लता बाईंचा एक जुना व्हिडिओ पाहिला होता.
मुलाखत घेणाऱ्याने बाईंना प्रश्न केला,
“तुम्हाला पुढच्या जन्मात लता मंगेशकर जन्माला यायला आवडेल का ?
या प्रश्नाचे उत्तर कितीतरी जणांसाठी पाहिलेले स्वप्न असेल ना !
ज्यांना बाई माहिती आहेत त्यातल्या नव्वद टक्के लोकांना तरी लता मंगेशकर व्हायला आवडेल. नव्वद वर्षे आयुष्य, त्यातली सुरुवातीची काहीच वर्षे सोडली तर ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक, भक्ती बाईंच्या वाट्याला आली. पंच्याहत्तर वर्षाची, काही अपवाद सोडले तर उत्तुंग कारकीर्द, मान सन्मान तरुण वयातच बाईंना मिळाले. अगदी भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा. क्वचित एखादा कलाकार आपली इनिंग चालू असतानाच अशा कृतार्थ नजरेने गत आयुष्याकडे पाहत असेल.
लता मंगेशकर ही व्यक्ती आपल्या अटींवर जगली. प्रसंगी वादविवाद झाले, टीका झाली , महत्वाच्या बॅनर्स , सहकलाकारांनी साथ सोडली , खाजगी आयुष्यात सुद्धा काही टोकाचे निर्णय घ्यावे लागले पण लता मागे सरली नाही.
वादविवाद अनेकांनी स्वतःहून मिटवले. ज्यांनी नाही, ते आयष्यातील सूर संपल्याने संपून गेले, पण लताचे सूर मात्र तसेच गुंजत राहिले.
गेल्या काही वर्षात लता भेटत राहिली. तिच्यावरील लेखांतून, अनेकांच्या आठवणीतून, अनेक छायाचित्रांतून, स्वरांच्या पलीकडील लता समजत गेली. तिच्या काही इच्छा होत्या.लॉस अँजेलिसला भेट द्यायची, जीन्स घालायची, स्लॉट मशीन खेळून आपले नशीब अजमावून बघायची, हिरे घ्यायची. हो , म्हणजे स्वतःच स्वरांच्या साम्राज्यातील लखलखता हिरा असणाऱ्या लताला सर्वसामान्य स्त्री प्रमाणेच नटण्याची, दागिने घालण्याची, सिल्कच्या साड्या नेसण्याची, जग बघण्याची, खरेदी करण्याची सर्वांची आवड होती.
मग सर्वसामान्य स्त्रीचे आयुष्य या जन्मात वाट्याला न आलेल्या या जबरदस्त स्त्रीला परत लता मंगेशकर न होता, सर्वसामान्य स्त्रीचे आयुष्य जगण्याची इच्छा का नसावी !
तिने स्त्रीचे सर्व रंग आपल्या गाण्यातून दाखवले. वात्सल्य, प्रेम, शृंगार , विरह, स्त्री मनाशी संलग्न असलेले सर्व भाव तिच्या सुरांतून प्रत्ययास आले. कदाचित आपल्या अनेक इच्छा पुऱ्या करण्यासाठी तिने सुरांचा आधार घेतला आणि आपले सर्वस्व ओतले म्हणून ते सूर जिवंत भासले. तरीही भासणे आणि असणे यात फरक आहेच.
“तुम्हाला पुढच्या जन्मात लता मंगेशकर जन्माला यायला आवडेल का ? “ ह्या प्रश्नाला म्हणून तिने ठाम “ नाही “ असे उत्तर दिले. त्यात अनेक न सांगितलेल्या गोष्टी होत्या, पुरी न झालेली स्वप्ने होती, अधुऱ्या राहिलेल्या इच्छा होत्या, न केलेल्या तक्रारी होत्या.
ही पोस्ट लता बाईंच्या अशा गीतांची , जी काहीही न सांगता बरेच काही सांगून जातात. ही गाणी तक्रार करत नाहीत, दोष देत नाहीत.. मनाला समजावतात.
१) चांद मद्धम है आसमां, चूप है
( सिनेमा-रेल्वे प्लॅटफॉर्म, संगीतकार-मदन मोहन ) 
आठवणी, मग त्या आनंदाच्या असोत किंवा विरहाच्या, त्या छळंवादीच असतात . हुरहूर लावतात.
गेलेले क्षण जातात त्यांच्या प्रवासाला आणि आपण मात्र ती वाट निरखत बसतो.
दिवसाच्या लखलखाटात त्या पुसट होत असतील पण रात्रीच्या अंधारात मात्र त्यावरील काजळी जाते आणि त्या मनाचा परत ताबा घेतात.
चांद मद्धम है आसमां चूप है ,
नींद की गोद में जहाँ चूप हैं .
हे गीत म्हणजे प्रेमिकेने न येणाऱ्या प्रियकराला परत परतून येण्यासाठी केलेली उत्कट विनंती .
सारा आसमंत निद्रादेवीच्या कुशीत थकून श्रांत झाला आहे पण झळाळणाऱ्या चंद्रप्रकाशात ती आपल्या प्रियकराची वाट पहात आहे.
त्या वाट पाहण्याला अंत नाही. दूरवर दिसणाऱ्या खोल दरीत लपलेले ढग सुद्धा आता अंधारात दडलेल्या पर्वतांना स्पर्श करत आहेत . किती काळ लोटला आहे त्याची तमा नाही आहे तिला पण तारुण्य ओसरत असल्याची जाणीव मात्र तिला अस्वस्थ करत आहे .
रोज की तरह आज भी तारे , सुबह की गर्द में न खो जाये
आ तेरे गम में जागती आँखे , काम से काम एक रात सो जाये
दिवस उजाडायला आता थोडाच वेळ आहे . नेहेमीप्रमाणे हे तारे सुद्धा थकून विश्रंती घेतील पण माझ्या थकलेल्या डोळ्यांचे काय ! आता तरी परत ये . या डोळ्यांना समाधानाने तुला साठवून घेण्याचे भाग्य मिळू दे . प्रेमात पडलेल्या मुलीची साशंकता , अस्वस्थता , एकाकीपणा , वेदना , नैराश्य सारे काही साहिर लुधियानवी यांच्या शब्दात आणि लताच्या स्वरात साकळून आले आहे .
रेल्वे प्लॅटफॉर्म ही १९५० ची फिल्म आहे जेव्हा चित्रपटसृष्टीवर साम्यवादाचा पगडा होता. श्रीमंत आणि गरीब यातील अंतर हा मूळ विषय.
नायक , दोन स्त्रियांच्या मध्ये अडकलेला. एक धनवान आणि दुसरी गरीब. श्रीमंतीच्या रस्त्याकडे वळलेल्या नायकाला घातलेली साद आहे ही. कानावर न पडणारी साद.
मुद्दाम गाणे ऐका .. स्वतःशीच केलेला संवाद वाटतो हे गीत.
२) तुमसे नाराज नहीं जिंदगी , हैरान हूं मैं
( सिनेमा -मासूम, संगीतकार – आर डी बर्मन)
दोन मुली , प्रेमळ आणि कर्तबगार नवरा यांच्या सुखात बेफिकीर असलेली ती. सुखाचा संसार आणि अचानक आलेले वादळ . मुळापासून हादरते ती. डोळ्यावरची झापडे उडून जातात.
शाळेच्या रियूनिअनमध्ये डीके, भावनाला भेटतो. ती एकटी असते.. एका क्षणी मनावरचा ताबा सुटतो. एका रात्रीसाठी दोघे एकत्र येतात. त्यानंतर त्यांचा संपर्क नसतो. या रात्रीची आठवण मात्र उरते. डिके आणि भावनाचा मुलगा, राहूल ..
. तिचे निधन झाल्याने डी के ला मुलाची जबाबदारी स्वीकारावी लागते आणि दहा वर्षाचा डिके आणि इंदूचा हसरा खेळता संसार भातुकलीच्या संसारासारखा खोटा ठरतो
आतापर्यंत त्याने जे सांगितले, जे दर्शवले ते तरी खरे होते ? त्याचे प्रेम, त्याने दाखवलेली स्वप्ने , त्याचा अंश असलेली दोन मुले …
ती जर खरी असतील तर मग ह्या मुलाचे त्याच्या आयुष्यातील स्थान काय ?
त्या निरागस जीवाचा यात काहीही दोष नाही हे जाणून आहे इंदू …
“तुझसे नाराज नही जिंदगी” हे त्याला उद्देशून नाहीच . तिच्या आयुष्याला आहे. सरळ रस्तावर चालताना आलेले हे वळण . वळायचे का ? हा प्रश्न तितका साधा नाही . त्याने आयुष्यात जे बदल घडणार आहेत त्याला तोंड द्यायची तिची तयारी नाही
जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो, मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठो पे क़र्ज़ रखा है
स्वतःची वेदना लपवून, अपमान पचवून माणसे जगतात. अगदी स्वतःपासून सुद्धा, ती लपवावीच लागतात तरच आयुष्य सुसह्य होते. कोणत्याही गोष्टीची, अगदी ओठावरल्या हास्याची किंमत सुद्धा आयुष्य वसूल करते.
हसण्याचीही किंमत चुकवावी लागत असेल तर गोतावळ्यात असूनही माणूस एकाकी पडतो.
ज़िन्दगी तेरे ग़म ने हमें, रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले, छाँव के ठण्डे साये
नात्यांची खरी ओळख दुःखातच होते. आपले कोण, परके कोण हे सुद्धा स्पष्ट उमजून येते. सुखाच्या प्रकाशात दडलेल्या अनेक गोष्टी दुःखाच्या अंधारात निरखता येतात .
खरेतर हे गीत फक्त इंदू आणि डीकेचे नाही.
कुणाचेही .आयुष्य सरळ नसतेच. असंख्य वळणावळणांचा रस्ता असतो तो. नको असलेले खडडे , चढ उतार, मनाची दमछाक करतात. मन गोंधळून जाते, रागावते, थकते पण कुठेतरी मनाला मुरड घालून, कधी मदतीचा हात देऊन, कधी घेऊन वाट सरळ करत चालावी लागते. गुलज़ार लिखित हे गीत आपल्या सर्वांच्या मनाचेच प्रतिबिंब आहे.
३) तुम न जाने किस जहाँ में खो गये
(सिनेमा -सजा — संगीत -एस डी बर्मन )
शामा, देव आणि निम्मी असा त्रिकोण आहे इथे . श्रीमंत आणि गरीब यांची पारडी एका तराजूला नसावीच . श्रीमंतीचा जडपणा निर्णयाला स्वतःकडे खेचतो. माणसे आयुष्यात येतात आणि आयुष्याचाच ताबा घेतात . ती निघून गेल्यावर राहते ती फक्त पोकळी .
ती भरून काढणे अशक्य .
तुम न जाने किस जहाँ में
हम भरी दुनिया में तनहा हो गये
न आवडणाऱ्या लोकांबरोबर आयुष्य काढणे म्हणजे शिक्षाच. अशावेळी गर्दीत सुद्धा एकटेपणा जाणवतो जेव्हा तो माणूस गर्दीत नसतो .
एक जां और लाखो गम , घुट के रह जाये न दम
आवो तुम को देख ले , डुबती नजरोंसे हम
लूट कर मेरा जहाँ , छिप गये हो तुम कहाँ
दुःखाचे पहाड जरी आले तरी सुद्धा तो येण्याची आस तिला जिवंत ठेवत आहे. शेवटच्या क्षणी तरी तो दिसावा ही आशा घेऊन जगायचे पण नजरेतील चमक मात्र कधीच मावळली आहे .तिला ही ते माहित आहेच त्यामुळे सहन न होऊन तिने साद घालणे ,
माझे सर्व जग, जे फक्त तुझ्याशी निगडित होते, तेच घेऊन तू कुठे निघून गेला आहेस ?
हे विरहाचे दुःख मी एकटी कशी साहू?
मरण तर मागते आहे आणि तरीही थोडीशी अंधुक आशा आहे , की कदाचित तू परत येशील .
वाद्यांचा वापर अगदी कमीतकमी आहे या गीतात. लूट कर मेरा जहाँ ही ओळ जेव्हा लताच्या आवाजात येते , तेव्हा विराण आयुष्य म्हणजे काय हे लगेच समजते. ती पोकळी आता भरून निघणार नाही याचीही जाणीव तीव्रतेने होते. एस डी बर्मन जेव्हा गेले तेव्हा श्रद्धांजली म्हणून हे गीत लताने निवडले होते. आज जेव्हा हे तिच्या आवाजात ऐकते तेव्हा , “लूट कर मेरा जहाँ “ हे ऐकताना लताचा चेहेरा नजरेसमोर येतो.
४ ) मेरे मन के दिये —
(सिनेमा -परख, संगीतकार -सलील चौधरी )
मेरे मन के दिये, मेरे मन के दिये
यूँही घुट-घुटके जल तू, मेरे लाडले, ओ मेरे लाडले
ती स्वतःच्याच मनाला समजावते आहे इथे .
न संपणारी अंधारी वाट, त्याला अंतच नाही . फक्त तिच्या हृदयात तेवणारी आशेची मिणमिणती पणती तिच्या चालण्याचा आधार होत आहे . हे गाणे फक्त तिचे आहे .
कोणालाही न सांगता येणाऱ्या तिच्या भावना . त्याच्याकडे व्यक्त सुद्धा केल्या नाही आहेत तिने.
Those are so private that she cannot have anyone listen to it . अगदी अपघाताने सुद्धा नाही.
ख़ाक हो जाएँ हम प्यार के नाम पर
प्यार की राह में रौशनी तो रहे
मेरे मन के दिये …
याचे चित्रीकरण शब्दांना साजेसे आहे. तिचे छोटेसे घर . तिचे पाय ओढत चालणे . रात्रीच्या अंधाराची उदासी तिलासुद्धा झाकळून टाकणारी . त्या छोट्याश्या दिव्याच्या आधाराने आपले आयुष्य सावरण्याचा निकरीचा प्रयत्न .
The song conveys a sense of sheer helplessness of the person in love .
५) आज सोचा तो आँसू भर आये मुद्दते हो गयी मुस्कुराये
(सिनेमा-हसतें जख्म – संगीतकार-मदन मोहन) 
आमच्या जवळ एक काका रहातात. सगळ्यांचेच काका. माझी त्यांच्याशी ओळख बाबांचे ब्रीज पार्टनर म्हणून झाली.
सर्वाना मदत करायला तत्पर आणि ती ही हसतमुखाने. एकटेच रहातात पण त्याची खंत आम्हाला तरी जाणवली नाही कधीच .
त्यांच्याकडे जुन्या रेकॉर्ड्सचा मोठा संग्रह आहे. दोन तीन महिन्यातून एकदा जमतो आम्ही. अशीच मैफिल रंगात आली होती आणि आमीर खान यांचा मारवा सुरू झाला..काकांचा चेहराच त्या स्वरांच्या सरीत चिंब भिजलेला. मन पिळवटून टाकणारी वेदना. नेहेमीचा हसरा मुखवटा उघडा पडलेला.आत दाबून ठेवलेल्या आठवणी आक्रमक .
लांबून कुजबुज पण काही विचारायचे धाडस कुणी केलं नाही.
काही वेदना , काही दुःखे अस्पर्श राहतात. ती वाटून घेता येत नाहीत.
आज सोचा तो आंसू भर आए
मुद्दतें हों गई मुस्कुराये
कोणीतरी लिहिले होते इथेच. फेसबुक आहे म्हणून मानसिक रोग आटोक्यात आहेत . मला नक्की माहित नाही त्यांचे काय दुःख होते ते . त्यांनी कधी दाखवले सुद्धा नाही . मेलोड्रामा आणि मानापमानाच्या खोट्या बंधनात अश्रूंना कोंडून ठेवले आहे आपण. त्यामुळे त्यातील सहज सौंदर्य लक्षात येत नाही आपल्या. नुसते खारे पाणी नाही ते, एक एक थेंब त्या क्षणाला चिकटलेल्या भावनांशी निगडीत आहे…
प्रेम, विरह, वेदना, अपमान. वंचना आणि आनंद सुद्धा. त्या क्षणांचे अर्ध्य देऊन रीते व्हावे माणसाने.
पुढचा प्रवास सोपा होतो.
हर कदम पर उधर मुड़कर देखा
उनकी महफिल से हम उठ तो आए
आज सोचा तो आंसू…
मागे वळून पहिले की लक्षात येते, पर्याय होते पण नाही घेतले. अडचणी काही खऱ्या खुऱ्या होत्या तरी जरा धीर धरला असता तर सुरळीत झाले असते , मनासारखे पण सोयीस्कर पर्याय स्वीकारला गेला आणि मनाचा कौल नाकारला .
शांत बसले की केलेली चुक आणि हुकलेली संधी परत मागे पाहायला भाग पाडतात . रस्ता नसतोच पण तरीही अश्रूंना समजावता येत नाही न !
लता बाईंनी जे काही कमावले, अफाट कमावले आणि बरेच काही गमावले सुद्धा .
यशाची किंमत पुरेपूर वसूल करते नियती ..
कशासाठी काय गमावले ह्याचा हिशोब आयुष्याच्या संध्याकाळीच होतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते .
दिल की नाज़ुक रगें टूटती हैं
याद इतना भी कोई न आए
आज सोचा तो आंसू…
हृदय पिळवटणाऱ्या आठवणी उधारीचे हास्य घेऊन विसराव्या लागतात हे खरंच .
६ ) कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं
(सिनेमा -अनुपमा , संगीतकार-हेमंत कुमार 
मुलगी आणि तिच्या वडिलांतील दुराव्याची ही गोष्ट . आईचे उमाच्या जन्माच्या वेळेस निधन होते . तिचा काहीही दोष नाही पण वडिलांच्या तिरस्काराला तिला तोंड द्यावे लागते . हळूहळू ती सुद्धा स्वतःलाच जबाबदार धरते . त्या दुःखाने स्वतःला मिटवून घेते . या सिनेमात तिच्या वाट्याला शब्द नाहीतच . तिची नजर , देहबोली , ओठांची अस्पष्ट हालचाल यातून तिच्या भावना समजून येतात .
विलक्षण एकाकी जीवन जगत असताना तिच्या आयुष्यात अशोक येतो . एक देखणा , संवेदनशील लेखक .
तिचा एकटेपणा , मुकेपण का , त्याला जाणून घ्यायची इच्छा आहे. श्रीमंत , देखणी असूनही तिच्या चेहेऱ्यावर दुःखाची छाया आहे. ती दूर करायची त्याची इच्छा आहे पण तिची तयारी नाही. आपली माणसेच जेव्हा अंतर ठेवतात तेव्हा जगाला काय सांगायचे !
कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं
ऐसी भी बातें होती हैं
जेव्हा कुणी ऐकणारे नसते तेव्हा हृदयाने सांगितलेले ऐकायचेच नाही हा निर्णय घेणे चांगले .
लेता है दिल अंगड़ाइयां, इस दिल को समझाये कोई
अरमान ना आँखें खोल दें, रुसवा ना हो जाये कोई
पलकों की ठंडी सेज पर, सपनों की परियां सोती हैं
ऐसी भी बातें होती हैं…
कोणीतरी हवेहवेसे येण्याची मला चाहूल लागली आहे . पण त्याच्या येण्याने जे वादळ उठेल ते मी कसे थोपवणार . त्या पेक्षा मनातल्या गोष्टी मनातच ठेवणे श्रेयस्कर . स्वप्ने पापण्यांच्या कडेवरच मिटून जावी हे योग्य . आपल्या मनाला शोधता शोधता हातात येते ते एकाकीपण .
हे गाणे गायले आहे ते सुद्धा तिच्या मनातील भावनांसारखे . लता बाईंचा आवाज स्वतःशीच बोलतो आहे . स्वतःच्या मनाशी केलेला संवाद . कुजबुजच ती.
शेअर मार्केट मध्ये दहा वर्षे काम करण्यामुळे असेल , I know to book my loss . Its not wiping it off … Booking the loss is accepting one’s mistake . भले तोटा झाला असेल तर जेवढे पैसे मिळतात पैसे वाचवता येतात तेवढे वाचवायचे. नुकसान उघड्या डोळ्यांनी स्विकारायचे . पैसे जातात पण माणूस धडा शिकतो . तीच रक्कम परत दुसरीकडे गुंतवता येते . डोळस माणूस कधीही मार्केट सोडून जात नाही . आयुष्याचे सुद्धा तसेच असते. एकदा मी जगणार आहे असे ठरवले की सर्व शक्यता गृहीत धरून जगावे लागते .
७)कुछ नही कहते
( सिनेमा -अदालत, संगीतकार-मदनमोहन)
फसवणुकीला तोंड देण्याची पद्दत वेगवेगळी असते . काही आक्रोश करतात, काही प्रेमाचाच तिरस्कार करतात, काही जगापासून लांब जातात.
तर काही ओठ घट्ट मिटून घेतात .कदाचित ही प्रतिक्रिया वयावर सुद्धा अवलंबून असावी . बरेच आयुष्य पाहिलेली, डोळसपणे जगलेली माणसे हे पचवू शकतात. कदाचित या वयात धक्का, भीती, संताप याच्या पलीकडे जाऊन माणूस निर्लेप सुद्धा होतो ..
एकटे चालण्याची सुरुवात आणि तयारी झालेली असते …
एकेकाळी गुप्ततेने विवाहबद्ध झालेले दोघे, त्यातून राहिलेला गर्भ. समाजाची मान्यता नसल्याने माथी आलेली अवहेलना आणि आता परिस्थितीत पडलेलं अंतर. ओठ घट्ट मिटून घेण्यासाठी हे पुरेसे आहे. . विवाहवेदीवरून कोठ्यावर पोचलेली ती आणि तो प्रतिष्टीत वर्गात गणला जाणारा. त्यात तिच्या मुलाचे भवितव्य तिने गप्प राहण्यात आहे हे ठाऊक आहे तिला.
ती त्याला आणि स्वतःला सांगते,
अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते …
ही सवय आता अंगवळणी पडलेली .
कहने को बहुत कुछ था अगर कहने पे आते
दुनिया की इनायत है के हम कुछ नहीं कहते
उनको ये शिकायत है…
असहनीय या शब्दाच्या पलीकडे जाणारी ही वेदना.
असेच आणि एक अव्यक्त राहिलेल्या प्रेमाचे गीत आहे.
८) हाल-ए-दिल यूँ उन्हें सुनाया गया.
( सिनेमा -जहाँ आरा, संगीतकार-मदन मोहन)
What you do speaks so loudly I can’t hear what you are saying.― Henri Adams
नियतीला उद्देशून असावे हे वाक्य.
मुघलांच्या जनान्यात राजकन्येचा वनवास अटळ होता. तिच्या पूर्वजांनीच लिहिला होता. तख्तासाठी असलेली स्पर्धा जीवघेणी होती. एकतर सिंहासन किंवा कबर . वारशांसाठी हाच पर्याय खुला असल्याने गादी साठी होणारी भांडणे टाळण्यासाठी राजकन्यांना लग्न करण्याची परवानगी नव्हती. परपुरुषाचे दर्शन जरी झाले तरी मृत्यू निश्चित पण प्रेम या अडचणींना जुमानत नाही. ते व्हायचे तेव्हा होतेच. परिणामाची शक्यता मात्र डोळ्यासमोर दिसत असेल तर त्याला तोंड देण्याची कुवत फार कमी जणांत असते .
स्वतःबरोबर प्रियकराचा जीव धोक्यात घालायचा का आपली नियती मुकाट स्वीकारायची ?
तशी ही सुद्धा नशिबाने केलेली प्रतारणा .
इश्क की वो भी एक मंजिल थी
हर कदम पे फरेब खाया गया
हाल-ए-दिल यूँ उन्हें सुनाया गया.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

प्रिया,
नेहेमीप्रमाणे च अप्रतिम लेख.
लता
या दोन अक्षरात सगळं जग सामावलं आहे .
किती आणि कसं,कुठलाही विषय असो,अथांग सागर आहे.
त्यातले मोती निवडून लिहिणं म्हणजे परीक्षाच.
तू नेहेमी च षटकार ठोकतेस.
🌹❤️
Thank you Vidula.
अगदीच .
एवढी गाणी आहेत की कोणतीही थीम घेतली तरी लिहून उरतात ..
प्रिया, कमालीचा उत्तम लेख. एखाद्या गाण्याकडे असेही बघता येऊ शकते हे दर्शवणारा लेख. अजूनही बरेच काही लिहिता येईल पण शब्द सुचत नाहीत
Thank you so much Sudheerji.
अप्रतिम लेख. नेहमी सारखाच.
Thank you so much Mandarji.
काय सांगावे, व काय लिहावे ? लता मंगेशकर हे नांवच प्रचंड मोठे व सुरेल आहे. लेख तसाच सुरेल झालाय.
ही गाणी पुन्हा ऐकावी लागतील.
Thank you Sir.
कालपासून पारायणे केली आहेत
माझी अत्यंत लाडकी गाणी आहेत ही
अप्रतिम लेख…🌹👍😊 खूप आवडला… लताबाईंबद्दल माझ्याही अगदी अशाच भावना आहेत.. योगायोग म्हणजे तुम्ही बघू शकता काल रात्रीच मी माझ्या वॉल वर सुद्धा चांद मध्धम है, आसमां चुप है हेच गाणं त्यांच्या आठवणीत सामायिक केलं आहे. 😊😊
Thank you Maitreyee.
क्या बात !
मदन मोहन यांच्या सर्वोत्तम गीतात त्याचा समावेश होईल एवढे सुंदर गीत आहे ते
तुमच्या इतर लेखांप्रमाणेच फार सुंदर लेख.
प्रत्येक गाणं नव्याने ऐकावंच लागेल आता.
प्रत्येक गाण्यातला तिचा भाव लतादीदींच्या स्वरातील उत्कटतेने मनाला भिडतो.
खूप धन्यवाद.
Thank you so much Vaidehiji.
ही सर्व गाणी अत्यंत आवडती गाणी आहेत माझी. खूप छान वाटलं वाचून. धन्यवाद.
Thank you so much Ramakant ji.
अप्रतिम
Thank you Gayatri 🙂