Skip to content

साठीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -जंगली

पन्नासच्या दशकात शम्मी कपूरने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देव आनंद , दिलीप कुमार आणि राज कपूर या त्रिमूर्तीचे राज्य असलेल्या चित्रपटसृष्टीत त्याचे बस्तान बसणे तेव्हा कठीण होते. सिनेमा सोडायच्या तयारीत असलेल्या शम्मीला “तुमसा नही देखा “ हा चित्रपट मिळाला आणि शम्मीचे ग्रह उच्च स्थानात आले. या सिनेमा नंतर त्याने मागे वळून पहिले नाही. पन्नासच्या दशकाचा शेवटचा काळ सुद्धा बदलासाठी उत्सुक होता. फाळणीच्या वेदना, नवीन जन्माला येणाऱ्या देशाचे सुरुवातीचे खडतर दिवस आता मागे राहिले होते. देश प्रगतीच्या मार्गावर आपली पावले टाकत होता आणि हळू हळू का होईना , स्वातंत्र्यानंतर तारुण्यात येणारी ही पहिली पिढी महत्वाकांक्षी होत, स्वप्ने पाहायला लागली होती.
रखरखीत वास्तववादापेक्षा पलायनवादाला महत्व आलं होते. या दशकांत येणाऱ्या सिनेमात समाजापेक्षा “ स्व” चे महत्व वाढले होते. कथा नायक आणि नायिकाभोवती फिरणारी होती. अर्थात माणसे दोन, त्यामुळे येणारी संकटे सुद्धा दोघांपुरतीच, तोंडी लावणारी म्हणता येईल.

शम्मीच्या नव्याने झालेल्या इमेजसाठी हा काळ अत्यंत फलदायी होता. चापून चोपून बसवलेल्या केसांची जागा आता उडणाऱ्या अस्ताव्यस्त केसांनी घेतली, तलवारकट मिशी उडवली गेली आणि पुरुषाच्या शरीरात वसणाऱ्या एका खोडकर मुलाचा उदय झाला. शम्मी सर्वार्थाने रोमँटिक हिरो होता. निसर्गरम्य परिसरात, डोंगर दऱ्यात प्रेयसीचा पाठलाग करणारा, धसमुसळे प्रेम करणारा आणि आपल्या बोलक्या , चॉकलेटी डोळ्यांनी त्यांना हिप्नोटीझ् करणारा, उत्तम नृत्य करणारा, संगीताची जाण असणारा हिरो या दशकाने पाहिला.
He charmed them with animal grace and magnetism . An era of a wild romance started with Janglee. त्या काळात जर रोमान्स या शब्दाला चेहेरा असता तर तो नक्कीच शम्मी चा असता. 

जंगली


चित्रपटाच्या सुरुवातीला,  नायक शेखर  (जेव्हा त्याची कडक आई संतापते तेव्हा तो होतो चंद्रशेखर) परदेशातून परत येतो. वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर येते.  त्याचे बालपण अत्यंत कडक शिस्तीत आणि रुक्ष वातावरणात गेले आहे कारण आपल्या मुलांना शिस्त आणि पैसे याबरोबर प्रेमाची सुद्धा गरज आहे  ह्याची त्याच्या आईला जाणीव नाही. हसण्याचीही या घरात मनाई आहे.

ह्या सर्वाचा परिणाम  म्हणून तो उद्धट आहे, आक्रमक आहे आणि त्याला माणसांना कसे हाताळावे ह्याची पोच नाही.  शेखरने स्वतःला त्याच्या आईच्या अपेक्षेनुसार घडवले असले तरी त्याची सख्खी बहीण, माला  मात्र खूप वेगळी आहे. तिला हसायला आवडते, भरभरून बोलायला आवडते आणि तिचे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका साध्या कारकुनावर प्रेम आहे. आईच्या नकळत आपल्या प्रेमीला भेटायला जायची ओढ आहे पण आईच्या विरोधात जायची हिंमत तिच्यात नाही.

व्यावसायिक कामासाठी शेखर काश्मीरला जात असतानाच, मालाच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागल्याने , मालाला सुद्धा काश्मीरला पाठवण्यात येते आणि इथेच शेखरची ओळख राजकुमारी उर्फ राजशी  होते.
Boy meets the girl and falls in love असे काही इथे घडत नाही. काश्मीरचे निसर्गसौन्दर्य पाहायला बाहेर पडलेल्या शेखरवर एक बर्फाचा गोळा आदळतो.  खेळणे, हसणे हे शब्दच शेखरच्या शब्दकोशात नसल्याने तो चिडतो. त्याच्या चिडण्यावर तिची प्रतिक्रिया असते त्याच्यावर हसणे.

अर्थात पहिल्या भेटीत तिला तो अतिशय उद्धट, जंगली वाटतो आणि त्याला ती गावंढळ.  प्रेम मात्र चिनार वृक्षाच्या आड राहून गालातल्या गालातल्या हसत असते.
इथे  आल्यावर माला आजारी पडते. तिला दिवस गेलेले असतात. हादरलेली माला जीव द्यायचे ठरवते आणि त्याचवेळी राज तिला धीर देते, सावरते आणि तिच्या भावाला बदलवण्याचे आव्हान स्विकारते.
“तुझ्या सहवासात, तुझ्या प्रेमाने कुणीही बदलेल , तर शेखर का नाही ?”
“ ह्या दगडावर प्रेम? छे, मला अजिबात इच्छा नाही पण त्याला माणसांत मात्र मी नक्कीच आणेन “
हे ऐकून तर प्रेम अजून जोरात हसते. 

प्रेमकथांची एक गंमत असते. जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा ती सोडवायला पंचमहाभूते सुद्धा पुढे येतात. इथे मोठ्ठे वादळ येते. सगळीकडे बर्फच बर्फ आणि त्यात अडकलेले हे दोघे.
एकांतात मनातल्या भावनांना जाग येते. 
आतापर्यंत पाहिलेल्या मुलींत राज वेगळी असते. तिची निरागसता, तिची संवेदशीलता , तिचे हळुवारपण , तिचा खट्याळपणा .. आणि हो तिची सुंदरता सुद्धा.
बाहेरचे वादळ त्याच्या मनालाही वेढून  टाकते.
राजचे मन सुद्धा काही वेगळे सांगत नसतेच. , “वाटतो तसा काही तो जंगली नाही बरे “
काही दिवसांनी बाहेरचे वादळ शमते आणि आतले सुद्धा . मनाची ओळख पटलेला आणि प्रेमात डुबलेला शेखर साऱ्या जगाला ओरडून सांगतो, या हू “

“ या हू “ ही साठीच्या  दशकात  तरुणांची प्रेमाची परिभाषा होते.
वादळात अडकून बरेच दिवस झालेले असतात. एकत्र राहिलेल्या त्या दोघांना पाहून जग काय म्हणेल ! राजचे वडील चिंतेत पडतात पण” मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करणार” शेखर हे आश्वासन देतो.
आता चित्रपट वेगाने सरकतो. माला एका मुलाला जन्म देते पण याची खबर शेखरला देत नाही. बरेच महिने लोटलेले असतात. योग्य वेळेला मुलाला घेऊन येण्याचे वचन राजकडून घेऊन माला आणि शेखर घरी परततात.
इथे शेखरची आई, राजचा अपमान करून, त्याचे लग्न एका दुसऱ्या मुलीशी ठरवते.
शेखर आणि राज एकत्र येतील का ? आईच्या भावनिक दबावाला शेखर  बळी  पडेल का ? मालाचे आणि तिच्या मुलाचे भवितव्य काय असेल ?
सिनेमाचा अंत सुखद आहे. And they live happily ever after वर सिनेमा संपतो.
जंगली ही हलकी फुलकी  रोमँटिक कॉमेडी  आहे.

सायरा बानूने या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीने रंगवलेली राज आधीच्या नायिकांसारखी रडू बाई नाही.  स्वतंत्र विचार करायची आणि निर्णय घेण्याची तिची क्षमता आहे. तो निभावण्याची तिच्यात शक्ती आहे. ती खेळकर आहे पण आपल्या हातून चुकी झाली तर क्षमा मागण्याचा लवचिकपणा तिच्या अंगी आहे.. ती स्वाभिमानी आहे पण गर्विष्ठ नाही.
“चाहे कोई मुझे जंगली कहे “ हे सिनेमाची सिग्निचर ट्यून  आहे पण शेखरचे खरे रूप एका वेगळ्याच गीतात दिसून येते.
शेखरची आई राजचा अपमान करते. पैशासाठी तिने प्रेमाचे नाटक केलं याचा आरोप करते. दुखावलेली राज तिथून निघून जाते. त्यावेळी राज काही बोलू शकत नाही पण नंतर आपल्या प्रेमाची बाजू घेऊन तो आईला सुनावतो आणि राज कडे येतो.

प्रेमात माफीला जागा नसते असे म्हणतात पण योग्य त्या क्षणाला मागितलेली क्षमा नात्याचे बंध अजून घट्ट करते.

तुमने मुझको हसना सिखाया
रोने कहोगे रो लेंगे अब
आँसू का हमारे गम ना करो
वो बहते है तो बहने दो
मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है
मुझे पलको की छाँव में रहने दो
एहसान तेरा होगा मुझ पर

“मी तुझ्यावरच  प्रेम करतो “ शेखर सांगतो. तू मला माणसात आणलेस, हसायला शिकवलेस, मग आता डोळ्यात अश्रू आले तरी बेहत्तर. ही सुद्धा तुझी देणगीच आहे .ह्या गाण्याला खूप अर्थ आहे. सुरुवातीला शेखर जंगलीच असतो. भावनापासून अलिप्त, कोरडा.प्रेम त्याला हळवे बनवते, संवेदनशील, न्यायी आणि मानवी.

त्याच्या डोळ्यातील खरेपणा आणि त्यात दिसणारे  तिच्यावरील उत्कट प्रेम.  राग जायला ह्या गोष्टी पुरेशा आहेत नाही ! 

साठीच्या दशकात प्रेमाला हवेहवेसे बनवले. ह्या दशकात प्रदर्शित झालेले सिनेमा बघा. ह्यातले प्रेम ताजे आहे, खेळकर आहे , सहज प्राप्त होणारे आहे, देखणे आहे , आधुनिक आहे. त्याला द्यावी लागणारी परीक्षा सुद्धा सहज पास होण्यासारखी आहे ….ह्यातला खलनायक सुद्धा  हिंस्त्र नाही. ह्या काळात स्टुडिओ ची मक्तेदारी संपायला सुरुवात झाली. सिनेमा स्टुडिओ च्या बाहेर गेला. रंगीत झाल्याने पडदा अजून देखणा झाला. फॅशनचा उदय याच काळात झाला. घट्ट चिकटलेले चुरीदार, केसांची चित्रविचित्र रचना, स्टायलिश शर्ट, well fitted trousers, शहरी, सुशिक्षित व्यक्तिमत्व, सहज गुणगुणता येईल अशी गाणी.. पन्नास च्या दशकाला सुवर्ण युग समजतात पण साठीत त्याच्यावर कळस चढला.पाश्चात्य प्रभाव सिनेमाच्या सर्वच अंगावर पडण्याची ही सुरुवात होती.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 


8 thoughts on “साठीच्या दशकातील रोमँटिक सिनेमा -जंगली”

  1. सिनेमांमधील होत जाणाऱ्या बदलांचा छान आढावा👌🏻

  2. प्रिया,
    🩷🩷
    He charmed them with animal grace and magnetism.
    An era of wild romance started with जंगली.

    नेमकं वर्णन.

    शम्मी आवडता.
    Very interesting series.
    तुझ्या लिखाणाने चार चांद लागले आहेत.

  3. Kamini Sunil Amrutkar

    अगदी सुरेख लिहिलंय.
    रांगडा शम्मी या सिनेमात बघणं खरोखरच सुख. अगदी मस्त लिहिलय.
    शम्मीजींचे डोळे सुद्धा खूप बोलका अभिनय करतात या सिनेमात.
    अगदी याऽऽऽऽहू सिनेमा.

    1. Thank you Kamini.
      शम्मीचा करिष्मा खरंच कुणालाही नाही
      वेगळाच कपूर

  4. Earlier the title for this movie was Mr.Hitler.
    Sayra Banoo was just 16 years old at this time.
    Yaaahoo-this shout is by Prayagraj
    and not by Rafisaab as most of the people’s think.
    This is first coloured movie(Geva color)

Leave a Reply to Heramba Joshi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *