्वराला ह्याचे काही पडलेले नाही.
तो त्याचे काम चोख बजावतो.

तन भी सम्भाला मन भी सम्भाला, संभाले न नैनो की झाड़ियां
गये सब सखियां, रोये मोरी अखियां
कभी तो सुध लेता जा
ह्याचा सुरुवातीचा सीन बघा. बाहेर वाद्यांचा कल्लोळ, नृत्याचा जल्लोष. ती मात्र विचारात हरवलेली. स्वतःच्या रुपाची तिला जाणीव आहे. आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहून ती नाक मुरडते. नंतर कपडे.. दागिने..काहीच तर नाही तिच्याकडे पण मनातल्या लहरीं मात्र तिला न जुमानता उफाळू लागतात. न कळत मनाचा निश्चय होतो. जेवढे शक्य आहे त्यात ती स्वतःला सुंदर बनवण्याचां प्रयत्न करते. 
स्व ची जाणिव होण्यासाठी एक क्षण पुरे असतो . नंतर मात्र स्वतःच्या मनातील शंकासुराचे दफन करून ती साद घालते, “मोह भी रंग देता जा मोरे सजना , मोह भी रंग देता जा”
प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते हे लिहिणाऱ्या पाडगावकरांनी मीनाची ही गाणी पाहिली असती तर हे लिहिलेच नसते. 

७) मादकता
दिल जो न कह सका ( सिनेमा -भीगी रात , गायिका -लता मंगेशकर )
—————————————————————-

“दिल जो ना कह सका”

आपण प्रेमात पडलो आहोत हे ज्या क्षणाला समजते, त्या क्षणापासून जीवाची घालमेल सुरु होते. आपल्या भावना, आपल्या प्रियकराला पोचवणे काही सोपे नाही. नक्की कसा प्रतिसाद मिळेल याची काळजी तर असतेच, त्या बरोबर नकार आलाच तर तो पचवायची क्षमता नसते. गैरसमज झाला तर जुळलेली मैत्री सुद्धा या वळणावर तुटू शकते. अशावेळी योग्य वेळ आणि योग्य स्थळ याची वाट पाहणे फक्त हातात उरते आणि काहीच  भाग्यवंत लोकांच्या जीवनात अनेक शक्यता घेऊन आलेली ही रात्र अवतरते.

नग्मा सा कोई जाग उठा बदन में
झनकार की सी थरथरी है तन में
प्यार की इन्हीं धड़कती फ़िज़ाओं में
रहने की रात आई…
दिल जो न कह सका, कहने की रात आयी

“एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले”  ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ प्रेमाचे सार आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे‘ हे नक्कीच सर्वात मधुर शब्द असतील पण त्याचा उच्चार करणे अतिशय कठीण आहे. त्या दोघांसाठी ते शब्द, केवळ शब्द नसतात. ते सप्तपदीचे पहिले पाऊल असते. निदान त्या जन्मापुरती तरी सोबतीची खात्री असते. एकदा ती दिली की नात्यात बांधिलकी आली. समर्पण ज्याला जमते त्यांनीच ह्यात हात घालावा.

अब तक दबी थी एक मौज-ए-अरमां
लब तक जो आई, बन गई हैं तूफां
बात प्यार की बहकती निगाहों से
कहने की रात आई.

१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “भीगी रात” या सिनेमातील हे गीत. चित्रपटाच्या नावाला साजेशा वादळी रात्री या गीताचे चित्रीकरण एका निर्मनुष्य गुहेत केलेले आहे. त्या काळाचा विचार केला तर अतिशय धीट चित्रीकरण.नायिकेच्या ( मीना कुमारी ) शरीराला कंप सुटलेला आहे, ओठावर लज्जा फुललेली आहे पण डोळ्यात मात्र उद्याची स्वप्ने तरळत आहेत..
प्रदीप कुमारच्या गळ्यातील स्कार्फ उगाच घट्ट होत नाही. ती जे मोकळ्या शब्दात सांगते त्याने बाहेरील वादळाचा सुद्धा श्वास थांबेल. बाहेर पावसाचे थैमान चालू आहे. पावसाने फक्त शरीरच भिजत नाही तर मन सुद्धा ओलेचिंब होते. मनातले शब्द ओठावर आणण्यासाठी कोणती दुसरी मुहूर्त-वेळ मिळणार!
रात्र हलक्या पावलांनी पुढे सरकत आहे.ती संपूच नये असे वाटणारा हा  क्षण मजरुह सुलतानपुरी आपल्या शब्दात पकडताना लिहितात,

गुज़रे ना ये शब, खोल दूँ ये जुल्फें
तुम को छुपा लूँ, मूँद के ये पलकें
नायिकेच्या डोळ्यातील अभिलाषा आणि लता बाईंच्या सुरातील मादकता यापुढे जळणारी शेकोटी सुद्धा टिकू शकणार नाही.

मीनाकुमारीचे सुरुवातीचे सिनेमा पहिले तर नवल वाटते , एवढी रेंज असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ट्रॅजेडी क्वीन म्हणून का व्हावी ? त्या काळी  दक्षिणेच्या कौटुंबिक चित्रपटांची चलती होती. मेलोड्रामा असलेले हे सिनेमा भारतीय प्रेक्षकांना , त्यातही महिलावर्गाला अतिशय आवडत. सावित्री ही अभिनेत्री या मेलोड्रामा साठी अतिशय प्रसिद्ध होती. त्या चित्रपटांच्या रिमेक मध्ये मीना कुमारीने काम केले आहे. हे सिनेमा गाजले आणि तिला एका साच्यात बसवले गेले.
आरती हा सुद्धा अशाच एका सिनेमाचा रिमेक होता.

८)आशा
कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी,बहारों की मंज़िल राही ( सिनेमा -आरती , गायिका -लता मंगेशकर)
———————————————————————————————

आरती हा कौटुंबिक मेलोड्रामा पण यातली मीनाची भूमिका फार वेगळी होती . डॉक्टर असलेली ही मुलगी एका कवीच्या प्रेमात पडते.
त्याच्याशी सर्वांचा विरोध पत्करून लग्न करते. स्वतःची प्रॅक्टिस चालवत असताना घरच्या लोकांना आपलेसे करून घेते .
पतीपेक्षा , पत्नी यशस्वी असेल तर तिचे यश पतीला सहन करता येत नाही. समाज सुद्धा त्याची हेटाळणी करतो आणि त्याचा न्यूनगंड संसार उध्वस्त करतो.
या गाण्याची पार्श्वभूमी माहित नाही पण this is a song that speaks of hope

लम्बी सही दर्द की राहें, दिल की लगन से काम ले
आँखों के इस तूफ़ाँ को पी जा, आहों के बादल थाम ले
दूर तो है पर, दूर नहीं है
नज़ारों की मंज़िल राही , बहारों की मंज़िल राही

बाहेरचा अंधार त्याच्या मनात सुद्धा आहे. आता पर्यंत मिळालेले अपयश त्याचे एकट्याचे पण आता त्याच्या आयुष्यात त्याच्या सहचारिणीने प्रवेश केला आहे . तिला सुद्धा याची झळ सोसावी लागेल या कल्पनेने तो अजून खचलेला आहे. तो त्या विवंचनेत आणि ती त्याच्या काळजीत. अशावेळी कुठून तरी आश्वासक शब्द येतात ,
कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी
बहारों की मंज़िल राही

तिच्या गंभीर चेहेऱ्यावर आता हास्याची अस्पष्ट रेखा उमटते. यानंतरचे शब्द तिचे आहेत.  तिच्या नजरेत करूणा नाही, काळजी नाही तर धीर आहे, त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आहे आणि त्याच्याबरोबर वाट चालण्याचा निर्धार आहे.

९)संयम
अजीब दास्तां है ये ( सिनेमा -दिल अपना और प्रीत पराई , स्वर -लता मंगेशकर )

काही गोष्टी टाळणे आपल्या हातात नसते. कितीही काळजी घेतली; सावधगिरी बाळगली तरी जे घडते त्यावर ताबा ठेवणे शक्य नसते. अपघात घडून गेल्यावर हातात असते ते कारणे जाणण्याचा प्रयत्न करणे, त्यातला स्वतःचा भाग समजावून घेणे, नुकसान कमी करता येईल यावर लक्ष देणे , चुकांना सुधारता येत नसेल तर त्याला पूर्णविराम देणे नी शक्यतो त्या पासूनच लांब जाऊन स्वतःला स्थिर करणे .
मी चुकूच कसा शकतो असाच अहंकार बाळगून रडत बसले तर बुडत्याचा पाय अजून खोलात जातो .
प्रेमात झालेला विश्वासघात सुद्धा अनपेक्षित असतो. अनेकवेळा त्यात कुणाचा दोष असतो असेही सांगता येत नाही.
कधीतरी अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते की ज्यावर कोणाचेही नियंत्रण नसते.
दिल अपना और प्रीत पराई या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण आहे

नायक ( डॉ सुशील ) सर्जन तर नायिका ( करुणा )  नर्स . एका ऑपरेशनच्या दरम्यान दोघांची भेट होते आणि एकाच भेटीत एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. तो अतिशय निपुण सर्जन. आपल्या पेशाशी प्रामाणिक.  रुग्णांची सेवा हा त्याचा धर्म .
ती अनाथ. नर्स या पेशाला तिने सुद्धा वाहून घेतले आहे. कामात हुशार, सहकारी आणि पेशंट या दोहोंत प्रिय.
त्या दोघात एक नाते रुजतेय पण त्याचा उल्लेख अजून तरी एकमेकांकडे त्यांनी केलेला नाही .
याच वेळी , पतीने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याची आई, त्याचे लग्न , पतीच्या मित्राच्या मुलीशी ठरवते.
पतीच्या निधनानंतर त्यांनी बरीच मदत केली आहे त्याची जाणीव नी कदाचित या श्रीमंत मुलीचा आपल्या मुलाला हॉस्पिटल बांधणीत उपयोग होईल हा छुपा हेतू .
तो नाही म्हणू शकत नाही . मातृऋण नाकारता येत नाही. जे घडते त्याची जाणीव सुद्धा करुणाला नाही. होते तेव्हा लग्न होऊन तो परत आलेला आहे.

स्वप्नाच्या राज्यात रमलेले असताना अशी जाग येणे हे कुणासाठीही कठीण .
पण अजीब दास्तां मध्ये आक्रोश नाही. परिस्थितीचा प्रामाणिक स्विकार आहे. “वो जो  अपना था और किसीका क्युं  है “ह्या प्रश्नाचे उत्तर तसे सर्वाना माहित असते पण आपला अहंकार ते मान्य करत नाही. इथे मात्र आहे ती शरणागती, नियतीपुढे हरल्याची स्वीकृती आणि त्यातही जाणवणारी एक अदब . स्वतःचा आब राखून ठेवलेले अंतर.
मीनाचा हा जो संयम आहे त्याने हे गाणे फार वरच्या दर्जाला नेले आहे .
एक पाठ आहे ह; सर्वासाठीच ज्याने आयुष्यात अपयश पाहिले आहे .

जे घडले त्यात तशी कुणाची चुकी आहे ?
त्याच्या आईने आपले वचन पूर्ण केले आहे , शिवाय जे घडवले आहे त्यात मुलाचे भले होणार याची तिला खात्री आहे ..
त्याच्या पत्नीची तर काहीच चुकी नाही ..
ठरवून केलेले लग्न हा व्यवहार असतोच. ती सुंदर आहे, शिक्षित आहे, मोठ्या खानदानी, श्रीमंत घराण्यातील आहे .
तो देखणा आहे, हुशार, कर्तबगार आहे. तिच्या वडिलांनी त्याच्यावर उपकार केले आहेत. त्याचे शिक्षण त्यांच्याच पैशावर झाले आहे. ते दोघे एकमेकांना पूरक आहेत .
त्याने काही आपल्या भावना अजून बोलून दाखवल्या नाहीत तर त्याच्यावर फसवणुकीचा आरोप लावणे सुद्धा गैर आहे ..
अगदी प्रामाणिक पणे आणि तटस्थ राहून विचार केला तर ती आणि तिची परिस्थिती “करुणाहून फार उजवी “ आहे ..

मीनाचा इथला जो stoic silence आहे त्यात हे सर्व वाचता येते. एका जाणिवेतून आलेले हे गीत आहे ,.
पराभवाची जाणीव होणे, त्याची कारणे माहिती असणे, ती पटणे आणि ग्रेसफुली त्यातून बाहेर पडणे, मग ती करिअर असो, नाते असो, मैत्री असो किंवा प्रेम;  हे जगण्यासाठी फार आवश्यक आहे. 
निदान त्यासाठी हे गाणे पाहावे .

ये रौशनी के साथ क्यूँ, धुआं उठा चिराग से
ये ख्वाब देखती हूँ मैं, के जग पड़ी हूँ ख्वाब से
अजीब दास्ताँ है ये.

एकत्र तर निघालो होतो आणि अचानक एका वळणावर आपल्या दिशा वेगळ्या झाल्या आहेत . स्वप्नातून  जबरदस्तीने उठवल्याची वेदना तर आहे पण जे घडले ते कदाचित त्याच्यासाठी योग्य म्हणून  कुठेही तिच्या डोळ्यात अश्रू  नाही .
मुबारकें तुम्हें के तुम, किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो, के सबसे दूर हो गए
अजीब दास्ताँ है ये…

सर्वस्व उजाडले गेल्याची जाणीव होत असताना सुद्धा  जिच्यामुळे हे झाले तिच्याबद्दल  आकस नाही .  त्याला आयुष्याची सर्व सुखे मिळूदे  इतके मागण्याची ताकद असलेले मोठे मन तिचे आहेच. तिचे प्रेम आहे त्याच्यावर.

किसी का प्यार ले के तुम, नया जहां बसाओगे, ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे
अजीब दास्ताँ है ये.

आणि तरीही एका भावूक क्षणी   जाणवले आहे की आता आयुष्यात संध्याकाळ कायमच वस्तीला येणार आहे …
लता आणि मीना ह्यात नक्की कोण उजवे आहे हा प्रश्न पडतो इथे.
शंकर जयकिशन यांनी फार विचार करून संगीत दिले आहे. गाणे हृदयभंगाचे असेल पण मूड पार्टीचा आहे .
सर्वच लाडका डॉ सुशील लग्न करून आला आहे. त्याचा स्वागत समारंभ आहे हा. 

मीनाच्या चेहेऱ्यावर मंद स्मित आहे. आजूबाजूला लोक आहेत त्याची जाणीव आहे . आपले दुःख कुणासमोरही व्यक्त न करण्याचा एक सावधपणा आहे शिवाय या परिस्थितीत सुद्धा स्वतःला सावरण्याचा अट्टाहास .. ती कुठेही स्वतःचा तोल ढळायला देत नाही.
पापणीवर साचलेले अश्रू बाहेर यायला देत नाही ..असंख्य भावनांचा कंगोरा दाखवणारे हे गीत आहे ..
वेदना  सुद्धा एवढी देखणी करते म्हणून ती ट्रॅजेडी क्वीन असेल तर ते बिरुद सार्थ आहे.

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 



.

13 thoughts on “ वेदनेची सम्राज्ञी-मीना कुमारी”

  1. खुप छान लेख ,…. मला तिचे सर्वात आवडलेले गीत म्हणजे … हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम….

  2. मंदार धर्माधिकारी

    अतिशय अप्रतिम लेख आहे. मला वाटते मनातील भावना ही थीम घेऊन एका अभिनेत्रीवर लिहिलेला पहिल्यांदाच वाचत आहे.

    1. अतिशय अप्रतिम लिहिले आहे.. मला सुद्धा मीना कुमारी आवडते… प्रत्येक भूमिका खरंच समरसून जगली आहे ती…

  3. It needs to have emotional and empathetic attitude to express one’s character be it reel or real life and you have given justice to both sides while writing about the actress Meena Kumari..

  4. Aniruddha Kavishwar

    मीनाकुमारी च्या सिने जगतातील आणि वैयक्तिक आयुष्याचा पण आलेख मांडणारा सुंदर लेख . भावनाशील व्यक्ती आपली छाप समाजमनावर कशी सोडून जाते ते मीनाकुमारी कडे पाहून समजतं.
    लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹

    1. खरे आहे ..तिच्या आयुष्याची घसरण आणि काही सिनेमा यात बरेच साम्य आहे .
      . Thank you Aniruddha ji.

  5. anand mamidpalliwar

    atyant sunder lekh!!!! khup yogya prakare varnan kele aahe!!!!visesh karun ajeeb dasta hai ye!!! ha geetach vishleshan as kahi lihile aahe tumhi ki ekhadya phalach gar jasa nemka chakhayla milawa agdi tss vatat aahe mala wachun!!!!! khup chan mandni!!! niwadleli geet ter masterpiece!!!!!!!! bahu begum cha pan ullekh zala ast ta ter aankhi chan zale aaste!!!!!!!aso!!! pan chan s kahi vachayla milale!!!!

Leave a Reply to Aniruddha Kavishwar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *